पालखी नाचवण्यापासून बोंब मारण्यापर्यंत कोकणचो शिमगो लय भारी असा…

हिरवागार निसर्ग, समुद्रकिनारा, हापूस आंबे, नारळी- पोफळीच्या बागा, वाड्यांची देव-दैवत, गणपतीउत्सव, गाऱ्हाणं, काळ्या वाटण्याची उसळ, सागोती वडे, आंबोली, घावणे या गोष्टींवरून अख्ख कोकण डोळ्यासमोर आलं असेल. पण या सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ‘कोकणचो शिमगो….

शिमगा म्हणजे  कोकण वासियांची ओळख, म्हणजे कोकणी चाकरमाणूस कुठंही असला तरी शिमग्याच्या टायमाला मात्र तो आपल्या गावातचं असणार एवढं मात्र नक्की. कारण या शिमग्यात गावातल्या परंपरा आणि लोककलेचं जे दर्शन होत ना त्याची बातचं काही और आहे….

तसं कोकणात  शिमगा पाहायला मिळतो तो खासकरून रत्नागिरी जिल्ह्यात. पण या शिमग्याची प्रथा प्रत्येक गावानुसार, वाड्यांनुसार, खालचा पट्टा -वरचा पट्टा अशी वेगवेगळी असते. म्हणजे कुठे शिमगा ५ दिवसाचा असतो तर कुठे १२ दिवसांचा. कुठं वेगवगेळ्या परंपरा कुठं वेगळ्या रीतीभाती. पण मजा एकसारखीचं. 

असा हा कोकणचा शिमगा तिथीनुसार साधारण फाल्गुन शुद्ध पंचमीपासून म्हणजे होळीपासून सुरु होतो. पण या शिमग्याची लगबग दिवाळीसारखी ८ -१५ दिवस आधीच सुरु होते.  

शिमग्याचा पहिला दिवस असतो तो म्हणजे देवहोळीचा. शिमग्याची सगळ्यात महत्वाची प्रथा असते ती म्हणजे आपल्या ग्रामदेवतेची पालखी नाचवणं. गावकरी आपल्या ग्रामदेवतेची पालखी सजवतात ज्यात देवीची रूपं ठेवली जातात आणि ती पालखी देवळाबाहेर बाहेर काढून डोल ताश्यांच्या तालावर नाचवली जाते. कोणी पालखी खांद्यावर घेतं, कोणी डोक्यावर घेत, तर कधी ४-५ गावकरी मिळून ही पालखी गोल फिरवून नाचवतात. आणि या पालखीसोबत कोकणची मंडळी ठेका धरतात.  

पण यादरम्यान पालखी खाली ठेवता कामा नये. ती एकाच्या हातातून लगेच दुसऱ्यानी घ्यायला लागती. मग पालखी गावातून मिरवून सहाण्यावर आणली जाते. सहाण म्हणजे गावातली चावडी सारखी जागा. मग शिमग्याच्या बाकी प्रथा या सहण्यावरचं केल्या जातात. 

त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी असते ती गावहोळी. शिमग्याचा सगळ्यात महत्वाचा दिवस. या दिवशी गावातली मंडळी सुपारी आणि आंब्याची झाडं तोडून आणतात. ही झाडं तोडायला जाताना आणि तोडून आणताना सुद्धा ती वाजवत- गाजवत आणतात. मग सहाण्यावर पालखीसमोर आणून मोठा खड्डा खणून त्यात उभी करतात, त्याच्या बाजूला गवत रचून त्याची होळी करतात. 

मग त्या होळीची विधिवत पूजा केली जाते, खमंग पुरणपोळ्या नैवद्य म्हणून दाखवल्या जातात. गुरवाकडून गाऱ्हाणं घातलं जात, गावातील नवीन जोडपी या होळीत नारळ देतात आणि मग मोठ्यानं बोंब मारत होळी पेटवली जाते. जो पर्यंत होळी पूर्ण विझत नाही तो पर्यंत गावकरी तेथून काही हलत नाही, मग सकाळ का होईना. 

तिसऱ्या दिवशी असतो रोमबाट. लोककलांनी गजबजला दिवस. या दिवशी गावात संकासुर, खेळं, गोमूचा नाच, नमन  आणि सोंग नाचवली जातात. आता संकासुर म्हणजे राक्षसी कुळातला राजा. पण साधी भोळी कोकणची माणसं गेल्या कित्येक वर्षांपासून त्याची पूजा करतात. काळाकुट्ट अवतार, डोक्यात शंखु आकाराची टोपी, कंबरेला घुंगराचा चाळ आणि हातात वेठी, असा या संकासुरचा अवतार. त्याच्या हातातल्या वेठीनं  मार खाणं म्हणजे आशीर्वाद समजला जातो, ज्यामुळं रोगराई दूर होते असही म्हणतात.

तसंच सोंग नाचवली जातात. म्हणजे गावातली मंडळी ववेगवगेळी वेगभुषा करून पायात चाळ बांधून ढोलकीच्या तालावर पाय जमिनीवर आपटतात, ही वेगवेगळी  सोंग बघायला अख्ख्या गावातली मंडळी जमा होतात. ही हजारो वर्षांपूर्वीची ही परंपरा आजही कोकणची मंडळी जपून आहेत. 

पंचमीला म्हणजे शिमग्याच्या पाचवा आणि शेवटचा दिवस. शिमग्याच्या शेवटच्या दिवशी गावातली काही मंडळी मुखवटे आणि दशावताराची  कपडे घालतात, पुन्हा एकदा वाजत – गाजत मग ते दारोदारी शोबय मागतात. शोबय म्हणजे दान स्वरूपात पैसे. यादिवशी खेळ सुद्धा असतात. 

हा….कोकणातल्या काही गावांमधल्या शिमगा हा ७ दिवस असतो तर कुठे गुढीपाडव्याच्या दिवसापर्यंत असतो. जिथं गुढी उभारून शिमगा संपतो. आता गावावर प्रथा आणि परंपरा. पण, असं म्हणतात या शिमग्याच्या दिवसांमध्ये कुठलही शुभकार्य केलं जात नाही, कारण पाचही दिवस बोंब मारली जाते. त्यामुळे पाडव्याला शिमगा संपवून शुभकार्याला सुरुवात होते. 

ते काही असलं तरी एक गोष्ट मात्र खरी कि, या शिमग्याच्या कित्येक दिवसांच्या उत्सवात माहित नाहीस कसं पण  गावकऱ्यांना जागरण सुद्धा मानवत.  

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.