पती, मुलं, आई गमावली, कुटुंब उध्वस्त झालं; पण द्रौपदी मुर्मू यांनी कधी हार मानली नाही
देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांची निवड जवळपास निश्चित झाली आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीत मुर्मू यांना ४ लाख ८३ हजार २९९ इतकी मतं मिळाली आहेत, तर विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना १ लाख ८९ हजार ८७६ इतकी मतं मिळाली. भारतातल्या परंपरेनुसार २५ जुलैला द्रौपदी मुर्मू आपल्या पदाची शपथ घेतील.
द्रौपदी मुर्मू यांच्यामुळं आदिवासी समाजातून आलेली महिला पहिल्यांदाच भारताच्या राष्ट्रपतीपदी विराजमान होईल. एका सामान्य घरातून आलेल्या महिलेनं आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करत, थेट देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत मजल मारणं ही निश्चितच साधी गोष्ट नाही.
दुसऱ्या बाजूला द्रौपदी मुर्मू यांच्या निवडणुकीवेळी तसं राजकारणही फार झालं. कुणी त्यांना पाठिंबा दिला आणि कुणी त्यांना पाठिंबा दिला नाही, पण या चर्चांपेक्षा महत्त्वाचं हे आहे की द्रौपदी मुर्मू इथपर्यंत कशा पोहोचल्या.
तारीख २० जून १९५८, ओडिसामधल्या मयूरभंज जिल्ह्यातल्या कुसुमी ब्लॉकच्या उपरबेडा गावातल्या एका संथाल आदिवासी परिवारात मुर्मू यांचा जन्म झाला. त्यांनी शिक्षणाला प्राधान्य देत, रामा देवी वुमन्स कॉलेजमधून बीएचं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यावरच समाधानी न राहता त्यांनी नोकरीची वाट धरली. अरबिंदो इंटीग्रल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केलं. सोबतच ओडिसाच्या राज्य सचिवालयात सिंचन विभागातही काम केलं.
पण त्यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थानं कलाटणी मिळाली, ती मुर्मू राजकारणात आल्या तेव्हा…
त्यांचे वडील आणि आजोबा दोघेही पंचायत राज व्यवस्थेनुसार गावाचे प्रमुख होते. पण मुर्मू यांनी दोघांपेक्षाही मोठी झेप घेतली. १९९७ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ओडिसाच्या रायरंगपूर जिल्हाच्या काऊन्सिलर म्हणून निवडूनही आल्या. प्रगतीच्या पायऱ्या त्यांनी जलद गतीनं चढल्या, त्या रायरंगपूरच्या उपाध्यक्ष, नगर पंचायत अध्यक्ष अशा पदांवर विराजमान झाल्या.
अवघ्या ३ वर्षांतच त्यांना रायरंगपूरमधून विधानसभा निवडणुकीसाठी संधी मिळाली. पहिल्याच प्रयत्नात त्या निवडूनही आल्या आणि २०००-२००४ या काळात त्यांनी नवीन पटनायक यांच्या नेतृत्वातल्या भाजप आणि बिजू जनता दलाच्या सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून परिवहन, मत्स्य पालन, पशुपालन आणि व्यापार मंत्रालयाचा कारभारही सांभाळला.
संघटनात्मक पातळीवरही मुर्मू यांनी मोलाचं योगदान दिलं…
त्यांनी २००२ ते २००९ या कालावधीत मयूरभंज भाजपच्या जिल्हाध्यक्षा म्हणून काम पाहिलं. २०१३ मध्ये पुन्हा पक्षानं त्यांना याच पदावर संधी दिली. सोबतच भाजपच्या अनुसूचित जाती जमाती विंगच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचं सदस्यत्वही दिलं.
२००४ च्या विधानसभा निवडणुकीतही द्रौपदी मुर्मू ओडिसाच्या विधानसभेवर निवडून गेल्या, २००७ मध्ये त्यांना त्यांच्या कामासाठी उत्कृष्ट आमदाराचा ‘नीलकंठ पुरस्कार’ ही मिळाला.
पण मुर्मू यांच्या आयुष्यातला सगळ्यात धक्कादायक टप्पा होता २००९ ते २०१५ या सहा वर्षांचा
एका बाजूला राजकीय पातळीवर त्यांच्याकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या येत होत्या, मात्र कौटुंबिक पातळीवर त्यांना प्रचंड मानसिक धक्के सहन करावे लागले. मुर्मू यांचे पती श्याम चरण मुर्मू हे बँकेत नोकरीला होते, दोन मुलं आणि एक मुलगी असा पाच जणांचा त्यांचा परिवार होता. २००९ मध्ये त्यांनी आपला एक मुलगा गमावला, तर तीनच वर्षांनी दुसऱ्या मुलाचंही अपघाती निधन झालं. २०१४ मध्ये त्यांच्या पतीचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. दुर्दैवाचा डोंगर आणखी एकदा कोसळला जेव्हा मुर्मू यांच्या आई आणि भावाची प्राणज्योतही अकाली मालवली.
आपल्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला, तेव्हा ज्या घरात मुर्मू राहायला होत्या तिथंच त्यांनी शाळा उभारली, जिथं आता अनेक मुलं-मुली घडत आहेत.
फक्त ६ वर्षांच्या कालावधीत मुर्मू यांनी आयुष्याचा महत्त्वाचा भाग असलेल्या ५ व्यक्ती गमावल्या. यातून बाहेर पडणं साहजिकच कठीण होतं, तेव्हा त्यांनी मेडिटेशनचा मार्ग अवलंबला. दुःखातून बाहेर पडण्यासाठी स्वतःला समजाकार्यात झोकून दिलं. मुलीला बँकेत नोकरी मिळवून देत, तिचं भविष्यही त्यांनी मार्गी लावलं.
मग पुन्हा मुद्दा आला राजकारणाचा, २०१५ मध्ये त्यांनी झारखंडच्या राज्यपाल म्हणून शपथ घेतली. पहिल्यांदाच आदिवासी महिला राज्यपाल म्हणून विराजमान झाल्या. आपल्या कार्यकाळात त्यांनी घेतलेले निर्णयही चांगलेच गाजले.
विशेष म्हणजे २०१७ मध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मुर्मू यांच्या नावाची चर्चा असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या. मात्र त्या फक्त चर्चाच ठरल्या. २०२२ मध्ये मात्र भाजपनं त्यांच्या नावाची घोषणा केली. एक आदिवासी महिला प्रथमच देशाच्या राष्ट्रपतीपदी विराजमान होत असल्यानं, काही विरोधी पक्षांनीही मुर्मू यांना पाठींबा दिला.
मुर्मू यांच्या नावाची घोषणा झाल्यापासून त्यांच्या साधेपणाचे, आदिवासी संस्कृतीत समरसून जाण्याचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, त्यांचं कौतुकही झालं.
पण त्याहीपेक्षा जास्त कौतुक करण्याची गरज आहे ती मुर्मू यांच्या धाडसाचं आणि जिद्दीचं. कारण कुणासाठीही आपलं कुटुंब म्हणजे सर्वस्व असतं आणि आपलं सर्वस्व गमावूनही मुर्मू पुन्हा धाडसानं उभ्या राहिल्या आणि आज भारताच्या राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचत त्यांनी कित्येकांसमोर आदर्श घालून दिला आहे, हे नक्की.
हे ही वाच भिडू:
- कलरफुल कपडे घातले, डान्स केला म्हणून आदिवासींचे प्रश्न संपत नाहीत वो…
- राष्ट्रपती निवडणुका दर ५ वर्षांनी येतीलच पण याबातच्या १० इंटरेस्टींग गोष्टी बदलत नसतात
- राष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या मतपेटीचं एखाद्या माणसाप्रमाणे स्वतःच्या नावाचं तिकीट असतंय