छत्रपतींवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या जेम्स लेनचं पुढे काय झालं ?

५ जानेवारी २००४. पुण्यातील सुप्रसिद्ध भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर जोरदार हल्ला झाला. शेकडोंचा जमाव या संस्थेवर चालून आला होता. अनेक पुस्तके व तिथली साहित्याची नासधूस करण्यात आली. तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या संपूर्ण प्रकरणाची कडक शब्दात निर्भत्सना केली.

भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर झालेल्या हल्ल्याची संपूर्ण देशभरात चर्चा झाली. संभाजी ब्रिगेडने हा हल्ला आम्ही केला असं सांगत त्याची जबाबदारी स्विकारली. सोबतच हा हल्ला का केला याच कारण देखील सांगितलं.

या हल्ल्यामागे होते जेम्स लेन प्रकरण

जेम्स डब्ल्यू लेन हा मूळचा अमेरिकन लेखक व प्राध्यापक. मिनेओस्टा नावाच्या राज्यात मॅकॅलेस्टर कॉलेजच्या धार्मिक अभ्यास केंद्राचा तो प्रमुख होता. सुप्रसिद्ध अशा हार्वर्ड विद्यापीठात त्याने थिऑलॉजी या विषयात त्याने डॉक्टरेट मिळवली होती.

धर्मशास्त्र विषयातील एक हुशार शिक्षक म्हणून तिथे त्याला ओळखलं जायचं. जवळपास १६ वर्षे तो आपल्या विद्यापीठात धर्मशास्त्र विषयाचा विभागप्रमुख म्हणून त्याने १६ वर्षे काम पाहिलं. त्याचा संस्कृतचा अभ्यास मोठा होता.भारत चीन सारख्या पूर्वेकडील देशांमधील धर्माचा तो अभ्यास करायचा.

अशातच त्याने भारतातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर एक पुस्तक लिहिले.

शिवाजी : हिंदु किंग इन इस्लामिक इंडिया’ 

असं सांगितलं जातं कि या पुस्तकाचा अभ्यास करण्यासाठी जेम्स लेन पुण्यात आला होता. त्याने भांडारकर प्राच्च संशोधन संस्थेत संशोधन केल्याचं सांगण्यात आलं. जेम्स लेनच पुस्तक ऑक्सफर्ड पब्लिकेशन या संस्थेने प्रकाशित केलं. या पुस्तकात जेम्स लेनने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अत्यंत बदनामीकारक लिखाण केलं होतं. 

जेम्स लेनच्या या वादग्रस्त पुस्तकावरून महाराष्ट्र पेटून उठला. यातूनच संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी भांडारकर इन्स्टिट्यूटवर हल्ला केला. याचे राजकीय पडसाद देखील उमटले. सर्व राजकीय नेत्यांनी या पुस्तकाचा निषेध केला. 

महाराष्ट्राच्या विधिमंडळात घनघोर चर्चा झाली. तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी या पुस्तकावर बंदी घातली. या बंदीवरून देखील महाराष्ट्रात दोन भाग पडले. एका बाजूचे म्हणणे होते कि जेम्स लेनच्या पुस्तकाला बंदी घातली पाहिजे तर दुसऱ्या बाजूचे म्हणणे होते कि बंदी व चर्चा यामुळे जेम्स लेन ला फुकट प्रसिद्धी मिळत आहे. हि बंदी नकोच. शिवाय अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या लोकांचं देखील असच मत होतं.

या जेम्स लेन प्रकरणात महाराष्ट्रातील काही इतिहास संशोधक व साहित्यिकांवर टीका झाली. जेम्स लेनला लिखाण करण्यासाठी मदत केल्याचे आरोप झाले. या वादाचे रंग बदलू लागले होते. 

गृह मंत्री आर आर पाटील यांनी जेम्स लेन याच्या मुसक्या बांधून त्याला भारतात परत आणण्याची घोषणा केली.  

तिकडे न्यूयॉर्क मधल्या ऑक्सफर्ड पब्लिकेशनने हे भारतीय समाजमनाची भावना लक्षात घेऊन माफी मागितली व  हे पुस्तक मागे घेण्याचा निर्णय घेतला. भारतात या पुस्तकावर कोर्ट केसेस देखील दाखल झाल्या. 

तिकडे जेम्स लेन मात्र निवांत होता. त्याची मॅकॅलेस्टर कॉलेजमध्ये प्राध्यापकी व्यवस्थित सुरु होती.त्याच्यावर प्रचंड आरोप झाले. अगदी  मारण्याच्या धमक्या देखील आल्या. पण जेम्स लेनच्या पाठीशी त्याची संस्था उभी राहिली.  दरम्यान जेम्स लेनने या राजकीय घटनेची सखोल पार्श्वभूमी देणारा Resisting My Attackers, Resisting My Defenders.या शीर्षकाचा  एक लेखही लिहिला. 

तत्कालीन उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी २००४ च्या १६ मार्चला ‘द हिंदू’ या वर्तमानपत्रात मुलाखत देताना ‘आपण या पुस्तकाच्या बंदीच्या विरोधात आहोत,’’ ठामपणे सांगितलं.

पुढे २०१० साली सर्वोच्च न्यायालयाने या पुस्तकावरील बंदी उठवली. जेम्स लेनच्या मुसक्या बांधून आणायच्या घोषणा हवेतच विरून गेल्या. भारतात ज्या जेम्स लेन वरून वाद विवाद होत होते त्या जेम्स लेनला अमेरिकेत त्याच्या विद्यापीठाने थॉमस जेफरसन पुरस्काराने सन्मानित करण्याचा निगरगट्टपणा दाखवला.

मात्र आज इतकी वर्षे उलटून गेली. भारतात व आंतरराष्ट्रीय पातळीवर जेम्स लेनची ओळख एक इतिहासाची मोडतोड करणारा लेखक अशीच आहे.

हे ही वाच भिडू:

 

English Summary:

January 5, 2004, The well-known Bhandarkar Institute of Oriental Studies in Pune came under heavy attack. Hundreds of people had marched on the organization. Many books and literature were destroyed. The then Chief Minister Sushilkumar Shinde sternly condemned the whole affair.

 

Web title: what happened to James laine controversial book over Chatrapati Shivaji Maharaj

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.