लेकरांच्या नावे कोण काय करत नाही आणि बाईनं रिक्षावाल्याच्या नावे करोडोंची प्रॉपर्टी केलीय

घरं, प्रॉपर्टी, पैसा म्हंटल कि प्रत्येकाचीच लाळ टपकते. ती कमवण्यासाठी बरीचजण आपलं आयुष्य घालवतात. आणि त्यांच्यानंतरची पिढी ती वाटून घेण्यासाठी आयुष्यभर भांड-भांड भांडते. मग ना कोणी भाऊ असतो, ना बहीण, ना कुठलं नातेसंबंध तेव्हा फक्त पैसाच समोर दिसतो.काही भांडण तर पार कोर्ट कचेऱ्यापर्यंत जातात.

आता कोणीही कसही असुदे पण आपल्या नंतर आपली प्रॉपर्टी आपल्या पोराबाळांच्या किंवा नातेवाईकांच्या नावावर केली जाते. पण ओडिसातली एक महिला याला अपवाद आहे. कारण या वृद्ध महिलेनं पुढचा मागचा विचार न करता आपली सगळी प्रॉपर्टी एका रिक्षा चालकाच्या नावावर केली आहे. 

आता तुम्ही म्हणाल काही पण काय, पण हे खरं आहे भिडू. 

ओडिसातल्या कटक जिह्यातल्या मिनाती पटनायक या ६३ वर्षीय महिलेनं आपली सगळी प्रॉपर्टी रिक्षा चालकाच्या नावावर केली आहे. या प्रॉपर्टीची किंमत जवळपास १ कोटी रुपये असल्याचे समजतंय.  ज्यात तीन मजली घर, दागिने आणि काही रोकड सुद्धा आहे. 

आता यामागचं कारण म्हणजे मिनाती पटनायक पूर्णपणे एकट्या आहेत. गेल्या वर्षीचं त्यांचा नवऱ्याची म्हणजे कृष्ण कुमार पटनायक यांची किडनी खराब झाली त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्या दुःखातून बाहेर पडत नाही तर त्याच वर्षी त्यांची एकुलती एक मुलगी कोमल हीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. त्यामुळे वयाच्या या टप्प्यात त्यांच्यासोबत आणि त्यांच्यामागे कोणीच नाही. 

त्यामुळेचं त्यांनी आपली प्रॉपर्टी या रिक्षाचालकाच्या नावावर केली आहे. विनंती यांच्या या निर्णयाला त्यांच्या दोन्ही बहिणींनी सुद्धा खूप विरोध केला. पण विनंती यांनी आपल्या निर्णयात कोणताच बदल केला नाही.

हा रिक्षाचालकाचं म्हणजे बुधा सामल. जे कटकमध्येच रिक्षा चालवतात आणि गेल्या २५ वर्षांपासून बुधा आणि त्यांचे कुटुंब मिनाती पटनायक यांच्यासोबत काम करतात. 

 

मिनाती पटनायक यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले कि,

“माझ्या नवऱ्याच्या आणि मुलीच्या मृत्यूनंतर मी पूर्णपणे एकटी पडले होते. माझ्यावर दुःखाचा डोंगर असताना सुद्धा माझ्या एकाही नातेवाईकाने मला मदत केली नाही. पण, हा रिक्षाचालक आणि त्याचे कुटुंब त्या वेळीही माझ्या पाठीशी उभं राहिलं. त्याने माझ्या तब्येतीचीही काळजी घेतली. त्यामुळे माझ्या मृत्यूनंतर कोणीही नातेवाईक त्यांना त्रास देऊ नये म्हणून मी माझी सर्व मालमत्ता कायदेशीर कारवाईद्वारे बुधा आणि त्यांच्या कुटुंबीयांना देण्याचे ठरवले आहे.”

मिनाती पुढे सांगतात कि, माझं कुटुंब मोठं आहे. आणि त्यांच्या कुटुंबात आणि नातेवाईकांकडे खूप मालमत्ता आहे आणि म्हणूनच त्यांना आपली सगळी संपत्ती आपल्या नंतर एका गरीब व्यक्तीला द्यायची होती. 

मिनाती यांच्या म्हणण्यानुसार, बुधा सामल हे त्यांच्या मुलीला तिच्या रिक्षातून कॉलेजला नेत असायचे. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाची बुधा यांनी खूप सेवा केली. त्यामुळेच त्यांनी त्यांची सर्व मालमत्ता त्यांच्या नावावर केली आहे. 

मिनाती म्हणतात की, बुधाला आपली मालमत्ता देऊन तिने कुठलं मोठं काम केलं नाही, तो त्याच्यासाठी पात्र होता.

आता बुधा यांच्याबद्द्दल सांगायचं झालं तर यांच्या कुटुंबात आई-वडील, पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असे एकूण सातजण आहेत. हे सर्वजण मिनाती यांना ‘आई’ म्हणून हाक मारतात.

बुधा सामल यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले कि,

“जेव्हा आईने मला तिचा निर्णय सांगितला, तेव्हा मी पूर्णपणे हैराण झालो. मी माझ्या आईच्या कुटुंबासाठी वीस वर्षाहून अधिक काळ काम केले आहे आणि जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत मी तिची सेवा करत राहीन. आईच्या या निर्णयामुळे माझ्या कुटुंबाचे आयुष्य बदललं आहे, त्यामुळे मी माझ्या सगळ्या कुटुंबासोबत एकाच छताखाली राहू शकेल.”

बुधा पुढे सांगतात कि, आईच्या सांगण्यावरून त्यांनी दोन वर्षांपूर्वी रिक्षा चालवणं सोडलं होत. आणि गेल्या चार महिन्यांपासून आईच्या सांगण्यावरूनचं ते आपल्या पत्नी आणि मुलांसह तिच्या घरी राहायला आले.

आता ही स्टोरी वाचून तुम्ही सुद्धा अशीच मदत करण्याच्या विचारात असाल, पण भिडू मदत जरूर करा, पण निस्वार्थी मनानं, काय माहित तुमचही नशीब चमकेल. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.