कमाल करणारा ढोलकीपटू महाराष्ट्रात होऊन गेला आहे, त्यांचं नाव राम जामगावकर. 

जुन्या मराठी गाण्यांकडे एक नजर मारल्यास त्यातली अनेक गाणी आजही ऐकली की खूप छान वाटतं. कधी कधी तर एखादं साधं गाणं सुद्धा बॅकग्राऊंडला असणाऱ्या ढोलकी मुळे फक्कड जमून येतं.

सध्याच्या काळात ढोलकीचा असा जादुई वापर नटरंग सिनेमात दिसून आला. कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी या गाण्यात विजय चव्हाण यांनी ज्या प्रकारे ढोलकी वाजवली आहे. केवळ लाजवाब !

अशीच कमाल करणारा ढोलकीपटू महाराष्ट्रात होऊन गेला आहे. त्यांचं नाव राम जामगावकर. 

सध्याच्या काळात रॉक संगीत ऐकून आपले पाय थिरकतात. जुन्या जमान्यात मात्र ज्या गाण्यांना ढोलकीची साथ असायची ती गाणी वातावरणात एक वेगळाच माहोल निर्माण करायची. आजही तुम्ही जर लावणी ऐकली तर मन अगदी प्रसन्न होऊन जाईल. याच जमान्याचा साक्षीदार म्हणणे ढोलकी वादक राम जामगावकर.

मुंबईतील गिरणगावात राम यांचं बालपण गेलं. राम यांचे वडील विख्यात पखवाज वादक होते. वडिलांचे गुण मुलामध्ये उतरले. लहानपणी राम घरात असलेले डबे किंवा जी काही वस्तू हातात दिसेल ती वाजवत सुटायचा. वडिलांना मुलामध्ये असलेल्या कलेची जाण झाली. त्यामुळे त्यांनी राम ला साटमबुवांकडे ढोलकी शिकायला पाठवले.

एकदा राम वडिलांसोबत साटम बुवांचा दुरुस्तीसाठी दिलेला पखवाज आणायला गेला. ज्या ठिकाणी राम पखवाज आणायला गेले होते, तिथे एक ढोलकी त्यांना दिसली. ढोलकी दिसताच राम ची ढोलकी वर थाप पडली. राम जी ढोलकी वाजवत होता ती शाहीर साबळेंची ढोलकी होती. 

ढोलकी न्यायला आलेले शाहीर साबळे यांचे सहाय्यक राम चं ढोलकी वादन ऐकत उभे होते. रामचं ढोलकी वादन ऐकून ते राम ला शाहीर साबळेंकडे घेऊन गेले. राम ने शाहीरांसमोर ढोलकी वादन केले. शाहीर राम ची ढोलकी ऐकून प्रभावित झाले.

त्या क्षणी शाहिरांनी राम च्या गळ्यात आपली ढोलकी घातली. त्याआधी शाहीर साबळे स्वतःच ढोलकी वाजवायचे. परंतु त्यांनी राम वर विश्वास ठेवला. आणि अशाप्रकारे राम जामगावकर यांचा ढोलकी वादनाचा प्रवास सुरू झाला. 

शाहिरांच्या माकडाला चढली भांग, आंधळं दळतंय, बापाचा बाप, कोंडू हवालदार या लोकनाट्यांमधून राम च्या ढोलकीचा आवाज घुमू लागला. पुढे संगीतकार वसंत देसाई यांच्याकडे नवरंग, दो आँखें ‌बारह हाथ, बायांनो नवरे सांभाळा या सिनेमांमधून राम जामगावकर यांची ढोलकी निनादू लागली.

शाहीर विठ्ठल उमप, लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर अशा अनेक गायकांना राम यांनी ढोलकीची साथसंगत केली. प्रल्हाद शिंदेंच्या चल ग सखे पंढरीला, दर्शन दे रे भगवंता, आता तरी देवा मला पावशील का अशा अनेक गाजलेल्या गीतांना राम जामगावकर यांनी ढोलकी वाजवून बहार आणली आहे. भिडूंनो, आत्ता तुमच्या लक्षात आलं असावं… राम जामगावकर हे किती महान ढोलकी पटू होते !

राम जामगावकर यांनी ढोलकीचा ताल धरलेली अनेक गाणी लोकप्रिय झाली होती. त्या काळात एका गाण्यावर केलेल्या ढोलकी वादनाने प्रचंड खुश होऊन आशा भोसले यांनी ढोलकीच्या प्रतिकृतीची सोन्याची अंगठी राम जामगावकर यांना भेट म्हणून दिली. राम जामगावकर मंगेशकर कुटुंबाचे सर्वात आवडते ढोलकीपटू होते. 

महाराष्ट्राचे ढोलकी भूषण असलेले राम जामगावकर आज काळाच्या पडद्याआड गेले असले तरीही अप्रतिम ढोलकी वादन केलेली त्यांची गाणी सदैव त्यांचं स्मरण देत राहतील. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.