या बस ड्रायव्हर मित्राला रजनीअण्णा स्टेजवरून थँक्स बोललाय

आपल्या हातात की-पॅडचे मोबाईल होते तेव्हाचा किस्साय. तेव्हा दिवसाला फक्त शंभरच टेक्स्ट मेसेज पाठवू शकत होतो. आपल्या पिल्लू, शोनाला जेवली का, काय करतीये विचारण्यात ८० मेसेज सहज जायचे. उरलेले २० मात्र जोक फॉरवर्ड करायला आणि हा जोक फक्त रजनीकांतचेच.

त्यात एक जोक होता, एक माणूस ज्वालामुखीवर जातो आणि पाहतो तर काय, तिकडं रजनीअण्णा पापड भाजत बसलेला असतो. आता यात अतिशययोक्ती असली, तरी मुद्दा एकच असायचा रजनीअण्णा काहीही करू शकतो.

रजनीअण्णा गुंडबिंड किरकोळीत मारतो, ट्रेनपेक्षा फास्ट स्पीडनं पळतो, बंदुकीच्या गोळ्या चाऊन खातो, पिक्चरच्या बाहेर सध्या शर्ट आणि लुंगीत राहतो आणि मेन म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वांत मोठा पुरस्कार मिळाल्यावर तो आपल्या बस ड्रायव्हर मित्राला डेडिकेट करतो.

सुपरस्टार रजनीकांतला नुकताच प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. त्यावेळी भाषण करताना, रजनीकांतनं आपण हा पुरस्कार आपले मार्गदर्शक आणि गुरु दिग्दर्शक के. बालाचंदर, मोठा भाऊ सत्यनारायण गायकवाड आणि आपल्याला पिक्चरमध्ये काम करण्यासाठी प्रोत्साहन देणारा बस ड्रायव्हर मित्र राज बहादूर यांना डेडिकेट करत असल्याचं सांगितलं. सोबतच त्यानं चित्रपटसृष्टीशी निगडित लोकांचे आणि तमिळ बांधवांचे आभार मानले.

आता रजनीअण्णानं थेट स्टेजवरून आभार मानलेत म्हणल्यावर सोशल मीडियावर राज बहादूर यांची चांगलीच चर्चा होऊ लागली. रजनीकांत बँगलोरमध्ये बस कंडक्टर म्हणून काम करत असताना, राज बहादूर हे बस ड्रायव्हर होते. या दोघांची १९७० मध्ये मैत्री झाली, जी आजतागायत टिकून आहे.

आपल्या मैत्रीबाबत बोलताना राज बहादूर सांगतात, ‘रजनीकांत इतरांसारखाच कंडक्टर असला, तरी त्याच्यात एक वेगळाच स्पार्क होता. तेव्हा कर्मचारी संघटना सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करायची. तेव्हा नाटकांमध्ये तो कायम मुख्य अभिनय करायचा. त्याची ॲक्टिंग पहिल्यापासून जबरदस्त असायची, पण त्यानं अभिनेता होण्याचं स्वप्न कधी पाहिलं नव्हतं.’

‘एकदा मी त्याला सांगितलं की, त्याच्याकडे ॲक्टर बनण्यासाठीचं टॅलेंट आणि क्षमता आहे. तरी त्याला पिक्चरमध्ये प्रवेश करण्यात रस नव्हताच, पण मी आग्रह करतच राहिलो. एकदा आमच्या नाटकाला महान दिग्दर्शक के. बालाचंदर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी रजनीकांतला फक्त तमिळ शिक एवढाच सल्ला दिला. रजनीकांत माझ्याकडे आला आणि म्हणाला फक्त तमिळ शिकायला सांगितलंय, पिक्चरचं काहीच म्हणले नाहीत. आता एवढ्या मोठ्या माणसानं शिकायला सांगितलंय म्हणल्यावर आम्ही ते मनावर घेतलं.’

‘मला तमिळ येत असल्यानं, पुढचे दोन महिने मी रजनीकांतशी फक्त तमिळमध्येच बोलत होतो. विशेष म्हणजे या दोन महिन्यांत तो व्यवस्थित तमिळ बोलायला शिकला. पुढच्या वेळी रजनीकांत बालाचंदर यांना भेटल्यावर ते म्हणाले “माझ्याकडे एक रोल आहे, पण तमिळ येत नाही म्हणून मी तुला कास्ट करू शकत नाही.” रजनीकांतनं लगेचच तमिळ भाषेत रिप्लाय दिला आणि बालाचंदर यांनी त्याला अपूर्व रागंगलमध्ये भूमिका दिली. त्यानंतर रजनीनं मागं वळून पाहिलंच नाही आणि इतिहास घडवला.’

‘फक्त माझ्यात आणि रजनीकांतमध्येच नाही. तर त्याचं आणि त्याच्या सर्व मित्रांमधलं प्रेम, आपुलकी या गोष्टी गेल्या पाच सहा दशकांपासून कायम आहेत. त्याला प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळत असताना माझं नाव घेणं आवश्यक नव्हतं. यावरूनच त्याची सचोटी, नम्रता आणि तो इतका मोठा सुपरस्टार होऊनही आपला प्रवास विसरला नाही हे दाखवून देतो. तो त्याच्या मित्रांना कधीही विसरत नाही, कारण त्यांनीच त्याला प्रोत्साहन दिलंय.’

लोकप्रियतेचं, प्रसिद्धीचं आणि श्रीमंतीचं शिखर गाठूनही रजनीकांतनं आपली मातीशी आणि मैत्रीशी  असलेली नाळ तुटू दिलेली नाही. मेहनत करत राहिलं, तर बस कंडक्टर मित्र सुपरस्टार होऊ शकतोय, माणूसपण टिकवण्यासाठी मात्र दोस्तांना धरून राहिलंच पाहिजे!

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.