केंद्रीय नोकर भरतीसाठी नव्याने आलेल्या कॉमन एन्ट्रन्स परिक्षेचं स्वरूप कस असणार आहे?

आपल्याकडे बारावी नंतर पुढील प्रवेशांसाठी म्हणजे इंजिनीअरींग, फार्मसी यासाठी ‘सीईटी’ देण्याची प्रथा आहे. बारावीतुन सुटले की विद्यार्थ्यी यात अडकतात. आधी यामध्ये मेडिकलचा पण समावेश होता पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तिकडे ‘नीट’ सक्तीची करण्यात आली.

थोडक्यात काय तर इंजिनीअरींग, फार्मसी आणि मेडीकल असे कुठे ही प्रवेश घ्यायचा असल्यास तुम्हाला ‘सीईटी’ म्हणजेच कॉमन एन्ट्रान्स टेस्ट द्यावी लागायची.

आता केंद्र सरकारने अशीच कॉमन एन्ट्रान्स टेस्ट केंद्रीय नोकरी भरतीसाठी केली आहे. यामध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे आणि बँकींग या परीक्षांचा समावेश आहे. या सगळ्यांसाठी वेगवेगळ्या होणाऱ्या पुर्व परीक्षा आता एकत्रितरित्या ‘सीईटी’च्या स्वरुपात होणार आहे.

राष्ट्रीय निवड आयोगाची तरतुद :

या नोकर भरतीसाठी ‘राष्ट्रीय निवड आयोगा’ची स्थापना करण्यात येणार आहे. या आयोगात नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना रेल्वे, बँक यासारख्या सरकारी नोकऱ्यांसाठी एकच परीक्षा (Common Eligibility Test) देता येणार आहे.

‘हे’ अधिकारी आयोगाचे सदस्य असणार :

या राष्ट्रीय निवड आयोगामध्ये रेल्वे मंत्रालय, अर्थ मंत्रालय, अर्थिक सेवा, एसएससी, आयआरबी, आयबीपीएस यातील तज्ञांची प्रतिनिधी म्हणून नियुक्ती होणार आहे.

‘यासाठी’ राष्ट्रीय निवड आयोगाची तरतुद :

आतापर्यंत एखाद्या उमेदवाराने दोन वेगवेगळ्या विभागांमध्ये सरकारी नोकरीसाठी अर्ज केला असेल तर त्याला दोन परीक्षा द्याव्या लागायच्या. बऱ्याचदा या दोन्ही विभागांच्या परीक्षा एकाच तारखेला असायच्या. अशावेळी उमेदवाराला कोणत्याही एकाच परीक्षेला बसता यायचं. मात्र, आता राष्ट्रीय निवड आयोगाच्या एका परीक्षेत उमेदवार उत्तीर्ण झाला तर त्याला पुढच्या बँक आणि रेल्वे सारख्या इतर सरकारी नोकरीसाठी परीक्षा देता येईल.

वर्षातुन दोन वेळा परिक्षा, तीन वर्ष गुण ग्राह्य धरले जाणार

‘सीडीएस’च्या धर्तीवर राष्ट्रीय निवड आयोगाच्या परीक्षाही वर्षातून दोन वेळा होणार आहेत. त्यामुळे जरी पहिल्या परिक्षेमध्ये कमी गुण मिळाले तरी गुण वाढविण्यासाठी उमेदवार त्याच वर्षात दुसरी परिक्षा देवू शकणार आहे.

मिळालेले गुण सर्व परिक्षांसाठी ग्राह्य :

राष्ट्रीय निवड आयोगाच्या सीईटी अंतर्गत येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी हे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. हे गुण पाहून उमेदवाराची दुसऱ्या विभागातही निवड होऊ शकते. त्यासाठी उमेदवाराला वेगवेगळे फॉर्म भरण्याती गरज नाही. या नव्या प्रक्रियेमुळे वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल”,

जिल्ह्याच्या ठिकाणीच ऑनलाईन परिक्षा केंद्र :

या सीईटी परिक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी परीक्षेचे केंद्र असणार आहे. ही ‘सीईटी’ संपुर्णतः ऑनलाईन होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना दुसऱ्या शहरात येवून परीक्षा देण्यासाठी प्रवास, राहणे, जेवण यासाठी होणारा मनस्ताप वाचणार आहे. विषेशतः गरीब उमेदवारांना याचा जास्त फायदा होणार आहे. महिलांनाही अनोळखी शहरात जावून राहण्याचा प्रश्न उद्भवणार नाही.

२० संस्थाचे यथावकाश एकत्रिकरण होणार:

सरकारी नोकर भरतीसाठी विविध २० संस्था कार्यरत आहेत. त्यापैकी राष्ट्रीय निवड आयोगामध्ये तीन संस्थांच्या पुर्व परिक्षांचे एकत्रिकरण केले गेले आहे. उर्वरित संस्थांच्या परिक्षा देखील यथावकाश या आयोगाच्या ‘सीईटी’ मध्ये येणार आहेत.

यामुळे दरवर्षी कोट्यावधी विद्यार्थ्यांचा यातील सतत वेगवेगळ्या परीक्षा देण्यात वाया जाणारा वेळ, पैसा, मानसिक त्रास या आणि अशा इतर गोष्टी वाचणार आहेत.

  • ऋषिकेश नळगुणे

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.