आसामचा आता मेघालय सोबत राडा सुरु झालाय, यावेळी नेमकं काय कारण आहे?

ईशान्य भारतात सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. यंदा देखील या वादाच्या केंद्रस्थानी आसामच आहे. मात्र यंदा त्यांचा राडा मिझोरामसोबत नाही तर मेघालय सोबत सुरु आहे. बुधवारपासून दोन्ही राज्यांच्या सीमांवर वातावरण तणावपूर्ण आहे.

माध्यमांमधील माहितीनुसार, आसाम-मेघालयच्या सीमांवर या राज्यांच्या सामान्य लोकांमध्ये तर राडा होतं आहेच. पण आता या दोन्ही राज्यांचे पोलिस देखील एकमेकांसमोर उभे आहेत. आणि नुसते उभे नाहीत, तर हाणामारी पण सुरु आहे. त्यामुळे एक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचं देखील वृत्त आहे. या संघर्षाचे फोटो आणि व्हिडीओ देखील समोर आले आहेत.

नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण?

आसाम राज्याचे आपल्या शेजारच्या मिझोरामसारख्या बऱ्याच राज्यांशी सीमावाद सुरु आहेत. यातच मेघालय सोबत देखील त्यांचा सीमावाद सुरु आहे. एकूण १२ वादग्रस्त जागेंवर हा दोन्ही राज्यांचा सीमावाद सुरु आहे.

तर माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, २३ ऑगस्टच्या रात्री याच वादग्रस्त भागातील अंतरराज्यीय सीमेवर आसाम पोलिसांनी कथित रित्या मेघालयच्या री-भोई जिल्ह्यातील ३ युवकांना मारहाण केली. या मारहाणीला प्रत्युत्तर म्हणून मेघालयमधील लोकांच्या एका समूहाने कथित रित्या आसाम पोलिसांचं उमलापर भागातील एक चेक पोस्ट उद्धवस्त केलं.

त्यानंतर बुधवारी २५ ऑगस्टच्या रात्रीपासून परिस्थिती पुन्हा एकदा तणावग्रस्त बनली आहे. कारण ठरलं मेघालयमधील १०० लोक आणि पोलिसांचा जमाव. बुधवारी रात्री मेघालयमधून १०० लोकांचा समूह आणि पोलीस मंगळवारी घडलेल्या घटनेबद्दल मिटिंग घेण्याची मागणी करून आसाममध्ये घुसले.

याबाबत आसामच्या पश्चिम कार्बी आंगलोंग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजगवारन बसुमतारी यांनी माध्यमांशी बोलताना या घटनेबाबत सांगितले कि,

परिस्थिती नाजूक असल्यामुळे आसामचे काही लोक देखील घटनास्थळी जमले होते. त्यानंतर या सगळ्या लोकांनी पोलिसांसोबत मेघालयच्या नागरिकांना आणि पोलिसांना परत पाठवलं. पण अवघ्या काही तासातच मेघालय पोलिसांची एक टीम आसाममध्ये जवळपास १५ किलोमीटर पर्यंत आत आली. यानंतर आसामच्या स्थानिक नागरिक आणि मेघालय पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली, पण परत मेघालयच्या पोलिसांना परत पाठवलं. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

तर दुसऱ्या बाजूला री-भोई जिल्ह्याच्या पोलिसांनी देखील दावा केला आहे कि जेव्हा आसाम आणि मेघालयचे लोक वादग्रस्त भागात एकमेकांसमोर आले तेव्हा त्यांना नियंत्रित करताना एक पोलीस अधिकारी जखमी झाला आहे.

वाद सोडवण्यासाठी उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन  

आसाम आणि मेघालय दरम्यानचा हा जुना अंतरराज्यीय सीमावाद सोडवण्यासाठी या महिन्यामध्ये दोन टप्प्यांमध्ये उच्चस्तरीय बैठका झाल्या आहेत. यातील पहिली बैठक झाली ती शिलॉंगमध्ये आणि दुसरी झाली ती गुवाहाटीमध्ये.

मागच्या ६ ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीमध्ये आसाम आणि मेघालय सरकारने हा सगळा वाद पद्धतीशीरपणे सोडवण्याचे ठरवले आहे. सोबतच दोन्ही राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या अध्यक्षतेमध्ये तीन समित्या स्थापन करण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला आहे. तर त्याचवेळी १२ वादग्रस्त भागांपैकी ६ वादग्रस्त भागातील वाद प्राथमिकतेने सोडवले जातील. 

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी म्हंटले होते कि, दोन्ही राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या अध्यक्षतेमध्ये तीन समित्या स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे. या समित्या प्रामुख्याने त्या ६ वादग्रस्त भागाचा दौरा करतील ज्यांचा वाद सोडवण्यासाठी प्राथमिकता देण्यात येणार आहे. या समित्या ३० दिवसांमध्ये आपला अहवाल सादर करतील.

प्राथमिकता देणार असलेले ६ वादग्रस्त भाग :

ज्या ६ क्षेत्रांमधील वाद प्रामुख्याने सोडवला जाणार आहे त्यांची नाव म्हणजे ताराबारी, गिजांग, फहाला, बकलापारा, खानापारा (पिलिंगकाटा) आणि रातचेरा. हे भाग आसामच्या कछार, कामरूप आणि कामरूप मेट्रोपॉलिटन जिल्ह्यांमध्ये येतात. तर मेघालयच्या पश्चिम खासी टेकड्या री-भोई आणि पूर्वेकडील जयंतिया टेकड्यांच्या अंतर्गत येतात.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.