विश्वनाथन आनंदला बुद्धिबळात हरवून वादात सापडलेला तरुण अब्जाधीश कोण आहे ?

भारताचा बुद्धिबळातील ग्रँडमास्टर विश्वनाथ आनंदला हरवणं एवढं सोप्प नसत.  जगभरातले अनेक बुद्धिबळपटू  त्याच्यापुढे हार मानतात. पण १३ जूनला आयोजित बुद्धिबळ  स्पर्धेत एका व्यवसायिकानं विश्वनाथनला हरवलं.  तो व्यावसायिक म्हणजे निखिल कामथ. ज्यानंतर अर्थातच प्रत्येकजण चाट पडलाय.

पण नंतर समजलं कि, निखिल कामथनं चीटिंग करून ही चेस मॅच जिंकली होती. निखिलनं स्वतः याबाबत खुलासा करून फसवणुकीसाठी माफी मागितली.  त्यानं  ट्विटरच्या माध्यमातून संगितलं कि, “विश्वनाथ आनंद सरांना हरवलं, याचा विचार करणं बकवास आहे. बुद्धिबळाच्या सामन्यात त्यांचा  पराभव करणं, म्हणजे सकाळी उठून थेट रेसिंग ट्रॅकवर १०० मीटर शर्यतीत युसेन बोल्टचा पराभव करण्यासारखंच आहे. “

यासह तो म्हणाला की, ” मी विश्वनाथ सरांसोबत खेळताना बुद्धिबळ खेळातल्या काही तज्ज्ञाची तसंच कम्प्युटरची मदत घेतली. मी केवळ मजेत आणि चॅरिटीसाठी हा सामना खेळला. माझ्याकडून मूर्खपणा झाला, यामुळे किती मोठं कन्फ्युजन होऊ शकत याचा मी विचार केला नव्हता. तरी यासाठी दिलगिरी व्यक्त करतो.”

निखिलच्या या ट्विट नंतर सोशल मीडियावर त्याच्यावर टीका केली जातेय. ज्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म  चेस डॉट कॉमवर ही मॅच झाली होती,  त्यांनी निखिलचं अकाउंट सस्पेंड केलं.

चॅरिटी इव्हेंटसाठी झाली होती मॅच 

दरम्यान, अक्षय पात्र फाउंडेशन नावाच्या एका एनजीओने कोरोनाग्रस्त पीडित कुटुंबियांच्या मदतीसाठी १३ जूनला एक चॅरिटी इव्हेन्ट आयोजित केला, ज्यात चेस मॅचची स्पर्धा ठेवली. ‘चेकमेट कोविड’ असं या इव्हेन्टच नाव होत. चेस डॉट कॉम या इव्हेन्टचे पार्टनर होते, जी एक ग्लोबल चेस कम्यूनिटी आहे. या मॅचमध्ये विश्वनाथ आनंद आमिर खासन, युजवेंद्र चहल, रितेश देशमुख, यांच्यासह १० फेमस व्यक्तीसोबत चेस खेळले होते. 

कोण आहे निखिल कामथ ?

बंगरुळुचा निखिल ऑनलाइन स्टॉक ब्रोकर कंपनी  जीरोधाचा को- फाउंडर आहे. ज्या कंपनीचा वर्षीच्या टर्नओव्हर १०० कोटींपेक्षा जास्त आहे. त्याच हे यश  त्यानं स्वबळावर कमवलंय.  त्याचा हा प्रवास काही सोपा नव्हता.  १४ वर्षाचा असतानाच त्यानं शाळा सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पदवीशिवाय नोकरी मिळणं महाकठीण काम. पण वयाच्या पाचव्या वर्षापासुनच त्यानं बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली होती. आणि हेच त्याच पैसे कमवण्याचं साधन बनलं.

त्यानं दोन वर्ष अनेक नामवंत खेळाडूबरोबर सामने खेळले पण त्यात आपलं काही होणार नाही, हे त्याला समजलं आणि त्यानं बुद्धिबळाचा  नाद सोडला.

त्यानंतर त्यानं अनेक व्यवसायात आपलं नशीब आजमावलं,  पण कुठं टिकाव लागला नाही. मग  १७ व्या वर्षी त्यांना आपला भाऊ नितीन कामथ सोबत ट्रेडिंग सुरू केलं. ज्यात त्याला समजलं कि,  किरकोळ गुंतवणूकदारांना ब्रोकरेजसाठी मोठ्या प्रमाणात शुल्क द्याव लागत. हेच डोक्यात ठेवत त्याने २०१० मध्ये जिरोधा नावानं  देशातील पहिली ऑनलाइन डिस्काऊंट ब्रोकरेज  कंपनी सुरू केली. 

सुरुवातीला फक्त पाच लोक या कंपनीत कामाला होते, जी आता देशातली सगळ्यात मोठी कंपनी बनलीय.

कंपनीचे २२ लाखांपेक्षा जास्त यूजर्स आहेत. तर ५ अब्ज ट्रेड्सची  दररोज नोंद होते. त्याचा वर्षाचा टर्नओव्हर १०० कोटी आहे. एवढंच नाही तर २०२० फोर्ब्जच्या देशातल्या सर्वाधिक १०० श्रीमंतांच्या यादीत निखील आणि त्याच्या भावाचं नाव आहे. महत्वाचं म्हणजे कोणत्याही जाहिरातींशिवाय त्यानं हे यश मिळवलय.  वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी त्यानं देशातील सर्वात तरुण अब्जाधीशाचा मान पटकावलाय.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.