त्या पिक्चरवेळी अक्कल आली आणि सलमान खानचा बॉलिवूडमध्ये पुनर्जन्म झाला…

यहा भी होगा वहा भी होगा
अब तो सारे जहाँ में होगा क्या
मेरा ही जलवा….!

२००९ साली आलेलं हे गाणं होतं वॉन्टेड सिनेमातलं. सिनेमाचा लीड स्टार होता बॉलिवूडचा भाईजान ( अस स्वतः सलमान म्हणलाय बरं ) सलमान खान. या सिनेमाने बॉलिवूडमध्ये सल्लू भाईचा पुनर्जन्म झाला अस म्हणतात. नेमकं याआधी सलमान कसा फ्लॉप सिरीजच्या गर्तेत अडकला होता त्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती पाहूया.

साल होतं २००८ चं. शाहरुख खानचा ओम शांती ओम आणि अमीर खानचा गजनी हे दोन सिनेमे तुफ्फान चालत होते. आता खान त्रिकुट म्हणल्यावर सलमान खानचा उल्लेख यात आलाच पाहिजे पण आमिर आणि शाहरुख बॉक्स ऑफिसवर धिंगाणा घालत होते तर सलमान खान तिसऱ्याच भानगडीत होता.

९० च्या दशकानंतर म्हणावं तस यश त्याच्या पदरी पडलं नव्हतं. एका चांगल्या हिटच्या शोधात तो होता. सलमान भाईच स्टारडम कमी होत चाललं होतं आणि प्रोड्युसर लोकं लीड म्हणून सलमानला घ्यायला कचरत होते.

पण २००९ साल सलमान खानच्या आयुष्यात पुन्हा एकदा तगडं स्टारडम घेऊन आलं. एक बार जो मैने कमिटमेंट कर दी, तो मै अपने आप की भी नहीं सूनता…हा डायलॉग लहान मुलांसकट मोठ्या माणसांना सुद्धा तोंडपाठ झाला होता.

जलवा गाण्याचा रिदम लोकांच्या डोक्यात घुमू लागला.

या सिनेमातल्या सोप्या आणि कॅची डान्स स्टेप डान्स ग्रुपमध्ये चांगल्याच फेमस होऊ लागल्या. या सिनेमाने पुढच्या काही वर्षात सलमानला इतका बिग बजेट हिरो बनवलं की त्याच्या नावावर सिनेमा चालू लागला.

वॉन्टेड बनला खरा पण म्हणत्यात ना नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न तसा प्रकार घडला. वॉन्टेड बनला होता पण जगभरात मंदीचं सावट होतं, त्यामुळे सिनेमा खरेदी करायला कोणी पुढे येईना, याला कारण होतं सलमान खान असेल म्हणून सिनेमा फ्लॉप असं गणित होतं. अशा अनेक लफडयातून मार्ग काढत शेवटी बोनी कपूरने सिनेमा खरेदी केला आणि वितरित करायचा निर्णय घेतला.

आता सगळं आलबेल झालं होतं की अजून एक कारण पुढे आलं ते म्हणजे रमजानच्या शेवटी हा सिनेमा रिलीज झाला होता पण सणासुदीच्या काळात कोण सिनेमा पाहणार ,त्यामुळं सिनेमा पडणार अशाही वलग्ना केल्या जाऊ लागल्या, वॉन्टेडच्या काही दिवस अगोदर मल्टिफ्लेक्सवाले संपावर होते.

संप मिटला सिनेमाला ए सर्टिफिकेट मिळालं. पण स्पर्धक म्हणून पुढे सिनेमा होता यशराज बॅनरचा दिल बोले हडीप्पा. पण एवढ्या सगळ्या राड्यारोड्यातुन मार्ग काढत वॉन्टेड सुपरहिट झाला आणि बॉक्सऑफिसवर चांगला गल्ला जमवून गेला.

वॉन्टेड हा साऊथच्या महेश बाबूच्या पॉकेरीचा रिमेक होता.

ओरिजिनल वॉन्टेड बघताना सलमान खानने डोळे बंद करून सिनेमा पाहिला होता कारण त्याची आणि महेश बाबूची अभिनय शैली सेम वाटू नये म्हणून. हा सिनेमा आधी प्रभुदेवाने शाहरुखला ऐकवला होता आणि शाहरुख तयार सुद्धा झाला होता पण काही कारणास्तव त्याला या सिनेमाला वेळ देता आला नाही आणि शेवटी तो सिनेमा सलमान खानच्या वाट्याला आला आणि सलमानने त्या सिनेमाचं आणि संधीचं सोनं केलं.

साजिद वाजीद यांचं म्युझिक, आयेशा टाकिया हिरोईन ,प्रभुदेवा यांच्यामुळे सिनेमा अजूनच ब्लॉकबस्टर झाला. आजही मेरा ही जलवा गाण्यात गेस्ट एपिरियन्स म्हणून अनिल कपूर आणि गोविंदा लोकांच्या लक्षात आहेत. वॉन्टेड सिनेमापासून ईदला सिनेमा रिलीज करायचा सलमान खानचा ट्रेंड सुरू झाला. 2009 नंतर ईदला सिनेमा सलमान खान रिलीज करू लागला त्याच्या फॅन्स लोकांना ईदी म्हणून.

आजही वॉन्टेडमध्ये असलेली सलमानची एनर्जी, फ्रेशपणा त्याच्या इतर कुठल्या सिनेमात पाहायला मिळत नाही पण वॉन्टेड मुळे त्याचा पुनर्जन्म झाला हे मात्र खरं…..!

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.