अमित शहांच्या पुणे दौऱ्यानं काय काय साध्य केलं?

गेल्या दोन-तीन दिवसांत तुम्ही पुण्यात चक्कर टाकली असेल, पेपर वाचले असतील किंवा बातम्या बघितल्या असतील… तर तुम्हाला सगळ्यात हॉट टॉपिक माहिती असणार, ‘तो म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुणे दौरा.’ पेपरच्या पहिल्या पानांवर, रस्त्यावर लागलेल्या फ्लेक्सवर आणि पुण्यातल्याच नाही तर राज्यातल्या बऱ्याच राजकीय कट्ट्यांवर सध्या अमित शहांच्या पुणे दौऱ्याची जोरदार चर्चा आहे.

या दौऱ्यात शहा यांनी कुठले कार्यक्रम घेतले, ते काय काय बोलले.. हे जाणून घेऊ.

केंद्रीय सहकार मंत्री झाल्यापासून अमित शहा यांनी पहिल्यांदाच महाराष्ट्र दौरा केला. शनिवारी अहमदनगर येथे वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहिल्यानंतर ते शनिवारी रात्री पुणे दौऱ्यावर आले. पुणे महानगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आलेली असल्यानं, शहा यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. अमित शहा पुण्याच्या व्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये राहिले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी राखीव असणाऱ्या सूटमध्ये शहा यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आल्याची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली.

शहा यांच्या दौऱ्याची सुरुवात पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई मंदिरात गणपतीचे दर्शन घेऊन झाली. त्यानंतर शहा यांनी चाकण येथे केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या नव्या वास्तूचं उदघाटन केलं. तळेगावच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण केंद्रालाही (एनडीआरएफ) त्यांनी भेट दिली. केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या आणि एनडीआरएफच्या कामाचं त्यांनी कौतुक केलं.

सहकारी विद्यापीठाची घोषणा 

त्यानंतर, वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थानच्या दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमात ते उपस्थित राहिले. यावेळी केंद्रीय सहकार मंत्री असणारे शहा काय घोषणा करणार, याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. ते म्हणाले, ”वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थान सहकार क्षेत्रात चांगलं काम करत आहे. देशातल्या सर्व सहकारी संस्थांना एकत्र आणण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर सहकार विद्यापीठ स्थापन करण्यात येईल. भारताला पुढच्या पाच वर्षांत पाच लाख कोटींची अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष्य गाठण्यात सहकार क्षेत्राचं अमूल्य योगदान असेल. सहकार क्षेत्र आणि व्यापक आणि सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच नवं सहकार धोरण आणण्यात येणार आहे,” अशी घोषणाही त्यांनी केली.

“मल्टीस्टेट सहकारी संस्थांमधल्या त्रुटी दूर करण्यात येतील आणि ग्रामीण भागाच्या विकासाला प्राधान्य देण्यासाठी प्राथमिक सेवा सहकारी संस्था जिल्हा सहकारी बँक, राज्य सहकारी बँक आणि नाबार्डशी जोडण्यात येतील. यांच्या माध्यमातून कृषी वित्त पुरवठा करण्यात येईल व आगामी काळात सेंद्रिय शेतीलाही प्राधान्य दिलं जाईल,” असंही शहा म्हणाले.

काँग्रेसवर टीका

पुणे महानगरपालिकेच्या आवारात शहा यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन केलं. सोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं त्यांनी लोकार्पणही केलं. त्यावेळी बोलताना त्यांनी, काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, ”डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न बिगरकाँग्रेसी सरकारनं दिलं. संविधान दिनही मोदी सरकारच्या कार्यकाळात सुरू झाला. काँग्रेसनं मात्र बाबासाहेब हयात असताना आणि नसतानाही त्यांना अपमानित केलं. बाबासाहेब संसदेत येऊ नयेत, म्हणून काँग्रेसनं प्रयत्न केले. आता मात्र काँग्रेस बाबासाहेबांच्या पाया पडत आहे.”

प्रचाराचा नारळ आणि महाविकास आघाडी लक्ष्य

पुणे शहर भाजपनं बूथ कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित केला होता. आगामी महापालिका निवडणुकांना समोर ठेऊन या माध्यमातून प्रचाराचा नारळ फुटणार हे जवळपास नक्की होतं. या कार्यक्रमात बोलताना शहा यांनी महाविकास आघाडीला आणि विशेषत: शिवसेनेला लक्ष्य केलं. २०१९ च्या निवडणुकांनंतर घडलेल्या राजकीय घटनांबद्दलही त्यांनी भाष्य केलं.

“२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मी शिवसेनेसोबत चर्चा केली होती. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका होतील आणि भाजपचा मुख्यमंत्री होईल यावर शिक्कामोर्तब झालं होतं. मात्र शिवसेनेनं सत्तेसाठी हिंदुत्वाशी तडजोड केली. शिवसेना दोन पिढ्या ज्यांच्याशी लढली, आज त्यांच्याच मांडीवर जाऊन बसली. महाविकास आघाडी सरकार राज्याचा विकास करु शकतं का? हे निकामी सरकार आहे, आगामी महानगरपालिका निवडणुकीपासून यांची अधोगती सुरू होईल. महाविकास आघाडी सरकार म्हणजे डीलर्स, ब्रोकर्स आणि ट्रान्सफर चालवणारं सरकार आहे. महानगरपालिका निवडणूका विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनंही महत्त्वाच्या आहेत,” असं म्हणत त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला.

भाजपला या दौऱ्याचा कितपत फायदा होणार हे आगामी निवडणुकांमध्ये कळेलच, पण पुण्यातल्या कट्ट्यांवर आणखी काही दिवस शहांच्या दौऱ्याची चर्चा रंगणार हे नक्की.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.