आप राज्य जिंकते ते फक्त काँग्रेसचंच…

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर ज्याप्रमाणे भाजपने एकामागे एक निवडणूक जिंकण्याचा धुरळा उडवला तसाच धुरळा आप सुद्धा उडवेल असं काहींना वाटत होतं. पक्ष स्थापनेच्या अवघ्या एका वर्षात आपने दिल्ली काबीज केली.

गेल्या ७ वर्षांपासून निव्वळ दिल्लीत आपची सत्ता होती तेव्हा विश्लेषक आपवर शहरी पक्ष असल्याचा शिक्का मारायचे. 

मात्र विश्लेषकांचा हा शिक्का मिटवून आपने पंजाबमध्ये सत्ता मिळवली. पंजाब मिळवल्यानंतर आपच्या विजयाच्या वाळू चौफेर उधळेल आणि इतर राज्यातही विजय मिळवेल असं अनेकांना वाटत होतं. परंतु गुजरात आणि हिमाचलच्या निवडणूक निकालानंतर दोन्ही राज्यात आपने केलेले बहुमताने निवडून येण्याचे दावे फोल ठरलेले दिसत आहेत. 

यामुळेच एक प्रश्न समोर आलाय की, दिल्ली आणि पंजाबसारखे राज्य एका दमात जिंकणाऱ्या आपचा गुजरात आणि हिमाचल प्रदेशामध्ये प्रभाव का दिसला नाही. 

तर याचं महत्त्वाचं कारण आहे कमजोर काँग्रेसपेक्षा मजबूत असलेली भाजप..

आपने आजपर्यंत ज्या राज्यांमध्ये निवडणूक जिंकली आहे किंवा सत्ता मिळवली आहे, त्या दिल्ली आणि पंजाबमध्ये एकच गोष्ट कॉमन होती ती म्हणजे कमजोर झालेली काँग्रेस.

२०१३ मध्ये दिल्लीची सत्ता हातात घेण्यासाठी आपने पहिली निवडणूक लढवली आणि त्यात यश मिळवलं. यात आपने १५ वर्ष दिल्लीवर राज्य करणाऱ्या काँग्रेसच्या शीला दीक्षित यांच्या विरोधात लढत दिली. पहिल्या दमात आपला ७० पैकी २८ जागा मिळाल्या. काँग्रेसच्याच बाहेरून दिलेल्या पाठिंब्याने अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाले.

मात्र २०१५ च्या निवडणुकीत क्लीन पार्टीचा मुद्दा समोर करून ६७ जागांवर स्पष्ट बहुमत मिळवलं आणि दिल्लीची सत्ता मिळवली.  त्यानंतर आपने देशभरातील अनेक निवडणुकांमध्ये स्वतःचे उमेदवार उभे केले पण आपला यश मिळालं नाही. 

यात आपला दिल्लीच्या शेजारी असलेल्या राज्यांमध्ये सुद्धा जागा जिंकता आल्या नाहीत.

२०१७ मध्ये हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि पंजाब या दिल्लीच्या शेजारी असलेल्या चार राज्यांच्या विधानसभेसाठी आपने निवडणूक लढवली, या चार राज्यांपैकी हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये काँग्रेस सत्तेवर होती. पंजाबमध्ये अकाली दल तर उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी सत्तेवर होती. 

मोदी लाटेत भाजपने तीन राज्यांमध्ये सत्ता मिळवली तर पंजाब काँग्रेसच्या हाती गेलं. त्यात फक्त पंजाबमध्ये आपला २० जागा जिंकता आल्या. तर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड, उत्तर प्रदेशमध्ये एकही जागा आपच्या पदरात पडली नव्हती. 

त्यानंतर आपने २०१८ मध्ये राजस्थान आणि २०१९ ला हरियाणा विधानसभेसाठी जोर लावला होता.

मात्र या विधानसभांमध्ये सुद्धा आपला एकही जागा मिळवता आली नाही. राजस्थानमध्ये भाजपच्या वसुंधराराजे सिंधिया आणि हरियाणात भाजपचेच मनोहरलाल खट्टर यांची सत्ता होती. राजस्थानच्या सत्ताबदलाच्या नियमानुसार भाजप जाऊन काँग्रेस सत्तेत आली. तर हरियाणाचा बालेकिल्ला भाजपनेच राखला होता.

त्यानंतर आपने खऱ्या अर्थाने दिल्लीच्या बाहेर पाऊल ठेवण्यासाठी २०२२ मध्ये उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि पंजाब या राज्यांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित केलं. 

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची खदखद पंजाबबरोबरच पश्चिम उत्तर प्रदेशामध्ये देखील होती असं सांगितलं जात होतं. या भागात सत्ताधारी भाजपाला फटका बसेल असेही भाकीत वर्तवले जात होते. मात्र या निवडणुकीत पंजाब काँग्रेसमध्ये असलेल्या अस्थिरतेचा फायदा घेत आपने ९२ जागा जिंकल्या आणि सत्ता स्थापन केली.

मात्र अगदी शेजारच्या उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये एकही जागा आपला मिळवता आली नव्हती. याउलट उत्तराखंडमध्ये काँग्रेस आणि उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीने सक्षम विरोधी पक्ष म्हणून बाजी मारली होती. 

त्यानंतर आपने गुजरात आणि हिमाचल प्रदेशाच्या निवडणुकीत सत्ता आणण्याचे दावे केले होते. मात्र आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार गुजरात मध्ये आप फक्त ५ जागांवर लीड करत आहे तर हिमाचल प्रदेशमध्ये एकही जागा आपच्या पारड्यात पडलेली नाही.   

आजपर्यंत आपने ज्या राज्यांमध्ये सत्ता मिळवली आहे त्यामागे ३ प्रमुख कारणे सांगितली जातात. 

१) आपला फक्त काँग्रेस कमकुवत असलेल्या राज्यातच जागा जिंकता आल्या आहेत

दिल्लीमध्ये २०१३ च्या निवडणुकीत काँग्रेस सरकार महागाई, भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार या मुद्यांमुळे घेरली गेली होती. काँग्रेसच्या त्याच कमकुवत परिस्थितीचा फायदा घेत आपने दिल्ली जिंकली होती. त्यानंतर आपमुळे दिल्लीत सगळ्यात जास्त फटका काँग्रेसला बसला आणि काँग्रेसचा एकही उमेदवार दिल्लीत निवडून आला नाही.

दिल्लीपाठोपाठ पंजाबमध्ये देखील काँग्रेसची स्थिती कमकुवत झाली होती. कॅप्टन अमरिंदर सिंग, चरणजितसिंग चन्नी, नवज्योत सिंग सिद्धु या सगळ्यांच्या गटबाजीमुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह वाढले होते. कॅप्टन अमरिंदर सिंग काँग्रेसमधून बाहेर पडले आणि याचाच फायदा उठवत आपने पंजाबमध्ये बाजी मारली असं सांगितलं जातं.

२) ज्या राज्यांमध्ये काँग्रेस आणि विरोधी पक्ष मजबूत आहे, त्या राज्यांमध्ये आपला पाऊल ठेवता आलेलं नाही

उत्तराखंड, हिमाचल, प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये काँग्रेसचे स्थानिक नेते स्वतःचं मजबूत स्थान ठिकवून आहे. त्यामुळे या राज्यांच्या विधानसभांमध्ये आपला एकही जागा मिळवता अली नाही. राजस्थान काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह असला तरी काँग्रेसचा तिथे वट आहे. दर पाच वर्षांनी इथे काँग्रेस आणि भाजप याच पक्षांची आलटून पालटून सत्ता येत राहिली आहे. 

तर उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष मजबूत स्थितीत आहे, २०२२ च्या विधानसभेत पूर्वीच्या तुलनेत जास्त जागा मिळवून समाजवादी पक्षाने चांगली कामगिरी केली होती.

३) भाजपशासित राज्यांमध्ये आपला मुळीच यश मिळवता आलेलं नाही

दिल्लीला खेटून असलेल्या उत्तर प्रदेश आणि हरियाणा राज्यात दिल्लीचा प्रभाव आहे. या दोन्ही राज्यातील नागरिक दिल्लीतील सुविधांचा लाभ घेतात असं सांगितलं जातं. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या वेळेस शेतकरी आंदोलनाचा मुद्दा महत्वाचा होता, या आंदोलनातील शेतकऱ्यांना आप सरकारने मदत केली असंही सांगितलं जातं. मात्र आपला उत्तर प्रदेशच्या नोएडासारख्या शहरी भागात सुद्धा जागा मिळवता आली नाही.

गुजरात आणि हिमाचल प्रदेशाच्या निवडणुकीत आपने स्वतःची संपूर्ण ताकद पणाला लावली होती. परंतु हिमाचल प्रदेशामध्ये मजबूत स्थितीत असलेल्या काँग्रेसने पुन्हा एकदा राज्यात स्वतःची सत्ता टिकवण्यात आघाडी घेतली आहे. तर गुजरातमध्ये काँग्रेसच्या कमकुवत परिस्थितीमुळे आपला फक्त पाचच जागांवर लीड मिळाली असं सांगितलं जातं. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.