अविनाश भोसलेंच्या श्रीमंत होण्याचे किस्से ऐकायला मिळाले नाहीत तर पुण्यात येणं व्यर्थ असतं

मोठ्ठं व्हायचं असल तर मुंबईला जायचं म्हणतात. पण मुंबई आपल्याला झेपत नाही. पण मोठ्ठं तर व्हायचं असत. मग आपण पुण्याला येतो. पुण्यात येऊन दोन चार महिने झाले की तुम्हाला पहिलं नाव समजतं ते अविनाश भोसले यांच.

मी पुणे विद्यापीठात रहायचो. तिथून शिवाजीनगरला जाताना ABIL हाऊस दिसायचं.  एकदिवशी मित्राला विचारलं हे ABIL हाऊस कुणाचाय. तेव्हा पोरांनी मला येड्यात काढायला सुरवात केली. पुण्यात येऊन तुला अजून अविनाश भोसलेंचे किस्से माहिती नसतील तर अवघडाय गड्या.

मग अविनाश भोसले नाव सर्च करायला सुरवात केली. पुण्याचा मोठ्ठा बिल्डर, गाड्या, हेलिकॉप्टर, बंगला अशा वेगवेगळ्या गोष्टी समजायला लागल्या. 

पुण्यात एकेकाळी रिक्षा चालवणारा माणूस आज इतका मोठ्ठा झाला ही त्यांच्या नावामागची दंतकथा. 

ही स्टोरी सुरू होते १९७३-७४ सालात. त्या काळात १२ वी नापास झालेला मुलगा संगमनेरवरून पुण्यात लक आजमवायला आला. अविनाश निवृत्ती भोसले अस या मुलाचं नाव. पुण्यातल्या पेठेत त्याने एक रुम भाड्याने घेतली. पुण्यातच काहीतरी करायचं म्हणून ऑटोमोबाईलच्या कोर्सल प्रवेश देखील घेतला. 

घरची गोष्ट सांगायची तर, वडील निवृत्ती भोसले हे सातारा जिल्ह्यातल्या तांबव्याचे. ते सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता होते. नोकरीच्या निमित्ताने तांबव्याचं हे कुटूंब संगमनेरला रहायला होतं. 

सरळं साधं मध्यमवर्गीय अस हे कुटूंब. आपल्यासारखाच असणारा हा पोरगा पुण्यात काहीतरी करून चार पैसे मिळवायच्या तयारीत होता. त्या वेळी रिक्षा विकत घेऊन त्या भाड्याने द्यायचा विचार आला. वडलांकडून पैसे घेतले आणि पहिली रिक्षा घेतली. या धंद्यात पैसा होता. म्हणजे एका शिफ्टमध्ये स्वत: रिक्षा चालवायची आणि दूसऱ्या शिफ्टमध्ये ड्रायव्हरला चालवायला द्यायची, अस हे साधं फायद्यात घेऊन जाणार गणित होतं. 

पुढच्या सहाच महिन्यात गणित फायद्यात गेलं आणि एकाच्या तीन रिक्षा झाल्या.

रिक्षांसाठी ड्रायव्हर आले आणि पर्यायाने ड्रायव्हरकडून पैसे घेण्याचे सोपस्कार आले. रिक्षांचा व्याप वाढल्यानंतर अविनाश भोसलेंच्या लक्षात आलं की प्रत्येकाकडून पैसे गोळा करणं हे कष्टाचं काम आहे. पैसे कमी आणि डोक्याची टणटणचं जास्त. 

अशातच वडिलांनी पुण्यात घरं घेण्याचं पक्क केलं. पुण्यातल्या घराचं काम सुरू झालं तेव्हा त्या शेजारीचं एका दूसऱ्या घराचं काम देखील चालू होतं. अविनाश भोसलेंनी त्या बिल्डरकडून कामाची माहिती घेतली. झालं, हुशार माणसाला सगळीकडे बिझनेसच दिसतो. अविनाश भोसलेंना इथही बिझनेस दिसला.

अविनाश भोसले हा पोरगा बिल्डर लाईनमध्ये घुसला. ज्या माणसाकडे चौकशी केली त्यांचीच साईट वर्षाभरात बांधुन पूर्ण केली. 

कॉन्फिडन्स आल्यानंतर एकामागून एक छोटीमोठी कामे मिळू लागली. बघता बघता चार पाच वर्षातच एका ग्रुपचं नाव ठेवण्याइतपत कामे झाले आणि १९७९ साली ABIL ग्रुप अर्थात अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या ब्रॅण्डचा पाया रचला गेला. 

मग काय एकामागून एक कामे सुरू झाली, पुण्यातल्या लॅण्डमार्क ठरतील अशा बिल्डींगचा पाया रचण्याचं काम ABIL ग्रुपकडून होऊ लागलं. अविनाश भोसले एकामागून एका मोठं-मोठ्या घरात शिफ्ट होऊ लागले आणि त्यांच्या श्रीमंत होण्याचे किस्से चर्चेला आले. 

श्रीमंतीचे किस्से सांगायचे तर कृष्णा खोरे महामंडळातील कामाचे सर्वाधिक ठेके हे अविनाश भोसलेंना मिळाले. गोपीनाथ मुंडे यांनी एकाच दिवसात तब्बल ४०० कोटींचे कंत्राट काढले होते त्यातील सर्वांधिक कंत्राट अविनाश भोसले यांना मिळाली.

१९९६ पासून पुढील दहा वर्षात अविनाश भोसले यांच्या समुहाने साडे बावीस हजार कोटींची उलाढाल केल्याचं सांगण्यात येतं. २००७ सालचा कंपनीचा टर्नओव्हर सुमारे ७०० कोटींच्या घरात असल्याची माहिती मिळते. 

याचं काळात ABIL ग्रुपने हॉस्पीटलीटीच्या क्षेत्रात पंख पसरवण्यास देखील सुरवात केली. पुण्याच्या वेस्टिन पासून मुंबईच्या सेंट रेजीस, गोव्याच्या डब्लू गोवा, नागपूरच्या ले मेरिडियन अशा पंचतारांकित हॉटेल्सवर ABIL चा शिक्का बसलेला आहे. 

आत्ता त्यांच्या बहुचर्चित घराकडे नजर टाकूया…! 

अविनाश भोसलेंच व्हाईट हाऊस म्हणजे पुण्यात नव्याने येणाऱ्या आणि श्रीमंत व्हायची स्वप्न बघाणाऱ्यांसाठी अच्युत्त टोक असतं. हे घर नसून पॅलेस आहे. घरात हेलिपॅड आहे. स्वत:च्या मालकीची तीन तीन हेलिकॉप्टर आहेत. जगभरातल्या गाड्या त्यांच्या दावणीला बांधलेल्या आहेत वगैरे वगैरे… 

आत्ता जाता जाता काही गोष्टी, सध्या राज्यमंत्री असणारे विश्वजीत कदम हे अविनाश भोसलेंचे जावईबापू आहे. मुलं, बहिणी, नातवंड असा त्यांचापण गोतावळा आहे. मुलगा अमित हा हॉस्पीटलीटी मध्ये झेंडा रोवतोय. नाही म्हणायला अधून मधून अविनाश भोसलेंवर कस्टमने एखाद्या गोष्टीत कारवाई केल्याच्या बातम्या येत असतात पण त्या तितक्याचं गतीने नाहीशा देखील होत असतात.

असही सांगतात की,

महाबळेश्वर येथील त्यांच्या फार्महाऊसवर सोनिया गांधींपासून सगळेजण येत असतात. एजेंलेना ज्युली आणि ब्रॅण्ड पीट भारतात आले तेव्हा फाईव्ह स्टार हॉटेलवर न थांबता ते अविनाश भोसलेंच्या बंगल्यात थांबल्याच्या गोष्टी देखील पोरांच्या रंगवून सांगण्यात येतात.

काहीही आणि कसही असो पण कधीकाळी रिक्षा चालवणारा माणूस आज पुण्यातल्या श्रीमंत माणसांच्या यादीत वरच्या स्थानावर आहे हेच खरं..

हे ही वाच भिडू

1 Comment
  1. Prakash says

    Sow Shri ek sasgamneri

Leave A Reply

Your email address will not be published.