गोपीनाथ मुंडे आज हयात असते तर नाना पटोले ही भाजपचे नेते असते

अलीकडचीच एक गोष्ट आहे. देशात नुकताच जीएसटी लागू करण्यात आला होता. त्याबद्दल आपल्या पक्षातल्या खासदारांचं मत जाणून घेण्यासाठी मोदींनी दिल्लीत पंतप्रधान निवासमध्ये बैठक बोलावली. या बैठकीत मोदींनी जीएसटी बद्दल आपलं म्हणण मांडलं. खासदारांना काही प्रश्न आहेत का विचारलं. एक हात वर आला. सगळ्यांनी आश्चर्याने बघितलं.

ते भाजपचे भंडारा गोंदियाचे खासदार नाना पटोले होते.

मोदींनी त्यांना विचारा अशी खूण केली. नाना पटोले आपली शंका विचारू लागले. हा निर्णय कसा शेतकऱ्यांच्या हिताचा नाही व याचा संपूर्ण देशभरात पक्षाला कसा फटका बसेल हे सांगत होते होते. एवढ्यात त्यांच्या लक्षात आले की पंतप्रधानांना आपला प्रश्न आवडलेला नाही. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलत होते. नानाचा प्रश्न संपल्यावर रागाने लालबुंद झालेल्या नरेंद्र मोदींनी त्यांना एकच वाक्य सुनावलं,

आता तुम्ही मला शिकवणार का?

त्यानंतर ही बैठकच गुंडाळण्यात आली. नरेंद्र मोदींनी उलट प्रश्न विचारायचा नाही हा भाजप मधला एक अलिखित नियम नाना पटोलेनी मोडलाय हे स्पष्ट होतं. त्यांना त्याचे परिणाम भोगायला लागेल हे दिसत होतं. आपण त्यांच्या सोबत नाही हे दाखवण्यासाठी महाराष्ट्रातील इतर खासदार त्यांच्या पासून दूर उभे राहिले. फक्त जेष्ठ नेते नितीनजी गडकरी आले आणि हळूच कानात फक्त म्हणाले

इथे घरी बोलावले जाते आणि अपमान केला जातो.

भाजपमध्ये मोदी आणि शहांची हुकुमशाही चालते याचा उच्चार करणारा पहिला भाजप नेता म्हणजे नाना पटोले. खर तर ते मुळचे भाजपचे नव्हतेच. ते मुळचे कॉंग्रेसचे. पण गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वामुळे नाना पटोले भाजप मध्ये आले होते.

नाना पटोले यांचं मुळगाव सुकळी, जिल्हा भंडारा. वडील कृषिखात्यात नोकरीला होते, राजकारणाचा अर्थाआर्थी कोणता संबंध नाही. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला हा माणूस जिल्हापरिषदेची निवडणूक जिंकून राजकारणात आला.

तरुणपणीचा उत्साह, जनतेत केलेलं काम, शेतकऱ्यांसाठी दिलेला लढा यामुळे आपल्याला आमदारकीची संधी आहे याचा त्यांना विश्वास होता. पण पक्षाने त्यांना तिकीट दिले नाही. तरी त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली.पहिल्यांदा पराभव झाला.

पण १९९९ साली कॉंग्रेसने या युवा नेत्याला संधी दिली आणि त्यांनी त्याच सोनं केलं. नाना पटोले आमदार झाले.

त्यानंतर २००४ ला देखील परत आमदारकी जिंकून आणली. विदर्भात शेतकऱ्यांचे व ओबीसींचे नेते म्हणून त्यांनी स्वतंत्र ओळख बनवली. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बऱ्याचदा कॉंग्रेस मध्ये मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी ही त्यांची खडाजंगी व्हायची.

एकदा तर विधानपरिषदेच्या निवडणुकीत नानांनी कॉंग्रेसच्या उमेदवाराला मत देणार नाही म्हणून बंड पुकारले, तो उमेदवार पडला. विलासरावांच्या कोपाची तलवार आपल्यावर कोसळणार हे लक्षात आल्यावर नानांनी २००९ साली पक्ष सोडला आणि भाजप मध्ये गेले.

त्यावेळी गोपीनाथ मुंडे हे भाजपचे मोठे नेते होते.

केवळ भाजपचे नेते म्हणण्यापेक्षा ते महाराष्ट्रातील साऱ्या बहुजनांचे नेते होते. सर्व पक्षातील बहुजन नेत्यांना मुंडे यांच्या नेतृत्वाचा आधार वाटत होता. दुसऱ्या पक्षातील अनेक नेत्यांना मार्गदर्शन व मदत करताना नाना पटोलेंनी स्वतः पाहिलं होत.

मुंडे साहेबांच्या नेतृत्वामुळे पटोलेंनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश घेतला. भाजपला गावागावामध्ये पोहोचविण्यात व बहुजनांपर्यंत पोहोचविण्यात मुंडे यांची भूमिका मोठी होती.

भाजप मध्ये आल्यावर पटोलेंनी मुंडेंच्या नेतृत्वाखाली आमदारकी जिंकून दाखवली. इतकच नव्हे तर २०१४ साली राष्ट्रवादीचे केंद्रात वजन असलेले नेते प्रफुल्ल पटेल यांचा भंडारा-गोंदिया मतदारसंघात प्रचंड मोठा पराभव केला. जायंट किलर म्हणून संपूर्ण देशात त्यांची ओळख बनली.

पुढे जेव्हा भाजपची तेव्हा लाट होती. सगळा देश मोदी मोदी करण्यात व्यस्त होता. भाजपचे अर्ध्याहून अधिक खासदार थेट मान्य करत होते की मोदी होते म्हणून आपण निवडून आलो नाही तर आपल्या विजयाचे काहीच चान्सेस नव्हते. नाना पटोलेनां मात्र खात्री होती की विदर्भातील शेतकऱ्यानी आपल्याला जिंकून दिल आहे आणि आपण खरे उत्तरदायी त्यांनाच आहे.

त्यामुळे भाजपमध्ये गेल्यावर ही त्यांची बंडखोरी कधी शांत झाली नाही. कधी अन्याय होतोय असं वाटल तर ते पेटून उठू लागले. याचीच परिणीती मोदींसोबतच्या वादात आणि पर्यायाने भाजप सोडण्यात झाली. जेव्हा सगळ जग भाजपकडे आम्हाला पक्षात घ्या म्हणून नाक घासत होते तेव्हा नाना पटोले भाजप सोडून कॉंग्रेस कडे परतत होते.

जाताना ते एक म्हंटले,

मुंडे साहेबांमुळंच आज भाजपला राज्यात सत्ता मिळू शकली. एवढे आमदार निवडून येण्यासाठी मुंडे यांनी निर्माण केले संघटनात्मक बांधणी महत्त्वाची ठरली आहे, हे विसरून चालणार नाही.

खासदारकीच्या निवडणुकीत गडकरींकडून पराभव झाल्यावर काही जणांना वाटले की पटोले परत भाजपमध्ये येतील. पण आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या नानांनी मात्र संयम बाळगला. विधानसभा निवडणुकीत त्यांना विजय मिळाला.

पण आज जर गोपीनाथ मुंडे हयात असते तर नाना पटोले भाजप मध्येच असते असं खुद्द पटोलेच सांगतात.  

 हे ही वाचं  भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.