घाशीराम कोतवाल कोण होता, पुण्यातील ब्राह्मणांनी त्याचा खून का केला..?

घाशीराम कोतवालच्या नावामुळे पुण्याचा इतिहास प्रसिद्ध आहे. घाशीराम कोतवालवरती आलेले नाटक देखील वादात सापडले होते. अनेकदा घाशीराम कोतवालविषयी चर्चा होत असतात. पण अनेकदा तो कोण होता? त्याला कशासाठी मारण्यात आले? याबद्दल अनेकांना प्रश्न पडतो.

असाच प्रश्न बोलभिडूचे वाचक रनवीर निकम यांना पडला. त्यांनी आम्हाला विचारलं की घाशीराम कोतवालचं प्रकरण जरा विस्ताराने सांगता का? आत्ता वाचकांचा प्रश्न मनावर घ्यायचं आम्ही ठरवलं आहे, म्हणून तो कोण होता आणि नेमक प्रकरण काय होतं हे विस्ताराने मांडायचं ठरवलं.

घाशीराम कोतवाल कोण होता..?

घाशीराम कोतवाल कनोजा ब्राह्मण कुटूंबातला होता. त्याच्या वडिलांचे नाव शामलदास किंवा सावलदास असल्याचं सांगण्यात येतं. मुळचा औरंगाबादचा असणारा घाशीराम पुण्यामध्ये अर्थार्जन करण्यासाठी आला होता. त्या काळी देशभरातून अनेकजण पुण्यात काम शोधण्यासाठी येत असत. अशाच पद्धतीने काहीतरी काम मिळवण्यासाठी घाशीराम कोतवाल पुण्यात आला होता. सुरवातीच्या काळात तो पुण्यामध्ये कोणते काम करत होता याचा निश्चित संदर्भ मिळत नसला तरी असं सांगितलं जातं की त्याच्या लाघवी बोलण्यामुळे तो पुण्याच्या दरबारी मंडळींच्या संपर्कात आला. काही काळातच त्याने नाना फडणवीसांची मर्जी संपादन केली.

त्या काळात लोकांमध्ये अशी चर्चा होती की, घाशीराम कोतवालास ललितगौरी नावाची अत्यंत देखणी मुलगी होती. तिच्यामुळेच त्याच्यावर नाना फडणवीसांची मर्जी बसली होती. याबाबत मात्र खऱ्या खोट्याचा संदर्भ मिळत नाही. पण घाशीरामाची कोतवालपदी नियुक्ती सर्वात प्रथम ८ फेब्रुवारी १७७७ रोजी करण्यात आल्याचे संदर्भ मिळतात. त्याची ही पहिली नियुक्ती तात्पुरती होती. एक वर्ष ती टिकली.  त्यानंतर १७८२ मध्ये त्यांची नियुक्ती कायमस्वरुपी करण्यात आली.

घाशीराम कोतवालास एका वर्षासाठी ६२१ रुपये पगार होता. त्याची छत्री धरण्यासाठी ६६ रुपये होता. कोतवाल्याच्या हाताखाली ७८ शिपाई देण्यात आले होते नंतरच्या काळात त्यांच्या संख्येत वाढ करुन शिपायांची संख्या ११५ पर्यन्त करण्यात आली होती. पुणे शहरात होणाऱ्या गुन्ह्यावर नियंत्रण ठेवणे हे घाशीराम कोतवालाचे काम होते. त्या काळात गुन्हे कोणत्या स्वरुपाचे असायचे तर सरकारच्या परवागीशिवाय वेश्याव्यवसायात येणाऱ्या स्रीयांना दंड,बकरी बोकडांची विनापरवाना हत्या, मद्यपान करुन धिंगाणा घालणे, बहिष्कृत जमातीच्या लोकांसोबत जेवण करणे, चोरी करणे, व्यभिचार करणे.

१७९०-९१ या घाशीराम कोतवालाच्या शेवटच्या काळात सर्वाधिक गुन्हे हे मद्यपी, गर्भपात, जबरदस्तीने स्त्रीयांना पळवून नेणे आणि चोऱ्यांचे झाले होते. यावरूनच असा संदर्भ दिला जातो की पुण्यातील ब्राह्मण घाशीराम कोतवालाच्या कामावर नाराज होते. त्याच्या मनमनी कामाबद्दल ते चिडून होते.

प्रत्यक्षात मात्र घाशीराम कोतवालावर नाना फडणवीसांची कृपा होती. त्यांने आपले पद कार्यक्षमरित्या संभाळले होते असे संदर्भ दिले जातात. दरबारातील अंतर्गत सत्तासंघर्षातून घाशीराम कोतवालाच्या विरोधात नाराजी पसरल्याचं सांगितलं जातं.

घाशीराम कोतवालाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेली घटना.

१७९१ च्या ऑगस्ट महिन्यात उत्सवप्रिया ब्राह्मणांचा एक मोठ्ठा तांडा रात्रीच्या वेळी शहरात शिरला होता. त्या काळात पुण्यात तोफेचा आवाज झाल्यानंतर रस्त्यावरून फिरण्यास बंदी होती. रात्री अकरा वाजता तोफेचा आवाज होई. त्यानंतर रस्त्यावरून फिरणाऱ्यांना अटक केली जात असे. रात्रीच्या वेळी शिरलेल्या त्या ३४ ब्राम्हणांना घाशीराम कोतवालाच्या शिपायांनी अटक केली.

अटक करुन त्यांना गुन्हेगार ठेवतात अशा बंधिस्त ठिकाणी डांबण्यात आले. सकाळी उठून शिपाई पहातात तर ३४ ब्राह्मणांपैकी २१ जण मृतावस्थेत होते. ही घटना घाशीराम कोतवालास सकाळपर्यन्त माहित नव्हती. शिपायांनी अटक केल्याची त्याला कल्पना देखील नव्हती. घाशीराम कोतवालास जेव्हा ही माहिती समजली तेव्हा पुण्यातील ब्राह्मणांचा क्रोध होईल म्हणून तो पेशव्यांच्या शनिवारवाड्यात आश्रयासाठी पळून गेला. तिथे त्याच्या जिवितास धोका निर्माण होणार नाही अशी त्याला खात्री होती. पेशवा स्वत: ब्राम्हणांच्या क्रोधाला घाबरला होता व त्यानेच घाशीरामास ब्राह्मणांच्या हवाली केले.

घाशीरामाने आपल्या काळात मंदिर बांधले होते. तलाव खोदला होता. तिथे सामान्य लोकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली होती. अशा ठिकाणी घाशीरामास ब्राह्मणांनी खेचत आणले. त्याला दोरखंडाने बांधण्यात आले होते. एक व्यक्ती त्याला खेचत होता तर बाकी सर्वजण त्याला दगडाने ठेचून मारत होते. छिनविछिन्न करुन त्याच्या देहाचे तुकडे करण्यात आले.

कधीकाळी याच घाशीराम कोतवालाने पुण्यात शिस्त निर्माण केली होती. आजच्या नवीन पेठेची स्थापना देखील घाशीराम कोतवालाने केली होती. अशा घाशीरामास रस्त्यावर फटफटत नेवून मारण्यात आले. या घटनेनंतर आनंदराव काशीची कोतवाल पदावर नियुक्ती करण्यात आली.

हे ही वाच भिडू. 

 

1 Comment
  1. Vishal Mang says

    Nana fadanis bddl post dya

Leave A Reply

Your email address will not be published.