कॉन्स्टेबल रवींद्र पाटील अक्षरशः खंगून वारले, पण सलमानच्या विरोधातली साक्ष बदलली नाही…
रविंद्र पाटील… सलमान खानच्या हिट ऍण्ड रन प्रकरणातला साक्षीदार. तस बघायला गेलं तर रवींद्र यांच्या नावाला स्वतंत्र अशी ओळख नाही पण ‘सलमान खान’ हा संदर्भ दिला की, त्यांची ओळख लगेचच पटते. रविंद्र पाटील सलमानचे अंगरक्षक म्हणून नेमलेले पोलिस काँस्टेबल होते.
पण पैसा आणि अधिकार या दोहोंच्या ताकदीने मिळून एका प्रामाणिक माणसाचा कसा बळी घेतला त्याचीच ही कहाणी.
२८ सप्टेंबर २००२ ची ती रात्र सलमान मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता. वांद्र्यातल्या हिल रोडवरील अमेरिकन एक्सप्रेस बेकरी जवळून त्याची लँड क्रूझर चालली होती. ज्या रस्त्यावरुन गाडी जात होती, तिथल्या फुटपाथवर सलमानच्या गाडीचं एक चाक चढलं. त्या फुटपाथवर झोपलेल्यांपैकी ५ जण त्या चाकाच्या खाली आले.
या गाडीच्या अपघातात एक बेकरी कामगार ठार झाला तर, चार जण जखमी झाले होते. त्या रात्री सलमान सोबत गायक कमाल खान आणि बॉडीगार्ड रवींद्र पाटील सुद्धा होते.
मुळचे धुळ्याचे असलेले रवींद्र पाटील १९९८ बॅचचे पोलीस कॉन्स्टेबल. मुंबई पोलिसांच्या प्रोटेक्शन युनिटमध्ये कार्यरत होते. पुढं रविंद्र पाटील यांनीच सलमानच्या गाडीच्या अपघातानंतर पहिल्यांदा एफआयआर दाखल केली होती. वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रितसर तक्रार दिली होती. पुढं केस कोर्टात उभी राहिली.
त्यावेळी रवींद्र पाटील आपल्या साक्षीत म्हणतात,
त्या दिवशी त्यांची ड्युटी रात्री ८ च्या पूर्वीच सुरु झाली होती. २७ सप्टेंबर २००२ ला बरोबर ९.३० च्या सुमारास सलमान आणि कमाल खान जुहूच्या रेन बारला जायला निघाले. त्या दिवशी सलमानने टोयोटाची MH 01 DA 32 पासिंग असलेली लँड क्रुझर बाहेर काढली. आणि सलमान स्वतः गाडी चालवत होता.
बारच्या ठिकाणी पोहोचल्यावर सलमानने रवींद्रला बारच्या बाहेर थांबायला सांगितलं. त्यानंतर काही तास गेले आणि सलमान आणि त्याचा मित्र कमाल बाहेर आले. आणि पुढं ते जे डब्लू मॅरिएटच्या दिशेने जाऊ लागले. तिथं पोहोचल्यावर त्यांनी परत एकदा रवींद्रला बाहेर उभं केलं आणि जवळजवळ पहाटेच्या २ वाजून १५ मिनिटांनी बाहेर आले.
सलमानने खूप दारू प्यायली होती. गाडीत बसताना त्याने गाडी चालवू नये त्याऐवजी मी गाडी चालवतो असं रवींद्र यांनी म्हंटले पण सलमानने त्यांच्या बोलण्याकडं दुर्लक्ष केलं. सलमानने गाडी सुरु केली आणि ९० ते १०० च्या स्पीडने गाडी भरधाव सोडली. गाडीने हिल रोड जंक्शन क्रॉस करण्याच्या आधी रवींद्रने सांगितलं की गाडीचा स्पीड थोडा कमी कर कारण पुढं टर्न आहे, टर्न बसणार नाही.
पण सलमानने काही ऐकलंच नाही.
जेव्हा गाडी अमेरिकन बेकरी एक्सप्रेस जवळ आली तेव्हा गाडी फुटपाथवर जाऊन सरळ बेकरीच शटर तोडून आत घुसली. इतक्यात रस्त्यावरून रडण्याचा, व्हीव्हळण्याचा आवाज येऊ लागला. लोक गाडीभोवती जेव्हा जमले तेव्हा सलमान आणि कमाल मात्र पळून गेले. रवींद्र तिथं एकटेच होते. त्यांनी जवळच्या पोलीस कंट्रोल रुमला कॉन्टॅक्ट केला.
आणि त्यानंतर रवींद्र यांनी सलमान विरोधात बांद्रयाच्या पोलीस चौकीत कम्प्लेंट दिली. पण प्रकरण इथंच थांबलं नाही.
त्यावेळी रवींद्रवर साक्ष फिरवण्यासाठी सलमान आणि अन्य काही अज्ञात व्यक्तींनी दबाव आणल्याचे खटल्या दरम्यान उघड झालं होतं. ते कोर्टात वकिलांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायलाही घाबरत होते. त्यामुळे ते डिप्रेशनमध्ये गेले.
याच दबावामुळे ते साक्षीसाठी कोर्टात आले नाही आणि त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आलं.
याच दरम्यान सिनियर पोलीस अधिकाऱ्यांनी नोकरीवर अनुपस्थित राहिल्याचा आरोप लावून रविंद्र यांना नोकरीवरून काढलं. पुढं पोलिसांनीही त्यांचा पिच्छा पुरवला. त्यांना मुंबई सोडावी लागली. मुंबई सोडल्यानंतर रविंद्र अनेकदा चोरून लपून आपल्या पत्नीला आणि कुटुंबीयांना भेटण्यासाठी एक-दोन दिवसांसाठी मुंबईला येत होते.
कुटुंबापासून वेगळे झाल्यानंतर रविंद्र बेपत्ता झाले होते. त्यांचा ठावठिकाणा कुणालाही माहीत नव्हता. या काळात त्यांना रस्त्यावर भीक मागताना अनेकांनी पाहिल्याचं सांगितलं जातं.
कुटुंबीयांनीही त्यांना या प्रकरणातून काढता हात घेण्याचा सल्ला दिला होता पण रविंद्र यांनी त्यांचं ऐकलं नाही. रविंद्रसोबत जे काही मोजके लोक होते त्यांच्या म्हणण्यानुसार सलमान खान प्रकरणातील साक्ष बदलण्यासाठी रविंद्रवर खूप जास्त दबाव होता.
परंतु, रविंद्रनं शेवटच्या श्वासापर्यंत आपली साक्ष बदलली नाही. कुठलीही लाच त्यांनी स्वीकारली नाही. धमक्यांना भीक घातली नाही.
त्यांच्या विरोधात जे अटक वॉरंट काढण्यात आलं होतं, त्यात पोलिसांनी त्यांना महाबळेश्वर येथून अटक केली. आणि रवींद्र यांना जेलमध्ये धाडण्यात आलं. ते आपल्याला तुरुंगात वाईट वागणूक मिळत असल्याचं सांगत, रविंद्र यांनी आपल्याला तुरुंगात सीरियल किलर्सपासून दूर ठेवण्याची विनंती कोर्टात केली होती. पण, त्यांची ही मागणी फेटाळण्यात आली.
वास्तविक या प्रकरणात सरकारने त्यांना संरक्षण द्यायला हवं होतं पण तसं काही घडलं नाही.
पुढं २००७ मध्ये ते शिवडी म्युनिसिपल हॉस्पीटलमध्ये सापडले. खूप दारू प्यायल्याचा परिणाम म्हणून रविंद्र यांना टीबी झाला होता. त्यामुळे, त्यांच्यावर औषधांचा कोणताही परिणाम झाला नाही. आणि खंगून खंगून रविंद्र यांनी याच हॉस्पीटलमध्ये ३ ऑक्टोबर २००७ रोजी अखेरचा श्वास घेतला. यावेळी, त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबीयांपैकीही कुणी उपस्थित नव्हतं.
असं म्हटलं जातं की, त्यांच्या या अंतामागील कारणे संशयास्पद आहेत. याची चौकशी व्हावी यासाठी काही याचिका सुद्धा दाखल झाल्या होत्या.
हे ही वाच भिडू:
- त्या पिक्चरवेळी अक्कल आली आणि सलमान खानचा बॉलिवूडमध्ये पुनर्जन्म झाला…
- राजकुमार सलमानला म्हणाला, “तुझ्या बापाला विचार मी कोण आहे”
- सलमान सुद्धा साऊथचा स्टायलिश आयकॉन समजल्या जाणाऱ्या अल्लू अर्जुनची कॉपी करतो…