प्रोटोकॉल बाजूला सारून राज्याचे मंत्री संपादकांना भेटायला नाक्यावर येतात तेव्हा…

मध्यंतरी एक व्यंगचित्र चांगलंच व्हायरल झालं होतं, एक जण आपली ओळख पत्रकार म्हणून सांगतो  समोरुन प्रश्न येतो, ‘कोणत्या पक्षाचा?’ खरंतर ते व्यंगचित्र नाण्याची एकच बाजू दाखवतं, आजही असंख्य पत्रकार आहेत जे न्यायासाठी आणि लोकांच्या हक्कांसाठी झगडतायत. ज्यांच्या प्रतिमेला  काही जणांमुळे धक्का पोहोचतो.

पण असं चित्र कायमच होतं का ? तर अजिबात नाही.

लोकमान्य टिळक आपल्या अग्रलेखांमधून थेट इंग्रज सरकारलाच फैलावर घ्यायचे. त्यांचे अग्रलेख हा गल्ली ते दिल्ली चर्चेचा विषय असायचा. सोबतच वाचावा’च’ असा अग्रलेख लिहिणारं नाव म्हणजे नाट्याचार्य कृष्णाजी खाडिलकर. टिळकांसोबत काम करणारे खाडिलकर इतके प्रतिभावान होते, की केसरीत त्यांचा लेख कुठला आणि टिळकांचा लेख कुठला हे सुद्धा चटकन ओळखू यायचं नाही.

खाडिलकरांनी मराठी पत्रकारितेत क्रांती करणारं पाऊल उचललं आणि १९२३ मध्ये ‘नवा काळ’ची स्थापना केली. मराठी पत्रकारितेमधला खरोखरच नवा काळ सुरू झाला. नवा काळमधले अग्रलेख इतके स्पष्ट आणि रोखठोक असायचे की खाडिलकरांवर राजद्रोहाचा गुन्हाही दाखल झाला होता.

 त्यांच्यानंतर त्यांच्या मुलानं अप्पासाहेब खाडिलकरांनी काम पाहिलं आणि १९६४ मध्ये अप्पासाहेबांनंतर नवा काळचे संपादक झाले कृष्णाजी खाडिलकरांचे नातू नीळकंठ खाडिलकर म्हणजेच निळूभाऊ.

खरंतर निळूभाऊंबद्दल लिहिताना इतकी मोठी पार्श्वभूमी लिहायची काहीच गरज नव्हती, कारण त्यांची ओळखच ‘अग्रलेखांचे बादशहा’ अशी होती. पण ही पार्श्वभूमी यासाठी लिहिली की, निळूभाऊंना मिळालेल्या वारशामुळं त्यांच्यावरची जबाबदारी दसपट वाढली होती, जी त्यांनी समर्थपणे पेलली.

त्यांच्या अग्रलेखांमध्ये जहरी टीका असायची आणि सरकारवर ओढलेला आसूडही.

दुसऱ्या बाजूला पत्रकारितेत गाजणारं आणखी एक नाव होतं प्रमोद नवलकर. अर्थात त्यांच्यात आणि निळूभाऊंमध्ये बराच फरक होता. कारण निळूभाऊंचे अग्रलेख सरकार हादरवायचे आणि नवलकरांचं ‘नवशक्ती’ मधलं ‘भटक्याची भ्रमंती’ हे सदर लोकांमध्ये खळबळ उडवून द्यायचं.

या सदरातून त्यांनी वाचकांसमोर सगळी मुंबई उभी केली. त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि वेश्या व्यवसाय, मटक्यांचे अड्डे, स्मगलिंग, भ्रष्टाचार याबाबतच्या बऱ्याच घटनांचा पट लोकांसमोर उलगडला. त्यांनी भ्रमंती नावाचा दिवाळी अंक तब्बल २५ प्रकाशित केला आणि त्यात लिहिण्यापासून गठ्ठे पोहोचवण्यापर्यंतचं काम प्रचंड तडफेनं केलं. अनेक वृत्तपत्रांमधून नवलकरांचं लिखाण प्रसिद्ध व्हायचंही आणि लोकं त्या लिखाणावर भरभरुन प्रेम करायचे.

इतकी प्रसिद्धी असूनही नवलकर साधे होते, त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून कुठंही उद्धटपणा किंवा गर्व जाणवायचा नाही. जसं लिखाणात नवलकर बादशहा होते, तसंच राजकारणातही. अगदी शिवसेनेची स्थापना झाल्यापासूनचे ते कडवट शिवसैनिक आणि बाळासाहेबांचे कट्टर समर्थक.

१९७२ मध्ये संपूर्ण देशात इंदिरा लाट होती, काँग्रेसच्या उमेदवारांपुढं इतरांचा सुपडा साफ झाला होता. मात्र तरीही गोरेगावमधून नवलकर निवडून आले. मुंबईत निवडून आलेले ते एकमेव बिगरकाँग्रेसी आमदार होते.

पुढच्या काळात विधानसभा असूद्या किंवा विधानपरिषद नवलकर भाषणाला उभे राहिले की सभागृह स्तब्ध व्हायचं.

१९९५ मध्ये राज्यात युतीचं सरकार आलं. बाळासाहेबांचे सच्चे सैनिक असलेल्या नवलकरांना प्रचंड अनुभव, जनतेवरची पकड आणि अभ्यासामुळं मंत्रीपद मिळालं. राज्याचं परिवहन आणि सांस्कृतिक मंत्रिपदाचं खातं त्यांच्याकडं होतं.

कामाचा धडाका सुरू असला, तरी मंत्रीपदामुळंही नवलकरांच्या व्यक्तिमत्त्वात फारसा फरक पडला नाही, ते आधीइतकेच साधे आणि अघळपघळ होते.

नवलकरांचा वाढदिवस असायचा २३ जानेवारीला. त्याच दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही जन्मदिन. प्रत्येक २३ जानेवारीला नवलकर सगळ्यात आधी बाळासाहेबांकडे जायचे, मग गिरगाव चौपाटीसमोरच्या नेताजींच्या पुतळ्याला वंदन करायचे आणि मगच आपला वाढदिवस साजरा करायचे.

निळूभाऊंचाही २३ जानेवारीचा शिरस्ता कधी चुकायचा नाही, ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निस्सीम भक्त. नेताजींवर त्यांची अपार श्रद्धा होती. त्यामुळं तेही नेताजींच्या पुतळ्याजवळ स्वच्छता आहे ना, त्यांच्या गळ्यात चंदनाची माळ आहे ना, या गोष्टींकडे बारीक लक्ष देऊन असायचे.

निळूभाऊंनी एकदा नवलकरांना विनंती केली की, पुतळ्याच्या आजूबाजूला सुशोभीकरण करायला हवं. नवलकरांनी लागलीच हे काम केलं, तेही स्वतःच्या देखरेखीत.

नेताजींच्या जयंतीच्या दिवशी सकाळी सकाळी निळूभाऊ पुतळ्याजवळ आले, नवलकरही तिथं होते. निळूभाऊंना उभं राहिलेलं बघून सगळ्यात आधी त्यांनी एक खुर्ची मागवली आणि निळूभाऊंना त्यावर बसायला लावलं.

आजूबाजूच्या कार्यकर्त्यांची लगबग झाली, पण नवलकर मात्र उभेच होते.

त्यांनी आपला प्रोटोकॉल, मंत्री असणं हे सगळं बाजूला ठेवलं आणि एक अग्रलेखांचा बादशहा आणि एक मंत्री गिरगाव चौपाटीसमोर मोकळ्याढाकळ्या गप्पा मारत होते.

त्यादिवशी तिथल्या नागरिकांनी निळूभाऊंचा प्रभावीपणा पाहिला आणि नवलकरांचा साधेपणाही. असा आपला महाराष्ट्र आणि अशी आपली राजकीय संस्कृती…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.