ब्राह्मण महासंघ म्हणतंय, गुलजार आणि जावेद अख्तरांसारखे विकृत साहित्य संमेलनात नको

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२० मध्ये होणं नियोजित होतं. मात्र कोरोनाच्या संसर्गानं थैमान घातलं आणि संमेलन पुढं ढकलावं लागलं. आता कधी होणार? कधी होणार? या चर्चेला ऑक्टोबर महिन्यात पूर्णविराम मिळाला.

संमेलनाच्या आयोजकांनी पत्रकार परिषदेत डिसेंबर महिन्याच्या ३, ४ आणि ५ तारखेला नाशिकमध्ये संमेलन होणार असल्याचं जाहीर केलं. आता संमेलनाला जसा साहित्याचा वारसा आहे, तसाच दुर्दैवानं वादांचाही.

यंदाच्या संमेलनाला जवळपास महिना बाकी असला, तरी वादाला आतापासूनच तोंड फुटलंय.

वाद कशावरून होतोय हे फिक्समध्ये सांगणार. त्याआधी जरा यंदाच्या संमेलनाबद्दल सांगतो. यंदाचं संमेलन नाशिकमधल्या ‘भुजबळ नॉलेज सिटी’मध्ये होणार आहे. खरंतर ते कॉलेज रोडवरच्या ‘गोखले एज्युकेशन सोसायटी’च्या आवारात होणार होतं, मात्र वाहनतळ व्यवस्था आणि संभाव्य वाहतूक कोंडीचा अंदाज घेत ठिकाण बदलण्यात आल्याचं आयोजकांनी सांगितलं.

डिसेंबर महिन्यात होणाऱ्या या संमेलनाची सुरुवात २ तारखेला सांस्कृतिक कार्यक्रमांपासून होईल. त्यानंतर, ३ तारखेला कुसुमाग्रजांच्या घरापासून ग्रंथदिंडी निघेल, दिंडी संमेलनस्थळी आल्यावर उदघाटन होईल. संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ व विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर असतील तर स्वागताध्यक्ष नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ असतील.

आता वाद कशावरून झालाय?

तर साहित्य संमेलनाचं उद्घाटन कुणाच्या हस्ते होणार यावरुन वाद पेटलाय. उद्घाटनाला ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, गायिका आशा भोसले, साहित्यिक गुलजार आणि जावेद अख्तर यांच्या नावाचा विचार होतोय. त्यात गुलजार आणि जावेद अख्तर यांची नावं आघाडीवर आहेत. आता या दोघांना किंवा दोघांपैकी एकालाही उद्घाटक म्हणून बोलावण्यास ब्राह्मण महासंघानं विरोध दर्शवला आहे.

काय आहे ब्राह्मण महासंघाचं म्हणणं?

ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे म्हणाले, ‘यंदाच्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी गुलजार आणि जावेद अख्तर या दोघांच्या नावाचा विचार होत आहे आणि तशी त्यांना विनंतीही करण्यात येत असल्याचं समजलं. या गोष्टीला आम्ही तीव्र विरोध करत आहोत. साहित्यसृष्टीत योगदान देणारे अनेक दिग्गज आज महाराष्ट्रात उपलब्ध आहेत, तरीही नेहमीच हिंदू धर्माच्या विरोधात लिहिणाऱ्या, बोलणाऱ्यांना बोलावून साहित्य संमेलनाचे पदाधिकारी नेमका काय संदेश देऊ पाहतायत?’

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यावरूनही टीका

‘२०१९ मध्ये झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना असाच सन्मान दिला गेला होता, आम्ही त्यावेळेसही विरोध केला होता. आदल्या दिवसापर्यंत ठीक असणारे दिब्रिटो पुस्तक पालखीच्या वेळेस आजारी पडले होते आणि मग पुन्हा मोठं भाषण करायला मोकळे होते,’ अशी टीकाही दवे यांनी केली.

गुलजार आणि अख्तर विकृत

दवे पुढं म्हणाले, ‘दिब्रिटो असतील किंवा गुलजार, जावेद यांना ना हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, ना हिंदू धर्माविषयी आदर. त्यामुळं या आत्मप्रेमी लोकांना अशा महत्त्वाच्या पदांचा सन्मान देऊ नये. डॉक्टर जयंत नारळीकरांसारखा संमेलनाध्यक्ष असताना, वीर सावरकर यांच्या भूमीत या विकृतांच्या हस्ते उद्घाटन होण्यास आमचा विरोध असेल.’

आता यावर साहित्य संमेलनाचे आयोजक काय भूमिका घेतात? गुलजार, अख्तर या टीकेला उत्तर देणार का? आणि जर गुलजार किंवा अख्तरांनी यायचं नक्की केलं, तर ब्राह्मण महासंघ काय करतो याकडे साहित्यप्रेमींचं लक्ष असेल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.