पेट्रोल, डिझेल तुतू-मीमी करत राहिले आणि लिंबाने दराचा विक्रम केला

सगळा देश पेट्रोलच्या भावाकडे बघत राहिला आणि एका शेतीमालाने सुमडीत त्यांच्याही पुढे जात  ‘किंग’चा मान मिळवला. पेट्रोल, डिझेल, एलपीजी, सीएनजी यांच्या चढाओढीच्या या खेळात बाजी मारलेली दिसतेय ‘लिंबाने’. लिंबाचे भाव सध्या इतके वाढले आहेत की, सोशल मीडियावर सर्रास त्याचे मिम्स आपल्याला बघायला मिळताय.

अजून तर गर्मीची सुरुवातच झाली आहे आणि ज्या गोष्टीची उन्हात सगळ्यात जास्त गरज असते तेच सगळ्यात जास्त भाव खाताना दिसतंय. देशभरात जवळपास लिंबू आता ३०० रुपये किलोने विकला जात आहे. एकेकाळी हेच लिंबू ५० रुपये किलोने विकले जायचे. केव्हा केव्हा तर भाजीवाल्याकडे सुट्टे पैसे नसले तर सहज एक-दोन लिंबू तो देऊन टाकायचा. आता तर परिस्थिती अशी झाली आहे की, एक लिंबू चुकून जरी आपण भाजीवाल्याकडे असच मागितलं तर असं बघितलं जातं जणू काय मोठा गुन्हा केलाय. 

सध्या पुण्याच्या घाऊक बाजारात एका लिंबाचा भाव ५ रुपये असून, तो किरकोळ बाजारात पोहोचेपर्यंत १० ते १२ रुपये प्रति नग असा होतो.

मग का झालंय हे लिंबू अचानक भयानकपणे इतकं महाग? जाणून घेऊया…

सध्या देशातील भाजीपाला विक्रेत्यांना घटत्या नफ्याचा सामना करावा लागत आहे. याच मुख्य कारण आहे वाढता वाहतूक खर्च. हा खर्च वाढला आहे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यामुळे. २२ मार्चपासून पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या किमतीत वाढ झाल्याने विक्रेत्यांना जास्तीचा वाहतूक खर्च द्यावा लागतोय. 

रशिया-युक्रेन युद्ध हे महागाईचे सर्वात मोठे कारण असल्याचे सरकारकडून सांगितलं जात आहे, कारण त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर परिणाम झाला आहे.

देशात आंध्र प्रदेश, गुजरात आणि तेलंगणामध्ये हा मोठा लिंबू उत्पादक पट्टा आहे. मोठ्या प्रमाणात लिंबू इथे पिकतात. मात्र या भागात यंदा हवामानाने साथ दिली नाही. गुजरातमधील प्रतिकूल हवामानामुळे लिंबाचे दरही तेजीत आहेत. चक्रीवादळामुळे कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमधील लिंबाचे पीक उद्ध्वस्त झाले.

त्यामुळे लिंबाचे उत्पादन घटले. तर दुसरीकडे वाढत्या उन्हाळ्यात देशामध्ये महत्त्वाचे सण साजरे होत असल्याने लिंबाच्या मागणीतही वाढ झाली आहे. परिणामी भाव वाढले आहेत.   

गुढीपाडव्याच्या सणामुळे पुरवठा कमी होता, कारण अनेक शेतकरी सोमवारी ट्रक घेऊन फिरकले नाहीत. मात्र, पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने वाहतूक शुल्कात वाढ झाल्याने भाजीपाल्याचे दरही वाढले आहेत,’ असे एक मार्केट एक्स्पर्ट म्हणालेत.

लिंबाच्या भाववाढीचा आलेख कसा आहे?

जानेवारीत एका लिंबाची किंमत २ रुपये होती. मार्चमध्ये ते भाव ५ रुपयांवर गेले आणि आता किरकोळ बाजारात एप्रिलमध्ये १० रुपयांपर्यंत वाढले आहेत. अनेक राज्यांमध्ये त्याची किंमत २० रुपयांपेक्षा जास्त आहे. 

घाऊक बाजारात लिंबाचा दर ३०० ते ५०० लिंबाच्या पिशवीसाठी २,००० ते २,५०० रुपये आहे. सगळीकडे किलोभर लिंबाचे दर ३०० च्या पार गेले आहेत. दिल्ली आणि उत्तराखंडमध्ये प्रति किलो लिंबाचे दर ३५० आहे, सुरत, नागपूर, कोलकात्यात ३०० भाव आहे, तर जयपूर, नोएडा, हरियाणामध्ये भाव ४०० च्या पुढेच आहेत.

दर उन्हाळ्यात मागणी वाढल्याने आणि पुरवठा कमी झाल्याने लिंबाचा दर वाढतो, असं मार्केट अभ्यासकांच म्हणणं आहे. हैदराबादमध्ये लिंबाचा भाव पहिल्या टप्प्यात भाव ७०० रुपये होता, तो आता ३५०० रुपयांवर पोहोचला आहे.

फूड अँड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशन (FAO) ने म्हटले आहे की जागतिक अन्नधान्याच्या किमती मार्चमध्ये सर्वकालीन उच्चांकावर पोहोचल्या आहेत. कारण रशियाच्या युक्रेनवर आक्रमणामुळे हे झालंय.

तर यूएन फूड अँड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशनने म्हटले आहे की, त्यांचा एक फूड प्राईझ  निर्देशांक आहे जो काही ठराविक शेतमालांसाठी आंतरराष्ट्रीय किमतींमधील मासिक बदलांचा मागोवा घेतो. तो  गेल्या महिन्यात सरासरी १५९.३ अंकांवर होता, फेब्रुवारीपासून त्यात १२.६ टक्क्यांनी वाढ झालीये.

येत्या काही दिवसांमध्ये लिंबाचे भाव कसे राहतील?

पिशवीतील लिंबाचे प्रमाण त्याच्या आकारानुसार ठरवले जाते. सध्या घाऊक बाजारात एका लिंबाचा भाव ८ रुपये आहे. पुढील दोन महिन्यांत किंमत अशीच राहण्याची किंवा वाढण्याची शक्यता असल्याचं बाजार विश्लेषकांचं म्हणणं आहे.

अशी आहे सर्व आकडेवारी आणि लिंबाचे भाव वाढण्याची कारणं शिवाय त्याची पुढची परिस्थिती… 

ऐन उन्हाळयात जेव्हा लिंबू-पाणी सगळ्यांच्या जीवाचा आधार असतो तेव्हा अशी भाववाढ झाल्याने अजूनच घसा कोरडा पडतोय की काय, असं सर्वाना वाटत आहे. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.