नोकरी लाथाडून तमासगीर झालेल्या दादू इंदुरिकरांनी गाढवाचं लग्न महाराष्ट्रात कायमचं हिट केलं….

तमाशा म्हणलं की आपल्याला सगळयात आधी आठवते ती लावणी आणि संगीतबारीची दुनिया. एकदा का ढोलकीवर थाप पडली की मग विचारूच नका. तसं तमाशात हलगी ढोलकी जुगलबंदी, गण, गवळण, बतावणी, वग असं सगळं असतं पण तमाशा म्हणल्यावर जनरली आपण लावणीच गृहीत धरतो

पण भिडू एक पात्र असं असतं तमाशात जो लावणीच मार्केट खाऊ शकतो,

गावात ज्या पाटलाने तमाशा आणलाय त्याची भर जत्रेत फिरकी घेऊ शकतो तो म्हणजे वन अँड ओन्ली

सोंगाड्या..!

आता सोंगाड्या म्हणल्यावर आपल्याला दादा कोंडकेंचा सिनेमा आठवतो पण तमाशातला सोंगाड्या एक असं पात्र आहे जे फडांचा श्वास मानलं जातं.

महाराष्ट्राला लोककलावंतांची मोठी परंपरा. आजवर अनेक सोंगाडे झाले पण एकच गाजला आणि लोकांच्या गळ्यातला ताईत बनला असा महान विनोदसम्राट, वगसम्राट दादू इंदुरिकर. गावातला तमाशा शहरातल्या नाकं मुरडणाऱ्या पांढरपेशी लोकांना पाहायला भाग पाडणारा अवलिया म्हणजे दादू इंदुरीकर. 

पण जर सुरवात करायची म्हणलं तर एकंदरीत हे दादू इंदुरिकर एकदम करामती माणूस होते. महाराष्ट्र भर त्यांच्या विनोदाने लोकं खळखळून हसली पण पर्सनल आयुष्यातसुद्धा ते खतरनाक होते.

मार्च 1928 ला दादू इंदुरिकरांचा जन्म झाला. त्यांचं मूळ नाव होतं गजानन राघू सरोदे. आईचं नाव नाबदाबाई तर वडिल राघू हे भेदीक रचणारे नामवंत तमासगीर होते. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंदुरी गावात दादू इंदूरिकर यांचा जन्म झाला होता आणि तमासगीर घराणं असल्याने गावाचं आडनाव त्यांनी स्विकारल होतं.

लहानपणापासून घरात लोककला आणि रंगभूमीच वातावरण होतं. त्यामुळे साहजिकच तमाशाची गोडी लागणारच होती.

पण घरच्यांनी दादुंना शाळा शिकवली. शाळेत मन लागत नसे. कशीबशी तेंव्हा सातवी त्यांनी पुर्ण केली आणि लगेच त्यांना चांगली नोकरी मिळाली. दादुंना त्यांच्या घरचे म्हणत होते की नोकरी कर हा तमाशाचा नाद सोडून दे. यावर पोट भरत नाही पण ऐकतील ते दादू कसले. त्यांनी नोकरी न करता तमासगीर होण्याचा निर्णय घेतला.

सुरवातीला प्रसिद्ध तमासगीर बाबुराव पुणेकरांच्या तमाशा फडात दादू इंदुरिकर काम करू लागले. इथच त्यांना कॉमेडीची जादू कळाली. तो जो त्यांना विनोदाचा सुर सापडला तो शेवटपर्यंत त्यांनी टिकवला. वयाच्या 20- 21 व्या वर्षी दादू इंदुरिकर यांनी गावकऱ्यांच्या मदतीने दादू मारुती इंदुरिकर या फडाची निर्मिती केली आणि बाऱ्या सुरू केल्या सोबतच लोकरंगभुमिवर प्रयोग करायला सुरवात केली.

सहज साधा मुद्रभिनय, हजरबाबीपणा, परफेक्ट डायलॉग डिलिव्हरी, दर प्रयोगाला नविन नविन कोट्या यामुळे एकदम टॉपचा सोंगाड्या म्हणून दादू इंदुरीकर गाजू लागले.

गाढवाचं लग्न, हरिश्चंद्र तारामती, मल्हारराव होळकर, मराठशाहीची बोलती पगडी, मीठाराणीचा वग हे वगनाट्ये इतकी गाजली की अजूनही या वगांची आठवण काढली जाते. या वगांमध्ये जीव ओतला तो दादू इंदुरिकर यांनी त्यामुळे त्यांना वगसम्राट अस म्हटलं जाऊ लागलं. दूरदर्शनवर पहिल्यांदाच दाखवण्यात आलेल्या येड्या बाळ्याचा फार्स ( 1960 ) या फार्सात इंदूरीकरानी मोठी बाजी मारली होती.

गाढवाचं लग्न हे वगनाट्य दादू इंदुरिकर यांच्यामुळे महाराष्ट्रात फेमस झालं. लोकांचा झुंबड उडत असे जेव्हा या वगाचे प्रयोग असे. यातल्या सावळ्या कुंभाराची भूमिका इंदूरिकरांनी अजरामर केली होती. 

त्यांच्या या वगाचे चाहते होते पू. ल. देशपांडे. दादुंचा अभिनय बघून पुलंनी त्यांना महाराष्ट्राचा पॉलमुनी असं म्हटलं होतं तर शंकर घाणेकर यांनी वगसम्राट ही पदवी त्यांना दिली. गाढवाचं लग्न या वगामुळे काय झालं तर ग्रामीण आणि शहरी भागात तमाशा अधिकच लोकप्रिय झाला. 

1969 ते 1973 या काळात तमाशा परिषदेने आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये त्यांच्या फडाला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाल. राष्ट्रीय संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार पारंपारिक लोककलावंत म्हणून दादू इंदुरीकर यांना मिळाला. तेव्हाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते इंदुरीकर यांचा सत्कार करण्यात आला होता.

तमाशा परिषदेने दादूला विनोदमूर्ती ही पदवी बहाल केली तर जनता दादूंना सोंगाड्यांचा दादा म्हणून संबोधू लागली.

दादू इंदुरीकर यांनी लोककलेची जोपासना करताना सामाजिक कार्याच भानही ठेवलं. गाढवाचं लग्न या लोकनाट्याच्या माध्यमातून मिळालेला पैसा त्यांनी शाळा बांधणे धर्मशाळा बांधल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या पुस्तक पुरवणे अशी बरीच कामे केली. 

आता विषय दादा कोंडके यांचा सोंगाड्याचा. ज्यावेळी दादा कोंडके सोंगाड्या बनवत होते त्यावेळी त्यांना मोठ्या अडचणी येत होत्या त्या पात्राची धाटणी त्यांना समजत नव्हती. अशा वेळी दादा कोंडके दादू इंदुरीकर यांच्याकडे गेले आणि इंदुरीकरांकडून ते पात्र समजावून घेतलं. सोंगाड्या पूढे दणक्यात सुपरहिट झाला.

आजवर अनेक सोंगाडे आले गेले पण दादू इंदुरिकर यांच्यासारखा वगसम्राट दुसरा होणे नाही.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.