ना शाळा, ना सण, चेससाठी बालपण पणाला लावणाऱ्या प्रज्ञानंदमुळं भारताला चेसमधला सचिन मिळालाय

प्रज्ञानंद रमेशबाबू. हे नाव सध्या जबरदस्त ट्रेंडिंगमध्ये आहे. आता क्रीडा विश्वातला हा पोरगा ना क्रिकेट खेळतो, ना फुटबॉल. हा खेळतो चेस. भारतात अव्वल दर्जाचे चेस प्लेअर्स असले, तरी ट्रेंडिंगमध्ये येण्याची संधी त्यांना तशी अभावानेच मिळते. प्रज्ञानंद ट्रेंडिंगमध्ये आला, त्यामागचं कारण फार भारी आहे.

वय वर्ष १६ असणाऱ्या प्रज्ञानंदनं मॅग्नस कार्लसनला हरवलंय. सोप्या शब्दांत सांगायचं झालं, तर कार्लसन चेसचा सचिन तेंडुलकर आहे. त्याचे रेकॉर्ड्स, त्याची कीर्ती आणि खेळावरचं प्रभुत्व जगात भारी आहे. एवढ्या मोठ्या प्लेअरला हरवून प्रज्ञानंदनं आपल्यातलं टॅलेंट दाखवून दिलंय. विशेष म्हणजे, टॅलेंट दाखवून द्यायची ही काय पहिलीच वेळ नाही.

सगळ्यात आधी बघू कार्लसन व्हर्सेस प्रज्ञानंद मॅचमध्ये काय झालं..?

सध्या एअरथिंग्स मास्टर्स ही ऑनलाईन चेस स्पर्धा सुरू आहे. त्यात १६ वर्षांच्या प्रज्ञानंदची कार्लसनविरुद्ध होणारी लढत चर्चेचा विषय होती. त्यात प्रज्ञानंदनं सलग तीन मॅचेस गमावलेल्या. या स्पर्धेत होणाऱ्या मॅचेसमध्ये प्रत्येक प्लेअरला १५ मिनिटं आणि १० सेकंड्सचा मूव्ह बोनस असा वेळ नेमून देण्यात आला होता. स्पर्धेच्या आठव्या फेरीत प्रज्ञानंदनं कार्लसनवर ३९ मुव्ह्जमध्ये मात केली. विशेष म्हणजे कार्लसनकडे पांढऱ्या कवड्या होत्या, त्यामुळं पहिली चाल खेळण्याचा फायदा त्याला झाला होता. तरीही प्रज्ञानंदनं आघाडी घेतली. ३२ व्या मूव्हनंतरच कार्लसनचा पराभव होईल अशा शक्यता वाटत होत्या आणि पुढच्या सात मुव्ह्जमध्ये प्रज्ञानंदनं मोहीम फत्तेही करुन दाखवली.

ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद, ग्रँडमास्टर पी हरिक्रिष्णा यांच्यानंतर कार्लसनला टूर्नामेंटमध्ये हरवणारा प्रज्ञानंद हा फक्त तिसराच भारतीय खेळाडू ठरलाय.

वयाच्या १० व्या वर्षीच प्रज्ञानंद जगातला सगळ्यात लहान इंटरनॅशनल मास्टर बनला होता. पुढं त्यानं जगातला पाचवा सर्वात लहान ग्रँडमास्टर बनण्याची किमयाही साधली. या सगळ्यावर आता मातब्बर  कार्लसनला हरवल्यानं प्रसिद्धी आणि कौतुकाची मोहोरही उमटली आहे.

पण कार्लसनला हरवण्यापर्यंतचा प्रज्ञानंदचा प्रवास अजिबात सोपा नव्हता…

चेन्नईमधल्या पाडी नावाच्या एका उपनगरात प्रज्ञानंद राहतो. त्याची मोठी बहीण वैशाली ही सुद्धा चेस खेळते. २०१८ मध्ये तिला वुमन ग्रँडमास्टरचा किताब मिळाला. प्रज्ञानंदच्या घरची परिस्थिती सुरुवातीला बेताचीच होती. बँकेत काम करणारे त्याचे वडिलांना पोलिओ आहे. प्रज्ञानंदची बहीण कायम टीव्हीसमोर असायची, तिचं टीव्हीवरुन लक्ष हटवण्यासाठी आई-वडिलांनी तिला चेसचा क्लास लावला आणि दोन्ही भावंडांची स्वप्न आणि नशीबच बदलून गेलं.

दोन्ही मुलांच्या स्पर्धांसाठी त्यांची आई जगभरसोबत प्रवास करते. प्रज्ञानंदच्या कुटुंबानं कित्येक वर्ष एकही सण सोबत साजरा केला नाही. आपला खेळ रात्री आणखी बहरतो, हे माहीत असलेला प्रज्ञानंद मध्यरात्री सराव करायला प्राधान्य देतो. ज्या वयात पोरांसाठी शाळेतले मित्र म्हणजे आयुष्य असतात, त्या वयात प्रज्ञानंदला शाळेत जायला मिळत नाही. तो स्पर्धांमधून वेळ काढत फक्त काही महिनेच शाळेत जाऊ शकतो.

सध्या सुरू असणारी एअरथिंग्स मास्टर्स स्पर्धा ऑनलाईन आहे. याच्या मॅचेस भारतीय वेळेनुसार या मॅचेस रात्री होतात. त्यामुळं स्पर्धेच्या आधी काही दिवसांपासून प्रज्ञानंदनं आपलं खायचं, झोपायचं आणि सरावाचं वेळापत्रक बदललं. आपला हिरो असणाऱ्या कार्लसनला त्यानं हरवलं, तेव्हा जवळपास रात्रीचे दोन वाजले होते, एवढा मोठा विजय मिळवल्यानंतर प्रज्ञानंदनं काय केलं असेल तर… झोप काढली!

आजच्या घडीला पार सचिन तेंडुलकरनंही त्याचं कौतुक केलंय. अव्वल चेस प्लेअर्सची परंपरा असलेल्या भारतातून आता नवं टॅलेंट पुढं आलंय, जो दुसरा विश्वनाथन आनंद बनू शकतो किंवा पहिलावहिला प्रज्ञानंदही!

हे ही वाच भिडू:

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.