एकीकडे राज ठाकरेंना पाठींबा तर दूसरीकडे विरोध : भाजपची नक्की स्ट्रॅटेजी आहे तरी काय..?

राज्यात यंदा अचानक सभांची आणि आता अयोध्या दौऱ्यांची लाट आलीये. राज ठाकरे, आदित्य ठाकरे जाणारेत, शरद पवारांचे नातू राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार जाऊन आलेत,  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जायचं म्हणतायेत. मात्र यात एक ट्विस्ट असा आलाय की, राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध केला जातोय.

युपीमधील बीजेपीचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी “राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अन्यथा राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही,” अशी भूमिका घेतलीये.

१० मे ला त्यांनी अयोध्येत भव्य रॅली काढत या दौऱ्याला थेट आव्हान दिलंय. दरम्यान त्यांना ‘नमतं घ्या’ असं देखील बीजेपीच्या अन्य नेत्यांनी सांगितलंय. त्यांची मनधरणी सुरूच आहे, मात्र ते त्यासाठी तयार नाहीत. एका खासदारामुळे राज यांच्या अयोध्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतायेत. पण यामागे खरी गोम काय आहे ? याचे गुंतलेले धागेदोरे जरा नीट जुळवून घेण्याचा प्रयत्न करून निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करूया…

राज यांनी याआधी उत्तर भारतीयांबाबत घेतलेल्या भूमिकेवरून खासदार ब्रिजभूषण यांनी राज ठाकरेंकडे माफी मागण्याची मागणी केली. मात्र त्यांनी राज यांचा उल्लेख “ते कसले दंबंग नेते? उंदीर आहेत, महाराष्ट्राच्या बाहेर कधी निघाले नाहीत,” असं म्हटलं, ते एवढ्यावरच थांबले नाहीत. ‘ राज हे रावणापेक्षा देखील पापी आहेत, असही ते म्हणाले.

शिवाय देवेंद्र फडणवीस इकडे म्हणतायत ,भगवान राम यांचं दर्शन घेण्याचा सगळ्यांना अधिकार आहे तर ब्रिजभूषण म्हणतायत, “देवेंद्र यांना मला फोन करायला सांगा”. म्हणजे एकंदरीतच ते त्यांची पावर दाखवण्याचा प्रयत्न करतायेत.

म्हणून नक्की त्यांची पॉवर किती आहे? हा पहिला प्रश्न पडतो. 

त्यांचं उत्तर बघितलं तेव्हा कळतं की, ते ६ वेळा युपीतल्या कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार आहेत. त्यांचा मुलगा देखील आमदार आहे, त्यांची बायकोही एकवेळ खासदार राहिल्या आहेत. त्यामुळे ते लोकप्रिय असू शकतात. मात्र यात गोष्ट म्हणजे, इतक्या वेळी निवडून येऊन देखील त्यांना एकदाही मंत्रिपद मिळालेलं नाहीये.

म्हणून आपल्या मतदार संघातील होल्ड दाखवून ते राजकीय महत्त्वाकांक्षा साधण्याचा प्रयत्न करतायेत, असं बोललं जातंय.

पण यातला दुसरा प्रश्न येतोय, योगी आदित्यनाथ यांचही ब्रीजभूषण ऐकत नाहीत का ? खर तर बीजेपीचं ऐकत नाही म्हटल्यावर पक्ष ब्रिजभूषण यांच्यावर शिस्तभंगाची कार्यभवाही करत लगेच त्यांना पक्षातून काढू शकतो.

ब्लॅकमेलिंगला प्रोत्सहन देणारा बीजेपी पक्ष नाहीये. युपीमध्ये योगी सगळ्यात पावरफुल असताना त्यांचा फोन जाऊनही ब्रिजभूषण ऐकत नाही म्हटल्यावर अजून गंभीरपणे त्यांना दूर करण्याची प्रोसेस होऊ शकते. मात्र तस होत नाहीये. उलट त्यांची मनधरणी सुरु आहे.

यूपीतील बीजेपीचं ठीक आहे, त्यांना याचा तोटा होऊ शकतो, कारण ब्रिजभूषण यांनी आता हिंदू साधूंना सोबत घेतलं आहे. म्हणजे त्यांचा विरोध केला तर हिंदूंच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. म्हणून युपीतील बीजेपी मवाळ राहू शकतं. मात्र महाराष्ट्रातील बीजेपीचं काय? महाराष्ट्रात बीजेपीने राज यांच्या भूमिकेचं स्वागत केलंय. तेव्हा ते ब्रिजभूषण यांना थांबवू शकतात. पण तस फार घडताना दिसत नाही.

आता महत्वाचा मुद्दा, ब्रिजभूषण यांनी आताच हा पॉईंट का घेतलाय? त्यांना विरोध करायचा आहे, तर जेव्हा परप्रांतीयांना मारहाण केली तेव्हा हे कुठे होते. हेही प्रश्न सध्या उपस्थित होतात. 

त्यामुळे साहजिकच हे सगळे मुद्दे एकाच ठिकाणी येऊन थांबतात, की एकीकडे राज ठाकरे यांचा बीजेपी सपोर्ट करतेय भविष्यात त्यांच्यासोबत युतीची शक्यताही वर्तवतीये तर दुसरीकडे भाजपचेच खासदार राज ठाकरेंना विरोध करतायत. म्हणजे राज ठाकरेंना थेट विरोध भाजपचाच आहे  का ?

याच प्रश्नाच्या संदर्भात ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्याशी आम्ही बातचीत केली,  त्यांनी सांगितलं की…

याचे दोन अँगल आहेत. एक म्हणजे महाराष्ट्रात जे परप्रांतीय कामाला येतात ते युपीमधून जास्त आहेत. मतदान ते तिकडेच करतात. तेव्हा इथे ब्रिजभूषण यांच्या विरोधातून यूपीतील भाजप असं दाखवत आहे की, आमच्या मुंबईतील माणसांबद्दल आम्हाला खूप आस्था आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात राज यांचा सपोर्ट करून शिवसेनेच्या विरोधात पूरक उपयोग करून घ्यायचा.

दरम्यान राज यांना बीजेपी फार वाढू देणार नाही, हे ही लक्षात घ्या. कारण त्यामुळे बिजेपीला उद्या फटका बसू शकतो. म्हणजे एकाच मुद्यावरून दोन्हीकडे मतं मिळवायची अशी, दुहेरी नीती आहे ही. 

तर राज यांचा दौरा देखील याने थांबणार नाही. समजा राज यांनी माध्यम मार्ग काढला…

 “आमचं तेव्हा केवळ रेल्वे भरतीमध्ये मराठी लोकांना प्रयोरिटी मिळावी, असं म्हणणं होतं. तिथे त्यांच्यावर अन्याय होतो, आणि म्हणून एक-दोन ठिकाणी मारहाण झाली. मात्र ते पुन्हा पुन्हा टेलिव्हिजनवर दाखवून प्रचार केला गेला, की आम्ही खूप ठिकाणी मारहाण केली.

मात्र आमची भूमिका अशी होती की, उत्तर प्रदेशचा विकास झाला तर तिथल्या रेल्वेच्या नोकऱ्या, सरकारी नोकऱ्या त्यांच्या लोकांना मिळाव्या आणि इथल्या मराठी लोकांना. बाकी आमचं आणि युपीचं काही भांडण नाही”

असं राज यांनी म्हटल्यावर ब्रिजभूषण माघार घेतील, राज यांच्यावर माफी मागायचा प्रसंग येणार नाही, त्यांचं मराठी प्रेम समोर येईल आणि ते परप्रांतीय विरोधी नाही, असं स्पष्ट होऊन दौरा होईल. बीजेपीचे दोन्ही हेतू साध्य होतील.

यावर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांचं मत जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा ते म्हणाले…

पहिली गोष्ट म्हणजे ब्रिजभूषण याना मोठं करणं हा अजेंड्याचा भाग आहे. मराठी मीडियाने शिवसेनेला उचलून धरायचं ठरवलं आहे म्हणून मुद्दाम ब्रिजभूषण यांना मोठं केलंय. कारण ब्रिजभूषण अयोध्येचे नाही मात्र प्रोपर आयोध्येच्याच एका लल्लू सिंग नावाच्या बीजेपीचा खासदाराने ‘आम्ही राज यांचं स्वागत करू’ असं म्हटलंय.

यांच्याबद्दल कुणी दाखवताना मला तरी दिसत नाहीये. ही मराठी मीडियाने गमावलेली विश्वासार्हता आहे, नाहीतर युट्युब मीडियाची गरज नसती.

दुसरी साधी गोष्ट म्हणजे इथला बीजेपी राज यांना मोठं करतोय, तर हा एक खासदार अचानक असं का वागतोय.

ठळक मुद्दा म्हणजे ब्रिजभूषण हे लक्ष वेधून घेण्यासाठी करतायेत. तर महाराष्ट्रातले भाजपवाले त्याला गप्प करत नाहीयेत, कारण त्यांनीच उभं केलेलं हे पिल्लू आहे.

आजपर्यंत राज ठाकरेंचा हा उत्तर भारतीय लोकांचा विषय मायावती, नितीश कुमार, अखिलेश यादव यांनी वापरलाय. या विरोधाचं नेतृत्व आज बीजेपी करतंय. त्यांनी विरोधकांच्या हातातील हत्यार काढून घेतलंय. उद्या तडजोड झाली की हेच ब्रिजभूषण स्वतः राज यांचं स्वागत करतील. ते सगळं नाटक करतायेत आणि यामागे बीजेपीचं आहे, असं दिसतंय.

मग नक्की भाजपचं यावर काय म्हणणं आहे हे समजून घेण्यासाठी आम्ही बीजेपीचे नेते केशव उपाध्याय यांच्याशी बोललो. त्यांनी सगळ्यामुद्यावर थोडक्यात उत्तर दिलं की, ब्रजभूषण इतके महत्वाचे नाहीत. ते जे काही बोलतायत ते त्यांचं वयक्तिक मत आहे. आणि राज ठाकरे अयोध्येला जाऊच शकतात कारण तो त्यांचा अधिकार आहे. कोणी कुठेही जाऊ शकत, भगवान रामाचं दर्शन घेऊ शकतो. त्यांना कुणी थांबवू शकत नाही.

अशाप्रकारे राज यांच्या दौऱ्यावर उठणाऱ्या वेगवेगळ्या अँगलचा विचार केल्यावर निष्कर्ष निघतोय की, दौरा थांबण्याचं काही कारण नाहीये. एका व्यक्तीमुळे असं होणं अशक्य आहे. शिवाय बीजेपीने राज यांच्या हिंदुत्वाचं स्वागत केलं आहे मात्र इथे त्यांना राज यांचं हिंदुत्व शिवसेनेच्या विरोधात हवं आहे तर युपीमध्ये जुना मुद्दा काढून त्यांना राज यांना दाखवून द्यायचंय की, बीजेपीपेक्षा मोठं कुणी नाही.

एकंदरीत नाकापेक्षा मोती जड नको, असं धोरण बीजेपीचं असल्याचं तज्ज्ञांच्या बोलण्यातून समोर येतंय.

तुमचा काय निष्कर्ष लागतोय? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा…

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.