क्लिन-पार्टी फक्त नावाला? ‘आप’चे डझनभर नेते विनयभंग ते भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जेलमध्ये गेलेत..

काल नवी दिल्लीचे आरोग्यमंत्री आणि आप नेते सत्येंद्र जैन यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. आधी त्यांना ताब्यात घेतलं गेलं, मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांची चौकशी केली. त्यानंतर काही वेळातच त्यांना अटक करण्यात आली. मुख्य म्हणजे चार महिन्यांपूर्वीच केजरीवाल यांनी याबद्दल अंदाज व्यक्त केला होता. 

प्रकरण काय आहे?

सत्येंद्र जैन यांना ४ कोटी ८१ लाख रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे. कोलकाता इथल्या बेनामी कंपन्यांमधील हवाला गुंतवणूक प्रकरणी ईडीनं ही कारवाई केली आहे. २०१४-१५ मध्ये सत्येंद्र जैन मंत्रिपदावर असताना त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कलकत्त्याच्या शेल कंपन्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. 

या प्रकरणी ईडीनं सत्येंद्र जैन यांची यापूर्वी चौकशी केली होती. सत्येंद्र जैन यांच्यावर ईडीनं ५ एप्रिल रोजी कारवाई करत त्यांची ४.८१ कोटी रुपयांची संपत्ती तात्पुरती जप्त केली होती.

सत्येंद्र जैन यांच्यासह अरविंद केजरीवाल यांच्यावर भाजपच्या कपिल मिश्रा यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. सत्येंद्र जैन यांनी नवी दिल्लीच्या परिसरात जमीन खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी या पैशांचा वापर केल्याचा ईडीला संशय आहे. तर २०१०-१२ या वर्षात नवी दिल्ली इथल्या कंपन्यांच्या माध्यमातून ११ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या अवैध व्यवहारांमध्ये ते सहभागी होते, असा आरोपही सीबीआयने केला आहे.

सत्येंद्र जैन यांना या संदर्भात विचारणा केली असता, प्रश्नाची योग्य उत्तर देत नव्हते. माहिती लपवत होते. या कारणावरून त्यांना अटक करण्यात आली आहे,

असं सांगितलं जातंय.

सत्येंद्र जैन हे अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. केजरीवाल यांचे निकटवर्तीय म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. सत्येंद्र जैन यांनी अण्णा हजारेंच्या आंदोलनात देखील महत्त्वाची भूमिका बजावली होती.

ईडीच्या कारवाईनंतर आपने भाजपवर निशाणा साधला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले आहेत की, ८ वर्षांपूर्वीचा या खटल्याला आता पुन्हा सुरुवात झाली कारण सत्येंद्र जैन हे हिमाचलचे निवडणूक प्रभारी आहेत. हिमाचलमध्ये भाजपचा पराभव होत आहे. तेव्हा सत्येंद्र जैन हिमाचलला जाऊ नये म्हणून त्यांना अटक करण्यात आली आहे.

तर “आम्ही ना भ्रष्टाचार सहन करतो ना भ्रष्टाचार करतो. आमचे अत्यंत प्रामाणिक सरकार आहे. राजकीय कारणांमुळे त्यांना लक्ष्य करण्यात आले आहे,” अशी प्रतिक्रिया केजरीवाल यांनी दिलीये.

देशातील एकमेव प्रामाणिक सरकार असल्याचा दावा आप नेहमीच करत आला आहे.  म्हणून जैन यांच्यासंदर्भात त्यांची ही प्रतिक्रिया काही नवल वाटण्यासारखी नाही. मात्र एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे –

इतका प्रामाणिक पक्ष असल्याचं सांगत असले तरी आपचे अनेक नेते आजवर कोणत्या ना कोणत्या प्रकरणात जेलवारी करून आले आहेत. 

अशाच नेत्यांचा हा आढावा…

१) विजय सिंगला

अगदी ताजं प्रकरण. पंजाब सरकारमधील आरोग्य मंत्री विजय सिंगला यांना २४ मे २०२२ रोजी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. आरोग्य विभागाशी संबंधित टेंडरमध्ये एक टक्का कमिशनची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली.  त्यानंतर अँटी करप्शन शाखेने त्यांना अटक केली. 

सिंगला यांनी त्यांचे ओएसडी प्रदीप कुमार यांच्याकडे लाचेची रक्कम मागितल्याचा आरोप आहे. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर २७ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तसेच १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

५२ वर्षीय विजय सिंगला हे पंजाबमधील मानसाचे आमदार आहेत. त्यांनी मानसा मतदारसंघातून कॉंग्रेसचे उमेदवार सिद्धू मुसेवालाचा पराभव केला होता. सिंगल यांनी १९ मार्च रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना आरोग्य मंत्रालय देण्यात आलं होतं.

२) निशा सिंह 

लंडन बिझिनेस स्कूलमधून एमबीए पदवीधर असलेल्या निशा सिंग यांनी आपली कॉर्पोरेट नोकरी सोडून आप पक्षाकडून गुडगावमध्ये नगरपालिका निवडणूक लढविली होती. त्यानुसार २०१४ मध्ये त्यांनी पक्षात प्रवेश केला होता. त्यांना गेल्या महिन्यात म्हणजे एप्रिल २०२२ मध्ये गुरगाव जिल्हा न्यायालयाने सात वर्षांच्या सश्रम तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

२०१५ मध्ये हुडाच्या (HUDA) अतिक्रमणविरोधी मोहिमेविरोधात हिंसाचार भडकवणे, पोलिस कर्मचारी आणि सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या जमावाला चिथावणी देणे असे त्यांच्यावर आरोप होते ज्यात त्यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. शिक्षेनुसार सध्या त्या तुरुंगात आहेत. 

३) युवराजसिंह जडेजा

गुजरातमधील आम आदमी पार्टीचे नेते युवराजसिंह जडेजा यांना देखील गेल्या महिन्यात ६ एप्रिलला साबरमती मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

गांधीनगर इथल्या पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेरील पोलिसांशी हुज्जत घालणे, धक्काबुक्की करणे, पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, त्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणे आणि पोलिसांच्या वाहनाला धडक देणे या आरोपांखाली जडेजा यांना अटक करण्यात आली होती. त्यांचा पोलिसांवर गाडी चढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा १० सेकंदाचा व्हिडिओही पोलिसांनी जारी केला होता.

त्यानंतर त्याची रवानगी सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली.

४) सोमनाथ भारती 

आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी कायदामंत्री सोमनाथ भारती सगळ्यात वादग्रस्त राहिले आहेत. २०१५ मध्ये पत्नीच्या हत्येचा प्रयत्न आणि घरगुती हिंसाचार प्रकरणी त्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. २०१६ मध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) सुरक्षा कर्मचाऱ्यांना  मारहाण केल्याच्या आणि सार्वजनिक मालमत्तेची नासधूस केल्याच्या प्रकरणात ते २०२१ मध्ये दोषी आढळले होते. तेव्हा दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं.

 

भारतीय दंड संहितेच्या कलम १४९ – बेकायदेशीर जमाव, १४७ -दंगलीसाठी शिक्षा आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ अन्वये भारती यांना झालेली शिक्षा कोर्टाने २ वर्षांचा तुरुंगवास ठोठावला होता. नंतर या प्रकरणात न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता.

 

२०२१ च्या जानेवारीत परत त्यांना नंतर अटक करण्यात आली होती. १० जानेवारी २०२१ रोजी सोमनाथ भारती यूपीच्या दौऱ्यावर होते. तेव्हा त्यांनी यूपीतील शाळा आणि रुग्णालयांची स्थिती पहिली. त्यानंतर अमेठीतील माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना ते म्हणाले होते… 

“हॉस्पिटल्समध्ये मुलं जन्माला येतात, पण इथे कुत्र्यांची मुलं जन्माला येत आहेत”.

या विधानासाठीच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि  गुन्हेगारी धमकी आणि गटांमधील शत्रुत्वाला प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली होती.

याच प्रकरणी नुकतंच २१ मे २०२२ ला परत या विशेष न्यायालयाने सोमनाथ भारती यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. कोर्ट या प्रकरणी पुढील १४ जून रोजी सुनावणी करणार आहे.

५) अमानतुल्ला खान

आम आदमी पार्टीचे ओखला इथले आमदार अमानतुल्ला खान यांना २०१६ मध्ये अटक करण्यात आली होती. त्यांच्या मेव्हण्याच्या पत्नीने अमानतुल्ला खानवर विनयभंगाचा आरोप केला होता. गेल्या चार वर्षांपासून अमानतुल्ला आपल्याला त्रास देत आहेत शिवाय त्यांचे पतीही आमदार अमानतुल्ला यांना पाठिंबा देत होते. यामुळे या महिलेने आप आमदार तसेच पतीविरोधात गुन्हा दाखल केला होता.

त्यानंतर एका महिलेला बलात्कार आणि हत्येची भीती दाखवत धमकावल्याच्या आरोपाखाली खान यांना अटक करण्यात आली होती. मात्र सध्या ते तेही सध्या जामिनावर आहेत.

याशिवाय अलीकडेच अमानतुल्ला खान यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप होता. दिल्लीच्या मदनपूर भागातील अतिक्रमणे एमसीडी काढत असताना दगडफेक आणि तोडफोड सुरू झाली. आपचे आमदार अमानतुल्ला खान हेही घटनास्थळी उपस्थित होते. अमानतुल्ला खान यांची तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. 

६) प्रकाश जारवाल 

देवळीचे आम आदमी पार्टीचे आमदार प्रकाश जारवाल हे २०१७ मध्ये एका ५३ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली अडकले होते. प्रकाश जारवाल यांनी आपल्याला केवळ धमकीच दिली नाही, तर आपल्यासोबत गैरवर्तनही केलं, असा आरोप महिलेने केला होता. 

त्यानंतर २०१८ मध्ये दिल्लीचे मुख्य सचिव अंशु प्रकाश यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात त्यांना अडकवण्यात आलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी आमदार प्रकाश जारवाल यांना अटक केली होती. 

७) नरेश यादव

मेहरौलीचे आमदार नरेश यादव यांना जून २०१६ मध्ये पंजाबमधील मलेरकाटोला इथे पवित्र कुराणचा अपमान केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी विजय कुमार याने ‘आप’च्या आमदाराच्या सांगण्यावरून ही घटना घडवून आणली होती, असं पंजाब पोलिसांनी म्हटलं होतं.

यादव यांच्यावर आयपीसीच्या कलम १०९, १५३ ए, आणि २९५ अंतर्गत आरोप ठेवण्यात आले होते. मात्र सध्या आमदार नरेश यादव जामिनावर बाहेर आहेत.

८) गीता रावत

फेवरूवरी २०२२ मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आम आदमी पक्षाच्या नगरसेविका गीता रावत यांना अटक करण्यात आली होती. सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने ही कार्यवाही केली होती. रिपोर्टनुसार, पूर्व दिल्ली महानगरपालिकेच्या नगरसेवक गीता रावत यांनी एका व्यक्तीला टेबलाखालून २० हजार रुपये मागितले होते, जेणेकरून तो आपल्या इमारतीचे छप्पर वाढवू शकेल. 

छप्पर बांधण्यास मान्यता देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्यानंतर त्या व्यक्तीने सीबीआयकडे तक्रार केली होती. यानंतर सीबीआयने या घोटाळ्याचा छडा लावत त्यांना अटक केली होती.

९) शरद चौहान

नरेलाचे आमदार शरद चौहान यांना ‘आप’च्या कार्यकर्त्या सोनी मिश्रा यांच्या आत्महत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी ३० जुलै २०१६ रोजी अटक केली होती. 

पीडितेने १९ जुलै २०१६ रोजी आत्महत्या केली होती आणि रुग्णालयात मोबाईल व्हिडिओवर तिचा जबाब नोंदवला गेला होता. या जबाबात पीडित महिलेने रमेश भारद्वाज, रजनीकांत आणि अमित भारद्वाज यांची नावं घेतली होती. पण त्यांनी कुठेही शरद चौहान यांचं नाव घेतलेलं आढळलं नाही.

सध्या ते जामिनावरही बाहेर आहेत.

१०)  दिनेश मोहनिया

२०१६ मध्येच संगम विहारचे आमदार दिनेश मोहनिया यांना विनयभंग आणि लैंगिक छळाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. रिपोर्ट्सनुसार, तेव्हा मोहनिया हे दिल्ली जल बोर्डाचे माजी उपाध्यक्ष होते. महिलांचा एक गट जेव्हा आमदाराकडे पाण्याची तक्रार घेऊन गेला होता, तेव्हा आमदारांनी त्यांचं ऐकलं नाही. 

नूर बानो या महिलेने आरोप केला होता की, आमदाराने त्यांना धक्का दिला आणि वाईट पद्धतीने बोलले, तिथे आणखी अनेक महिला उपस्थित होत्या. आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्याने सर्वांना समान वागणूक दिली आणि सांगितलं की, जर तुम्ही गोंधळ घातला तर त्यांना पाणी मिळणार नाही. 

११)  जितेंद्र सिंह तोमर

दिल्लीचे माजी कायदामंत्री तोमर यांना २०१५ मध्ये  वकिलीच्या बनावट पदवी बाळगल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती, त्यानंतर त्यांना दीड महिना तिहार जेलमध्ये घालवावे लागले होते. 

जितेंद्र हे याआधीही काँग्रेसचे नेते होते. दिल्लीच्या निवडणुकीत ते आम आदमी पक्षाकडून त्रिनगरमधून विजयी झाले आणि केजरीवाल सरकारमध्ये कायदामंत्री झाले. दिल्लीच्या पर्यटन, कला आणि संस्कृतीची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.

त्यानंतर द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना तोमर म्हणाले होते की, या किरकोळ गोष्टी आहेत आणि त्यांची राजकीय कारकीर्द अद्याप संपलेली नाही. तोमर सध्या दिल्लीच्या त्रिनगर विधानसभेचे आमदार आहेत.

१२) गोपाल इटालिया

आम आदमी पार्टीचे गुजरात प्रमुख गोपाल इटालिया यांना ऑगस्ट २०२१ मध्ये मेहसाणा पोलिसांनी अटक केली होती. मेहसाणा पोलिसांनी एका जुन्या प्रकरणात ही अटक केली होती. 

१४ डिसेंबर २०२० रोजी इटालिया यांच्यासह ‘आप’च्या इतर २५ कार्यकर्त्यांवर ‘चक्का जाम’ केल्याबद्दल आणि रस्त्यावर निदर्शने केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार इटालियाला मेहसाणा ए डिव्हिजन पोलीस स्टेशनने अटक केली होती. 

या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त जगदीप सिंह, महेंद्र यादव, अखिलेश त्रिपाठी, कमांडो सुरिंदर सिंह, मनोज कुमार असे अनेक आपचे नेते वेगवेगळ्या कारणाने जेलमध्ये जाऊन आले आहेत. म्हणून सत्येंद्र जैन काही पहिले नेते नाहीत. 

मात्र सत्येंद्र जैन पक्षाच्या काही मुख्य नेत्यांमध्ये गणले जातात आणि अरविंद केजरीवाल यांचेही खास आहेत, म्हणून आप त्यांच्या अटकेनंतर कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.