२२ वर्ष उलटून गेली, तरी अजूनही द्रविड-लक्ष्मणनं लिहिलेला इतिहास कुणी विसरलेलं नाय…

ऑस्ट्रेलियन टीम म्हणलं की, आपण हरणार हे गणित एकेकाळी डोक्यात अगदी फिट बसलं होतं. नाय म्हणायला हा एकेकाळ अनेक वर्ष चालला. मागच्या काही वर्षात आपण त्यांच्या वरचढ ठरलो असलो, तरी चिवट आणि चिडकी कांगारुसेना आजही सणकून डोक्यात जाते. या कांगारुसेनेनं दिलेल्या जखमा कधीच भरुन न येणाऱ्या आहेत, हे कुणीही सांगेल.

नाटकात किंवा पिक्चरमध्ये ऐतिहासिक पात्राची, एखाद्या सुपरहिरोची एंट्री होते, तेव्हा बॅकग्राऊंडला अंधार केलेला असतो.. तो चिरत हा हिरो आपल्या समोर येतो आणि आपल्याला लय भारी वाटतं. असं वाटतं या एका क्षणात दुनिया बदलून गेली. असाच क्षण भारतीय क्रिकेट इतिहासात आला होता, तो १४ आणि १५ मार्च २००१ या दोन दिवसांत.

निमित्त होतं, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, कोलकाता टेस्टचं.

हा तीच टेस्ट जिथं हरभजन सिंगनं हॅटट्रिक घेतली, तीच टेस्ट जिथं ‘बॉलर’ सचिन तेंडुलकरनं राडा घातलेला, तीच टेस्ट जिथं ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या तोंडावर बारा वाजले होते आणि तीच टेस्ट जिथं लक्ष्मण आणि द्रविडनं कहर केला होता.

सलग १५ टेस्ट जिंकून ऑस्ट्रेलियन टीम भारतात आली होती, सिरीजमधल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा बल्ल्या झालाच होता. त्यात दुसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात किती रन्स केले, तर ४४५. आणि भारतानं किती, तर १७१. आधीच एक टेस्ट हरलेल्या भारताला फॉलो ऑन स्वीकारावा लागला. चौथ्याच दिवशी विषय एन्ड होईल अशी गत होती.

नेमकी त्या दिवशी रंगपंचमी, मॅच बघायला टीव्ही समोर बसूनही पोरांनी ओढून ओढून रंग खेळायला नेलं पण त्याचवेळी तिकडं लांब कोलकात्यात काय होत होतं, हे पाहुयात.

दिवसाची सुरूवात केली शतकवीर लक्ष्मण आणि राहुल द्रविडनं, स्कोअर होता ४ आऊट २५४. या दोघांच्या बॅटिंग आणि स्वभावात एक गोष्ट कॉमन होती, ती म्हणजे संयम. भारताला टेस्ट ड्रॉ करायची असेल तर याच संयमाची गरज होती. चौथ्या दिवसाची सुरुवात मेडन ओव्हरनं झाली आणि नंतर एकामागोमाग एक ओव्हर्स पडत राहिल्या.

द्रविड-लक्ष्मण जोडीनं दोन गोष्टींचं प्रात्यक्षिक दाखवलं. चांगले बॉल कसे खेळून काढायचे आणि खराब बॉल पडलाच तर त्याच्यावर रन्स कसे वसूल करायचे. ऑस्ट्रेलियन तोफखाना आणि डोक्यावरचा सूर्य आग ओकत होता. पण ही जोडी काय दाद देईना.

ऑस्ट्रेलियन कॅप्टन स्टीव्ह वॉनं बॉलर्स बदलले, त्यांचे एन्ड बदलले, पण ही जोडी जराही हलेना. बॉल दोघांच्याही बॅटच्या अगदी मधोमध बसत होता, बघता बघता लक्ष्मणनं १५० रन्सचा टप्पा गाठला, पण द्रविडचा स्कोअर होता ९० बॉल्समध्ये ३० रन्स. टिपिकल द्रविड स्टाईल. तेवढ्यात बॉलिंगला शेन वॉर्न आला आणि द्रविडनं सलग तीन फोर मारत, वॉर्नला हताश केलं.

दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून खाली मान घातलेला वॉर्नचा फोटो बघण्यात अगदी परवा, परवापर्यंत लय भारी वाटायचं.

ही जोडी क्रीझला इतकी भारी चिकटली होती, की स्टीव्ह वॉनं खडूस रिकी पॉन्टिंगला बॉलिंग करायला लावली होती. दुसऱ्या सेशननंतर लक्ष्मणनं स्कोअरबोर्डला गती दिली, मार्क वॉला बाऊंड्री मारुन त्यानं आपली डबल सेंच्युरी थाटात पूर्ण केली. द्रविड मात्र निवांत खेळून कांगारु बॉलर्सला दमवत होता. आपल्या डावातल्या २०५ व्या बॉलला त्यानं कडक फॉर मारली आणि शतकाची बॅट उंचावली. सगळं ईडन गार्डन्स आनंदानं थरारलं.

भारतानं ४८० रन्सचा टप्पा पार केलेला, स्कोअरबोर्डची विकेटची बाजू मात्र ४ या आकड्यावरच थांबली होती. स्टीव्ह वॉनं मॅकग्रा आणि हेडन असं विचित्र कॉम्बिनेशन वापरुन पाहिलं, पण फरक शून्य होता. भारताचा स्कोअर ५०० पार गेलेला आणि जिंकण्याची छोटी का होईना पण आशा जागृत झाली होती.

दिवसाच्या शेवटच्या काही ओव्हर्स उरल्या होत्या, तेव्हा कुठं रन्सचा जोर आटला. दिवसातली शेवटची ओव्हर… कांगारु ओपनर जस्टिन लँगर बॉलिंगला आला, त्यानं पाच सिक्स खाल्ले असते, तरी ऑस्ट्रेलियाला गम नव्हता, त्यांना आशा फक्त विकेटची होती. 

जी त्याही ओव्हरमध्ये मिळाली नाही, उलट तीन रन निघाले. 

१४ मार्चचा खेळ संपला, तेव्हा भारताचा स्कोअर होता ४ आऊट ५८९. राहुल द्रविड १५५* आणि व्हीव्हीएस लक्ष्मण २७५*. दिवसभर ९० ओव्हर्स टाकून ऑस्ट्रेलियाला यश मिळालं नव्हतं. युद्ध जिंकून सैनिक परत येतात तशा अवस्थेत घामानं अंगाला चिकटलेले टीशर्ट घालून, गळ्याभोवती रुमाल बांधून द्रविड आणि लक्ष्मण पॅव्हेलियनकडे येत होते. सगळा भारत ती इमेज डोळ्यात साठवून घेत होता.

पुढच्या दिवशी ही पार्टनरशिप आणखी काही वेळ चालली, सचिन आणि भज्जीच्या बॉलिंगमधल्या जलव्यामुळं भारतानं मॅचही जिंकली. पण १५ मार्चपेक्षा १४ मार्चचा दिवस भारी होता. विकेटकिपर गिलख्रिस्ट आणि कॅप्टन स्टीव्ह वॉ सोडून नऊच्या नऊ ऑस्ट्रेलियन प्लेअर्सनी बॉलिंग टाकली. फक्त एक जोडी फोडण्यासाठी.. व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड.

त्या दिवसाच्या खेळानंतर द्रविड आणि लक्ष्मणला सलाईन लावण्यात आलं. कित्येक तास क्रीझवर उभं राहून त्यांचं शरीर कमकुवत झालं होतं… मन मात्र कणखर होतं.. अगदी पार्टनरशिपच्या न तुटलेल्या भिंतीसारखं.

कधी चुकून टाईम ट्रॅव्हलचा शोध लागला, तर ईडन्सच्या पायऱ्यांवर बसून लक्ष्मण आणि द्रविडला पॅव्हेलियनकडे येताना पाहायचंय… तोवर रंग खेळलो नसतो तरी चाललं असतं… हे वाटणं थांबणार नाही हे फिक्स.

हे ही वाच बोल भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.