बाळासाहेबांना अटक झाल्यावर प्रबोधनकारांनी गनिमी काव्याने अग्रलेख छापून आणला

६ फेब्रुवारी १९६९. तेव्हाचे उपपंतप्रधान मोरारजी देसाई मुंबई दौऱ्यावर येणार होते. शिवसेनेने बेळगाव सीमाप्रश्नासाठीचा लढा तीव्र केला होता. मोरारजींना मुंबईत पाऊल ठेवू देणार नाही अशी भूमिका सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मांडली होती.

तरीही मोरारजी देसाई मुंबईला आले.

माहीम कॉजवे येथे त्यांची गाडी अडवण्यात आली पण मोरारजींना वाचवण्याच्या नादात त्यांच्या ड्रायव्हरने जमावावर गाडी घातली. त्यांच्या ताफ्याने उडवले काही शिवसैनिक जबर जखमी झाले. तिथेच भडका उडाला.

बाळासाहेबांनी गाडीवर उभे राहून संतप्त भाषण केले.

हा लढा चिरडायला रणगाडे आणावे लागतील हे सुप्रसिद्ध वाक्य याच भाषणामधलं!

आक्रोशाचा वणवा संपूर्ण मुंबईत पसरला. पोलिसांनी १४४ कलम लागू केलं.

जमाव दिसल्यावर लाठीचार्ज सुरू झाला. गॅसची नळकांडी फोडली. घराघरात घुसून शिवसैनिकांना मारहाण केली जात होती. नेत्यांना धरपकड सुरू झाली. गोळीबार देखील करण्यात आला. वीस जण ठार झाले.

या दडपशाहीने दंगल आणखी भडकतच चालली होती.

दुसऱ्या दिवशी पहाटे खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मनोहर जोशी यांना अटक झाली, त्यांना तातडीने येरवड्याला हलवण्यात आले.

त्याकाळी शिवसेनेचे मुखपत्र सामना अजून अस्तित्वात आले नव्हते. मार्मिक हे व्यंगचित्र साप्ताहिक हेच त्यांचे प्रमुख अस्त्र होते. या साप्ताहिकात छापून येणारे बाळासाहेबांच्या कुंचल्याचे व शब्दांचे फटकारे सरकारला गारद करत होते.

पंढरीनाथ सावंत हे पत्रकार तेव्हा बाळासाहेबांना संपादनात मदत करायचे.

त्यांचं स्वतःचं टोच्या हे सदर तेव्हा मार्मिकमध्ये तुफान गाजलं होतं. पंढरीनाथ सावंत हे प्रबोधनकार यांनी लिहिलेला अग्रलेख टाइप करण्यापासून प्रत्येक गोष्टीत मदत करायचे.

जेव्हा बाळासाहेबांना अटक झाली तेव्हा त्यांची भूमिका नेमकी काय हे जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी मार्मिकचा अंक छापले जाणे अत्यंत महत्वाचे होते.

पण सर्वत्र संचारबंदी असल्यामुळे अंक छापला जाईल का याची शंका होती. मार्मिकचे प्रेस तेव्हा प्रभादेवीला होते. तर ठाकरे कुटूंबीय वांद्र्याला रहात होते.

बाळासाहेबांना अटक झाली त्या सकाळी पंढरीनाथ सावंत नेहमीप्रमाणे अग्रलेख आणण्यासाठी काळा चौकी येथून वांद्र्याला निघाले. सगळी कडे पोलीसांचा कडक बंदोबस्त होता. कोणालाही शंका येऊ नये म्हणून सावंत यांनी चुरगाळलेला सदरा विजार घातली होती.

भल्या सकाळी अगदी पोलीस चौकीच्या समोरून फुटपाथवरून पंढरीनाथ सावंत बाळासाहेबांच्या घरी पोहचले.

प्रबोधनकार ठाकरे यांनी ते येतील न येतील म्हणून स्वतःच अग्रलेख टाईपरायटरवर ठोकून काढला होता.

तरीपण प्रश्न होता की प्रभादेवीच्या प्रेसमध्ये हा अग्रलेख नेऊन द्यायचा कसा? अखेर प्रबोधनकार ठाकरेंना आयडिया सुचली.

त्यांनी पंढरीनाथ सावंत यांना सदरा विजार काढायला लावले. पट्ट्या पट्ट्याची चड्डी आणि भोकं पडलेलं बनियन या वेशात भांग उलटा पाडून पंढरीनाथ सावंत रामा गडी बनले.

ठाकरेंच्या बंगल्याच्या गेटबाहेर देखील पोलिसांचा गराडा होता त्यांच्या नाकावर टिच्चून पंढरीनाथ सावंत तिथून बाहेर पडले.

प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेला धगधगता अग्रलेख काखेत लपवून त्यांची स्वारी चालत प्रभादेवीच्या दिशेने निघाली. पोलीस उभे असलेला रस्ता बदलून त्यांना चुकवत चुकवत ते पायी वाट तुडवत निघाले होते.

तरीही माहीमजवळ त्यांना पोलिसांनी अडवले. दोन तडाखे दिले. पोलीस इन्स्पेक्टर त्यांना म्हणाला,

“भडव्या या गोळीबारातून कुठे मरायला निघालास?”

तेव्हा दिनवाणा चेहरा करून सावंत म्हणाले,

“दरगाह पे जा रहा हूं साब”

पोलिसाला वाटले की हा मुसलमान भिकारी आहे आणि दर्ग्यावर फुकट खायला मिळते म्हणून तिकडे निघालाय. त्याने त्यांना आणखी एक काठीचा दणका दिला व उस तर्फसे जावं म्हणून इशारा केला.

कसबस तडफडत अंगावर चड्डी बनियन या वेशात पंढरीनाथ सावंत प्रभादेवीच्या इंडस्ट्रीयल इस्टेट मध्ये घुसले.

लपून छपून मार्मिकचा अंक छापून आणला. याच अंकात श्रीकांतजी ठाकरे यांनी बाळासाहेबांनी काढलेल्या वाघिणीच्या चित्राला जेरबंद झालेले दाखवून त्या खाली कधी येशील रे परतून असा मथळा छापला होता.

प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेला म्हैसूरचा भात आणि महाराष्ट्राला लाथ हा अग्रलेख तुफान गाजला.

मात्र त्यातल्या त्या वाघाच्या फोटोने शिवसैनिकांना मोठी हिंमत दिली. नेते नसतानाही शिवसैनिक लढत राहिले. सरकारने मार्मिकचे अंक जप्त करण्याचा आदेश दिला होता मात्र त्यांच्या हाती एकही अंक लागला नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.