मिर्झापूरचा मुन्ना पाहून झाला असेल तर खऱ्या आयुष्यातील मुन्ना बद्दल माहिती करून घ्या

मुन्ना त्रिपाठी, कालीन भैय्याचा एकुलता एक पोरगा. कालीन भैय्याच्या दूसऱ्या पोराचा अंदाज सिरीज पाहिलेल्यांनाच येईल. असो, तर मुळ मुद्दा आहे मिर्झापूर या सिरीजचा. मिर्झापूरचा दूसरा भाग आल्यापासून लोकं मुन्ना त्रिपाठीचे दिवाने झालेत.

गल्लीगल्लीत कान बंद करून XXX ललीत म्हणणारे कार्यकर्ते तयार झालेत.

पण मुन्ना होणं खऱ्या आयुष्यात शक्य नसतय. इतका स्वॅग कोण दाखवणार. मोबाईलमध्ये सेल्फी काढावी तशाप्रकारे मुन्ना बंदुकीतून फायरिंग करत असतोय ते वेगळच. थोडक्यात काय तर खऱ्या आयुष्यात मुन्ना त्रिपाठी होणं शक्य नाही…

भावांनो, आजपर्यन्त तुम्हाला अशक्य वाटणाऱ्याच गोष्टी आम्ही सांगत आलोय. आत्ता सांगतो ते ऐका, खऱ्या आयुष्यात पण एक मुन्ना झाला. हा सिरीजमधला मुन्ना त्रिपाठी त्याच्या पासंगाला पण पोचणार नाय.

खऱ्या आयुष्यातली एकच गोष्ट सांगू का?

या मुन्नाने एकदा आमदावर फायरिंग केलं. एका दमात त्यानं व त्याच्या टिमने किती गोळ्या फायर केलेल्या माहिताय का?

४००

हा हा चारशे राऊंड फायर केलेले.

खऱ्या आयुष्यातल्या या मुन्नाचं पुर्ण नावं,

मुन्ना बजरंगी.

२०१८ च्या जुलै महिन्यात बागपत जेलमध्ये दहा गोळ्या छाताडात घुसवून मुन्ना बजरंगीचा पिक्चर संपवण्यात आला. कुठे तर जेलमध्ये.

एक काळ होता जेव्हा युपी आणि बिहारमध्ये मुन्ना बजरंगीची दहशत चालायची. पण त्यांची या दहशतीच्या दुनियेतली एन्ट्री फक्त २५० रुपयांच्या जोरावर झालेली.

तर या मुन्ना बजरंगीचा जन्म १९६५ चा.

त्याचे वडील देखील आपल्या अखंण्डानंद त्रिपाठी यांच्यासारखे कालीन विकायचे. १४ व्या वर्षीचं मुन्नाचं लग्न लावून देण्यात आलं. मुन्नाच्या लग्नानंतर पाच सहा दिवसातच मुन्नाच्या काकाच आणि गावातल्या भुल्लनसिंह नावाच्या एका माणसाचं कडाक्याचं भांडण झालं.

या भांडणात भुल्लनसिंहने गावठी कट्टातून फायरिंग केलं. एक गोळी काकाला लागली आणि दूसरी मुन्नाला. मुन्नाला तर फक्त गोळी टच करुन गेलेली. पण मुन्नाने काय केलं तर २५० रुपयात एक गावठी कट्टा विकत घेतला. थेट भुल्लनसिंहच्या घरात घुसला. मुन्ना हा नेम थेट छाताडावर होता. भुल्लनसिंह मेला आणि युपी बिहारच्या दुनियेत नवा डॉन आला. तोच हा मुन्ना बजरंगी.

सुरवातीला मुन्ना फक्त जयराम पुरता मर्यादित होता. दिसेल त्याला थेट गोळी घालणे हाच एकमेव त्याचा उद्देश असायचा. या बळावर त्याने आपली दहशत निर्माण केली आणि लोकल डॉन झाला.

आत्ता काहीतरी मोठ्ठी गेम करायची होती, तेव्हा मुन्नाच्या रडारवर आला तो मुख्तार अन्सारी.

वास्तविक मुन्ना मुख्तार अंन्सारीचाच शूटर म्हणून काम करायचा.

मुख्तार अंन्सारी खऱ्या अर्थाने डॉन होता. राबिया नावाची एक महिला आमदार होती. तिच्या नवऱ्याने अन्सारी आणि मुन्नाची ओळख करुन दिलेली. पुढे मुन्ना हा अन्सारीचा खास शुटर म्हणून काम पाहू लागला. एकदा तर मुन्नाला गोळी लागली तेव्हा अन्सारीनेच त्याचा जीव वाचवला होता.

मुख्तार अन्सारीच्या सांगण्यावरून मुन्नाने पहिला राजकीय खून केला तो कैलास दुबेचा. कैलास दुबे हा भाजपचा नगरसेवक होता.

त्यानंतर खुद्द मुख्तारच राजकारणात आला. समाजवादी पक्षाकडून तो आमदार झाला आणि त्याचा साईडर म्हणून मुन्ना काम पाहू लागला.

याच दरम्यान मुन्ना प्रेमात पडला.

डॉन आला तर प्रेम पण असणारच की. टिपीकल पिक्चरसारखी डॉनची लव्ह स्टोरी झाली. मुन्नाची भेट सीमा सिंह हिच्याबरोबर झाली. दोघे प्रेमात पडले आणि १९९८ ला दोघांनी लग्न केलं.

लग्न झालं. मुन्नाला वाटलं आत्ता सगळं चांगल होईल पण पोलीसांनी मुन्नाचा ट्रॅप आवळायला सुरवात केली. एसटीएफने मुन्नाला एका ठिकाणी व्यवस्थित पकडला. त्याच्यावर फायरिंग करण्यात आलं. चकमक झाली, एनकाऊंटर झाला आणि बातमी आली मुन्ना बजरंगी पोलीसांच्या एन्काऊंटरमध्ये ठार..!

पण हो इथे पिक्चर संपला नाही.

युपी पोलीसांनी मुन्नाचा एन्काऊंटर केल्याची व तो मेल्याची पुष्टी केली पण गडबडीत. त्याला हॉ़स्पीटलला घेऊन जाण्यात आलं तेव्हा पठ्याच्यात जीव अजून शिल्लक होता. अविश्वसनीय आणि नाटकिय वगैरे पद्घतीने मुन्ना वाचला.

त्यानंतर त्याला अटक करून तिहार जेलमध्ये टाकण्यात आलं. २००२ साली मुन्ना जेलमधून बाहेर आला. आपला गुरू मुख्तार अन्सारी यांच्या सांगण्यावरून तो मुंबईला शिफ्ट झाला.

पण इकडे वातावरण पेटलं आणि अन्सारीच्या मदतीला पुन्हा मुन्ना युपीत गेला.

भाजपचे आमदार कृष्णानंद राय यांना संपवून टाकण्याचा प्लॅन मुख्तारने आखला. ही जबाबदारी शूटर मुन्नाला मिळाली.

२९ नोव्हेंबर २००५ साली लखनौ हायवेवर कृष्णानंद यांच्या दोन गाड्यांवर मुन्नाने हमला केला. एके ४७ घेवून हा हल्ला करण्यात आला होता. दोन्ही गाड्यात मिळून असणारे एकूण पाच जण या हल्ल्यात संपले.

आत्ता यात सगळ्यात महत्वाचं काय होतं माहित आहे का, तर जेव्हा या पाच जणांच पोस्ट मार्टेम करण्यात आलं तेव्हा एकेकाच्या शरीरातून ६० ते १०० पर्यन्त गोळ्या मिळाल्या. एकूण ४०० राऊंट फायर करण्यात आले होते. एका आमदाराला अशा प्रकारे संपवण्यात आल्यानंतर युपी आणि बिहारमध्ये दहशतीचं नाव म्हणजे मुन्ना भैय्या हेच झालं होतं.

मुन्ना आत्ता मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल झाला.

भाजपच्या आमदारांच्या हत्येसोबत युपी बिहारमध्ये अनेकांना ठोकण्यात त्याचा हात होता. यामुळेच पोलीसांनी त्यांच्यावर तब्बल सात लाखांच बक्षिस ठेवलं. पोलीसांनी ट्रॅप वाढवल्यानंतर मात्र मुन्ना पाब्लो एस्कोबार सारखा लपून छपून कारवाया करु लागला.

मुन्ना पुन्हा मुंबईत आला.

राज ठाकरे सांगून सांगून दमले. युपी, बिहारचे क्राईम मास्टर मुंबईत आसरा शोधण्यासाठी येतात. पण आपण लक्षच देत नसतो. असो तर मुन्नाला आसरा दिला तो मुंबईने. युपी, बिहारमध्ये पोलीस कधीही त्याला ठोकतील अशी अवस्था होती. दिल्लीत टिप देणारे अनेकजण होते. म्हणून मुन्ना मुंबईत आला.

मुंबईतच तो मोठ्ठा डॉन झाला..

इतकी मोठी कारवाई करुन तो भूमिगत झालेला. पण गंमत अशी की नंतरच्या चौकशीत समोर आलं की मुन्ना दुबईचे दौरे देखील करायचा. मुंबईतून तो युपी,बिहारला कंट्रोल करायचा. इथे थांबून आपला तळ पक्का करण्याकडे त्याने लक्ष दिले.

राजकारणातला मुन्ना

खरेतर मुन्ना मुंबईतच रहायचा. पण त्याचा कंट्रोल बिहार आणि युपीत होताच. त्यानं काय केलं तर आपलाच एक डमी उमेदवार उभा केला. दूसरीकडे मुन्ना मोठा होतोय म्हणल्यानंतर मुख्तार अंसारीने पण त्याचा डोक्यावरचा हात काढला होता. त्यानंतर मुन्ना कॉंग्रेसच्या एका नेत्यासोबत गेला. थोडक्यात मुंबईत राहून तो तिकडच्या राजकारणात सक्रीय होत होता.

पण मालाड भागात जिथे तो रहात होता तिथे कोणालाही ठावूक नव्हतं की तो युपीचा इतका मोठा डॉन आपल्या इथे राहतो. सांगणारे असही सांगतात की तो रिक्षा देखील चालवायचा. स्थानिक लोकांना तर तो गुजराती माणूस वाटायचा.

२९ ऑक्टोंबर २००९ साली अटक

मुन्नाचा फास आवळण्यात आला व २००९ सालात मालाड येथून त्याला दिल्ली पोलीसांनी अटक केली. या ऑपरेशनमध्ये मुंबई पोलीसांना देखील खूप उशीरा सहभागी करून घेण्यात आलं. अस सांगतात की मुन्नाला आपलं एन्काऊंटर होणार असल्याची टिप मिळाली होती. त्यामुळेच स्वत:च सापळा रचून मुन्नाने स्वत:ला अटक करवून घेतली होती.

दिल्लीचे एन्काऊंट स्पेशलिस्ट राजबीर सिंह यांची हत्या मुन्नाने केल्याचा संशय दिल्ली पोलीसांना होता. त्यातूनच त्याला अटक करण्यात आली होती. एकदा अटक केल्यानंतर त्याला वेगवेगळ्या जेलमध्ये टाकण्यात येत होतं.

या दरम्यानच्या जबाबात मुन्नाने ४० तरी हत्या केल्याची कबूली दिली. किमान २५० कोटींची प्रॉपर्टी तरी त्याने जमवली असेल. जेलमध्ये राहून देखील तो कारवाया करतच राहिला. अखेर तो दिवस आला. जुलै २०१८ साली बागपतच्या जेलमध्ये मुन्नाला गोळ्या घालून संपवण्यात आला.  आणि मुन्ना प्रकरणाने कायमची विश्रांती घेतली. सुनिल राठीने त्याची हत्या केल्याचं सांगण्यात आलं.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.