दिग्दर्शनाचं भन्नाट व्हिजन अहिरेंना रस्त्यावर फुगे विकताना सापडत गेलं…

उसी कहानी को जिए जा रहे हैं

जिसे कइयों ने कई बार

कई सदियों में जी रक्खा है..

फिर भी नई सी लगती है

नए से चुभती है

ये तेरी मेरी कहानी..

फेसबूक स्क्रोल करताना अचानक हा शेर समोर आला. शेर तर भारी वाटलाच पण शेर शेअर करणारा पण ‘शेर’ माणूस. त्यांचं काम, त्यांचं व्हिजन, त्यांचा अभ्यास, त्यांचं डेडीकेशन सगळंच अगदी भारी वाटण्यासारखं.

पण ह्या भारी वाटणाऱ्या गोष्टी अशा सहज मिळतात होय? त्यामागे मोठा संघर्ष असतो, मोठे कष्ट असतात, मोठा इतिहास असतो. आणि मराठी सिने इंडस्ट्रीत इतिहास घडवणाऱ्यांपैकी असच एक मोठं नाव म्हणजे प्रथितयश दिग्दर्शक गजेंद्र अहिरे.

आज त्यांच्या संघर्षाची गोष्ट.

हल्ली नुसता संघर्ष करून भागत नाही, नंतर त्या संघर्षाचं भांडवलही करावं लागतं. तसे भांडवल करत फिरणारेही लय असतात. पण आपला संघर्ष आपल्या माथी कोणी मारला नव्हता तर आपण तो खुशी खुशी स्वीकारला होता असं म्हणणारे फार थोडे. आणि मग हे थोडेच फार पुढे जातात, त्यातलेच एक गजेंद्र अहिरे.

त्यांचं फेसबुकवरचं पोस्ट वाचलं, मग अख्खं प्रोफाइल चाळलं, माणूस खास वाटला. सहज म्हणून त्यांची मुलाखत ऐकली आणि भारावल्यागतच झालं. म्हटलं ह्यांचा इतिहास आपल्या भिडूंना सांगण्यासारखा आहे.

व्हिजनरी दिग्दर्शक, एक्स्ट्रा ऑर्डिनरी लेखक, निर्माता आणि अभिनेता, थोडक्यात एक ऑल रॉऊंडर कलाकार म्हणजे गजेंद्र अहिरे यांची ओळख.

आई, वडील आणि पाच भावंडं असं गजेंद्रचं कुटुंब. गजेंद्रला लहान वयातच वाचनाची आवड लागली ती त्याच्या आईमुळे. वडील प्रचंड कष्टकरी. खाणारी तोंडं सात आणि कमावणारा एक अशी एकूण घरची परिस्थिती होती.

परिस्थिती बिकट होती पण माणसं आनंदी होती त्यामुळे गजेंद्रचं बालपण आनंदात गेलं. घर लहानसंच होतं पण घराला लागून एक मोठं मैदान होतं.

तिथे त्या मैदानावर पोरं गोळा करून वेग वेगळ्या गोष्टी रचायच्या, आणि इमॅजनरी विश्वात रमायचं हा गजेंद्रचा आवडता खेळ असायचा, विशेष म्हणजे जमलेली पोरं पण गजेंद्रचं सगळं ऐकायची, तो सांगेल तसं वागायची आणि तिथूनच गजेंद्रला दिग्दर्शनाचं बाळकडू मिळालं.

पण आपण जे करतोय त्याला मोठ्यांच्या भाषेत दिग्दर्शन म्हणतात, आपण सगळ्यांच्या समोर उभं राहून जे बोलतोय/फेकतोय त्याला स्क्रीनप्ले म्हणतात हे त्या वयात गजेंद्रला माहीत नव्हतं. ते थोडफार कळलं, शशी कपूरचं एक गाणं, गजेंद्रने शेजारच्या घरातल्या टिव्हीवर पाहिलं तेव्हा. मग आपल्याला हे असं काहीतरी करायचय हे गजेंद्रने पक्क केलं.

काय करायचंय हे कळलं पण कसं करायचं हे कळणं बाकी होतं. थोडं हुडकलं तेव्हा त्याला पुण्याच्या फिल्म इंस्टीट्यूट विषयी कळलं, आपण जे दिवसभर टाइमपास म्हणून करतो त्याला दिग्दर्शन म्हणतात हे ही कळलं. लिखाणाला सुरवात झाली. सगळ्याला थोडीफार सुसूत्रताही आली.

पण एक मोठी अडचण होती ती म्हणजे घरची परिस्थिती.

सगळ्याचं सोंग आणता येतं पण पैशाचं नाही असं म्हणतात, त्या प्रमाणे या दिग्दर्शकालाही पैशाचं ‘सोंग’ काही आणता आलं नाही.

आता सांगून पटणार नाही पण त्यावेळी गजेंद्र पेपर टाकायचा, दुधाची लाइन टाकायचा, रस्त्यावर फुगे विकायचा, जमतील तशी आणि जमतील तेवढी कष्टाची कामं करून चार पैसे कमवून घरात आणायचा, कारण त्याच्यातल्या होतकरू दिग्दर्शकाला सुरवातीला तेवढेही मिळणार नव्हते.   

दिग्दर्शनाच्या त्याच्या वेडाला घरच्यांचा प्रचंड विरोध होता. शिक्षण पण फार नाही त्यामुळे सगळं भगवान भरोसे सोडून गजेंद्रने घरही सोडायचा निर्णय घेतला.

ह्या काळात त्याला पदरात घेतलं मुंबईच्या रुईया कॉलेजने. फक्त सांभाळलं नाही तर वाढवलं, घडवलं.

गजेंद्र दिवस दिवस कॉलेज मध्येच असायचा, रात्री वरळी, प्रभादेवी वैगरे मुंबईतली ठिकाणं पायी चालत पालथी घालायचा, आणि शेवटची विरार लोकल पकडून आपली उरलेली रात्र लोकलमध्ये काढायचा. सकाळी पुन्हा कॉलेज गाठायचा, कॉलेज कॅंटीनमध्ये लोकांचं उरलेलं इडली सांबार खाऊन पुन्हा अख्खा दिवस रेटायचा.

आता आपल्याला हे सगळं ऐकायला फार भयानक जरी वाटत असलं तरी गजेंद्र अहिरेंना तसं वाटत नाही. उलट ह्या सगळ्या स्ट्रगलचा त्यांना भविष्यात कायम फायदाच झालाय असं ते सांगतात.

पेपर टाकताना, फुगे विकताना गजेंद्र अहिरेंना अनेक माणसं दिसायची. त्यांना रस्त्यावर फिरताना माणसांचे हाव भाव, स्वभाव त्यांचा वावर हे सगळं ऑब्सर्व करता आलं, अभ्यासता आलं.

कपडे धुणाऱ्या बायका, दुपारी येणारे आवाज, कुत्र्यांची भुंकण्याची वेळ, गाड्यांचे हॉर्न, स्टेशनची गर्दी, गर्दीतली दुकानं, हातगाडीवाले, फेरीवाले हे सगळं गजेंद्र अहिरेंच्या अभ्यासक्रमाचाच एक भाग झालं. ह्या सगळ्या ऑब्सर्व केलेल्या छोट्या मोठ्या गोष्टी त्यांना एक सशक्त दिग्दर्शक बनवून गेल्या. कारण आपण जे जगतो, बघतो, जवळून अनुभवतो तेच आपल्या कामात उतरतं. आणि तेच काम पुढे सगळ्यांना भावतं.

गजेंद्र अहिरेंचा अजून एक भावणारा किस्सा.

एकदा त्यांना सणकून भूक लागली होती, रुईयाला पडीक असताना फार पैसे कधी खिशात असण्याचा प्रश्नच नव्हता. दिवसाची सुरवात आणि शेवट हा नाटकातून आणि नाटकासाठीच. भूक लागली पण पैसे नव्हते त्यामुळे गजेंद्रनी त्यांच्या एका मित्राला त्यांना खायला घालायला सांगितलं.

तसा तो मित्र चिडला, म्हणाला, “तुला शरम नाही वाटत असं खायला घाल म्हणून सांगायला? यापुढे आयुष्यात कधी असं कोणाला म्हणू नकोस. काम कर आणि खा” यावर गजेंद्र अहिरे म्हणाले, “मला आत्ता भूक लागलीये” मित्र म्हणाला, “आत्ता काम कर आणि खा”

अहिरेंना राग आला, मित्राचच कागद पेन घेऊन, हेच माझं काम आहे असं म्हणून ते लिहायला बसले, रागात आणि जोशात पुढचा अर्धा तास ते लिहीत राहिले. लिहून झाल्यावर मित्राला म्हणाले, “आता मी काय लिहिलय ऐक”

त्यांनी लिहिलेलं सगळं मित्राला वाचून दाखवलं तसं त्यांचा मित्र हेलावला.. रडायला लागला आणि म्हणाला, “मी आयुष्यभर तुला खायला घालीन पण हे सोडून दुसरं काही करू नकोस, लिहिणं सोडू नकोस”

त्या अर्ध्या तासात पेपरावर जे खरडलं, त्याचीच पुढे .. ही एकांकिका झाली आणि ह्या एकांकिकेने अनेक बक्षीसं काढली.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.