जगात ऑल टाईम श्रीमंत असणारा मनसा मुसा १०० उंटावर सोनं लादून मक्केला गेला तेव्हा

जेफ बेझॉस. बिल गेटस. वॉरेन बफे. एलन मस्क. मार्क झकरबर्ग. आपल्या भारताचे मुकेश अंबानी, गौतम अदानी.

या सगळ्यामध्ये काय कॉमन आहे?

जगातली सध्याची सर्वात श्रीमंत माणसं. पण इतिहासात असा एक माणूस होऊन गेला ज्याची संपत्ती तुमच्या आमच्या कॅल्क्युलेटरमध्ये देखील मावणार नाही इतकी प्रचंड होती.

नाव मनसा मुसा

गोष्ट आहे चौदाव्या शतकातली. पश्चिम आफ्रिकेतील माली या देशात मुसा कीटा पहिला जन्माला आला. तो जन्मला ते राजघराण्यात. मुसाच्या आधी त्याचा सख्खा भाऊ अबू बक्र हा तिथला राजा होता. साधारण १३१२ साली मुसा टिबकटु मध्ये सत्तेत आला आणि त्याच नाव झालं मनसा म्हणजे बादशाह.

मनसा मुसाच राज्य प्रचंड मोठं होतं. मॉरीटानिया, सेनेगल, गांबिया, गिनिया, बुर्किना फासो, माली, नाइजर, चाड आणि नायजेरिया हे देश मूसाच्या राज्याचा भाग होते. मनसा मुसाचं राज्य मोठं होतंच पण ते एका विशेष कारणामुळे महत्वाचं होतं. ते कारण म्हणजे त्याच्या राज्यात असलेली प्रचंड खनिज संपत्ती.

या खनिज संपत्तीमध्ये म्हणे जगातल्या निम्म्या सोन्याच्या खाणी होत्या. या सोन्याच्या खाणींनी समृद्ध असणाऱ्या राज्याचा बादशाह मनसा मुसा हा प्रचंड श्रीमंत असणे साहजिकच आहे. आफ्रिकाच नाही तर युरोपमधील सोन्याच्या आणि मिठाच्या व्यापारावर मनसा मुसाचं कंट्रोल होतं.

आता त्याची नेमकी संपत्ती किती होती याची मोजदाद तर कधी होऊच शकली नाही तरीही
काही वर्षांपूर्वी अमेरिकन वेबसाईट सेलिब्रिटी नेट वर्थने अभ्यास करून एक आकडा मांडलाय. त्यांच्या अंदाजानुसार मनसा मुसा कडे तब्बल ४०० बिलियन डॉलर होते. म्हणजे आपल्या जेफ बेझॉस पेक्षाही डबल.

आता श्रीमंती आली कि त्याच्या बरोबर कथा दंतकथा देखील आल्या.

मनसा मुसाच्या बाबतीत देखील असेच किस्से फेमस आहेत.

सर्वात फेमस किस्सा म्हणजे त्याच्या मक्का यात्रेचा. असं म्हणतात की मुस्लिम धर्माचा पालन करणारा मनसा मुसा आपल्या सोबत चक्क ६० हजार लोकांना घेऊन मक्केच्या तीर्थयात्रेला निघाला होता.

आफ्रिका खंड ओलांडून सहारा वाळवंटा मार्गे त्याला इजिप्तला जायचं होतं. त्याच्या सोबत असलेल्या ६० हजार लोकांमध्ये सुरक्षेसाठी सैनिक तर होतेच मात्र सोबत १२ हजार नोकर, मनोरंजन करण्यासाठी कलाकार, व्यापारी होते. इतकंच नाही तर या सगळ्यांच्या खाण्याची सोय व्हावी म्हणून बकऱ्यांचा प्रचंड मोठा कळप देखील यात्रेत नेण्यात आला होता.

मनसा मुसाच्या या यात्रेत जे सरदार श्रीमंत व्यापाऱ्यांपासून ते त्यांच्या नोकरांपर्यंत प्रत्येकाने अंगावर रेशमी वस्त्र आणि सोन्याची आभूषणे परिधान केली होती. १०० पेक्षाही जास्त उंटांवर हजारो किलो सोने लादण्यात आलं होतं.

या मक्केच्या यात्रेदरम्यान मनसा मुसाने इजिप्त मधल्या कैरो या शहरात तीन महिने मुक्काम केला. पण त्याचा हा मुक्काम कैरो शहराच्या अर्थव्यवस्थेसाठी एका महासंकटाप्रमाणे ठरला. झालं असं कि मनसा मुसा मोठा दानशूर होता.

तो त्याच्याकडे येणाऱ्या गोरगरिबांना सोन वाटायचा. त्यामुळे झालं काय की कैरो मधले सोन्याचे दर अचानक खाली कोसळल आणि महागाई वाढली. हे फक्त कैरोमध्येच नाही तर सगळीकडे झालं. मनसा मुसा व त्याच्या साथीदारांनी जिथे जिथे मुक्काम केला तिथे तिथे. त्यांना पुन्हा उभं राहण्यासाठी तब्बल दहा वर्षे लागली.

मनसा मुसाच्या या मक्का यात्रेचा संपूर्ण आखाती देशांना हजारो कोटींचा फटका बसला. त्याची कीर्ती जगभरात पसरली. युरोपमधून प्रवासी फक्त मनसा मुसाचे ऐश्वर्य पाहण्यासाठी माली या देशात येऊ लागले होते.

सन १३३७ साली मनसा मुसा चा मृत्यू झाला त्यावेळी त्याच वय फक्त ५७ वर्षांचं होतं.

त्याच्या नंतर त्याचा मुलगाच बादशहा बनला. पण त्याला आपल्या बापाचा वारसा चालवता आला नाही. भांडणे लढाया यामध्ये मुसाची महाप्रचंड संपत्ती त्याच राज्य अनेक तुकड्यांमध्ये वाटलं गेलं. मनसा मुसाने कमावलेलं  ऐश्वर्य कथा दंतकथा मध्येच उरलं.

आजही त्याच्या बद्दल कित्येकांना उत्सुकता असते. मनसा मुसाच्या संपत्तीचं आकर्षण फोर्ब्ज सारख्या मॅगझीनला सुद्धा असत. अजूनही मनसा मुसाच्या श्रीमंतीचा विक्रम कोणालाही मोडता आलेला नाही. जगाच्या सोन्यावर राज्य करणाऱ्या मनसा मूसाला भविष्यात कोण मागे टाकेल तुम्हाला काय वाटत?

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.