मुंबई दंगलीवर नियंत्रण आणणाऱ्या आयपीएस संजय पांडेंचं श्रीकृष्ण आयोगानं कौतुक केलं होतं…

राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना केंद्रीय लोकसेवा आयोगानं अपात्र ठरवलं आहे. त्यामुळं पांडे यांचं पद आता धोक्यात आलं आहे. महासंचालक पदावर काम करण्यासाठी आयोगाचा क्लियरन्स मिळणं गरजेचं असतं. आयोगानं पांडे यांना थेट अपात्रच ठरवल्यानं त्यांना क्लियरन्स मिळण्याची शक्यता उरलेली नाही. साहजिकच राज्याचे नवे महासंचालक म्हणून कोणाची निवड होणार याची चर्चा सुरू आहे.

या सगळ्यात संजय पांडे यांना अपात्र का ठरवण्यात आलं? असा प्रश्न पडणं स्वाभाविकच आहे.

हा वाद नक्की काय आहे?

तर गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या विषयाला लोकसेवा आयोगानं पत्र लिहीत उत्तर दिलं आहे. आयोगाच्या शिफारसीनुसार पांडे हे अपात्र असून त्यांच्याजागी पोलिस खात्यातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांची नावं आयोगानं सुचवली आहेत.

पांडे अपात्र ठरण्यामागचं मुख्य कारण म्हणजे, त्यांनी सरकारी सेवेमधून दोन वर्ष ब्रेक घेत खासगी क्षेत्रात काम केलं. सोबतच त्यांनी दोनदा राजीनामा दिलाही होता. त्यामुळं दोनदा सेवेत नसलेल्या अधिकाऱ्याला इतक्या मोठ्या पदाची जबाबदारी देण्याला लोकसेवा आयोगाकडून विरोध केला जाईल असा अंदाज आधीपासून व्यक्त करण्यात येत होता. आता आयोगानं पाठवलेल्या पत्रावर राज्य सरकार काय भूमिका घेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

विशेष म्हणजे पोलिस महासंचालकपदी निवड होण्याआधी पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत नाराजी व्यक्त केली होती. त्यांचं म्हणणं होतं की, ‘लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या महासंचालक पदी नियुक्ती करताना मला डावलून कनिष्ठ अधिकाऱ्याची वर्णी करण्यात आली. सुबोध कुमार जयस्वाल यांच्यानंतर महासंचालक पदाची जागा भरताना मला अतिरिक्त कार्यभार देण्याचा विचारही आपण केला नाहीत. त्यावेळीही कनिष्ठ अधिकाऱ्याचा विचार झाला. अँटिलिया स्फोटके प्रकरणानंतर, बदल्या झाल्या तेव्हाही मला डावलून आपण एका कनिष्ठ अधिकाऱ्याला महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. वरिष्ठ अधिकारी असूनही माझ्यावर वारंवार अन्याय होत आहे. माझ्या कामात काही कमी असेल, तर मला स्पष्ट सांगा. व्यक्तीगत पूर्वग्रहांमुळे माझी चांगली कारकीर्द धोक्यात आली आहे.’

त्यानंतर, पुढच्याच महिन्यात त्यांची महासंचालकपदी निवड झाली, मात्र आता लोकसेवा आयोगाच्या पत्रामुळं त्यांच्या पदावर टांगती तलवार आली आहे.

आता जाणून घेऊयात संजय पांडे यांच्या कारकिर्दीबद्दल-

संजय पांडे हे आयआयटी कानपूरचे विद्यार्थी, ते १९८६ च्या बॅचचे आयपीएस ऑफिसर आहेत. त्यांनी पुण्यात सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर, त्यांना मुंबईत डीसीपी पदाची जबाबदारी मिळाली. त्यातच मुंबईत दंगल उसळल्यानं पांडे यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं.

त्यावेळी पांडे यांनी, धारावीवर चांगलं नियंत्रण मिळवलं. हिंदू आणि मुस्लिम समाजात तेढ वाढू नये म्हणून त्यांनी मोहल्ला समितीची स्थापना केली. सोबतच त्यांनी अनेक शिवसेना कार्यकर्त्यांनाही रोखलं. पांडे यांच्या या कामामुळं मुंबई दंगलीचा तपास करणाऱ्या श्रीकृष्ण आयोगानं पांडे यांच्या कामाचं कौतुकही केलं होतं.

विशेष म्हणजे यावेळी शिवसेना आणि पांडे यांच्यात अनेकदा वादाची ठिणगी पडली होती.

त्यानंतर, पांडे यांनी नार्कोटिक्स विभागात काम केलं आणि मुंबईतल्या ड्रग्ज रॅकेटला आळा घातला. इकॉनॉमिक ऑफेन्स विंगमध्ये आणि होमगार्ड महासंचालक म्हणूनही त्यांनी काम केलं.

पांडे यांनी आतापर्यंत दोनदा आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते १९९९ मध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सुरक्षेसाठी तैनात होते. पुढं २००१ मध्ये त्यांनी राजीनामा सादर केला, मात्र तो मंजूर झाला नाही. ते प्रकरण कोर्टातही गेलं. २००५ मध्ये ते पुन्हा सेवेत आले आणि २० वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेण्याची इच्छा व्यक्त केली. ती देखील पूर्ण झाली नाही. त्यानंतर, ते २०११ मध्ये पुन्हा सेवेत रुजू झाले.

थोडक्यात त्यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे, त्यातच ते संचालकपदी कायम राहणार का नाही हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूका पाहता ठाकरे पांडेंना ग्रीन सिग्नल देणार की दंगलीवेळी झालेला सेनेसोबतचा संघर्ष लक्षात ठेवणार याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.