सुसायटीवारा अण्णाने त्या काळात झेकोस्लोव्हाकियातल्या कंपनीची फॅक्टरी आणून कारखाना उभारला.

अण्णाने जेव्हा सामायिक लग्नसोहळा सुरू केला तेव्हा लोक त्यांना समायीक लग्नवाला अण्णा म्हणू लागले. अण्णानी जेव्हा पतपेढी संस्थेची नोंदणी केली तेव्हा लोक त्यांना सुसायटीवारा अण्णा म्हणू लागले. याच अण्णाने पुढे जावून आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना सुरू केला. अण्णांच नाव विठ्ठलराव विखे पाटील. शालेय पाठ्यपुस्तकापासून आपण वाचत आलो की आशिया खंडातील पहिला सहकारी कारखाना विठ्ठलराव विखे पाटील व धनंजय गाडगीळ यांच्या पुढाकारातून उभा राहिला.

हि गोष्ट अण्णांची आणि त्यांच्या पहिल्या सहकारी साखर कारखान्याची.

सहकारमहर्षी, सहकारी साखर कारखानदारीचे आद्य प्रवर्तक, कृषी-उद्योगिक विकासाचे प्रवर्तक म्हणून विठ्ठलराव विखे पाटलांना ओळखले जाते. त्यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०१ सालचा. विठ्ठलरावांना थोरला एक भाऊ व पाच बहिणी होत्या. चौथी पर्यन्त शिक्षण पुर्ण केलेल्या विठ्ठलरावांनी त्या काळात कृषी क्षेत्रातून शेतकऱ्यांचा विकास करण्याच स्वप्न पाहिलं. १९२३ साली म्हणजे वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी लोणी बुद्रुक येथे सहकारी पतपेढी संस्थेची नोंदणी केली होती. सहकारी पतपेढीमुळे लोक त्यांना सुसायटीवारा अण्णा म्हणून ओळखत असत. घरची परिस्थिती उत्तम असल्यामुळेच त्यांना स्वत:चे यंत्र आणून खांडसरी उत्पादनाची सुरवात १९४३ सालापासून करण्यास सुरवात केली होती.

पण मुद्दा आहे तो पहिल्या सहकारी साखर कारखान्याचा.

लोणी इथे भुताचा माळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागेवर आशिया खंडातला पहिला सरकारी साखर कारखाना उभा राहिला. जि बागायतदार को ऑपरेटिव्ह शुगर प्रोड्युसर्स सोसायटी लिमिटेड लोणी या संस्थेची स्थापना १९२५ च्या सहकार कायद्याअंतर्गत १९४८ साली करण्यात आली होती. कारखाना उभारणीसाठी सर्वात महत्वाची गोष्ट होती ते म्हणजे भांडवल गोळा करणे. त्यासाठी त्यांनी गावोगाव फिरून शेतकऱ्यांना सभासद करून घेतले. सोबत इडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशनकडून वीस लाखांचे कर्ज मंजूर करून घेतले.

हळुहळु करत पैशाची जुळणी होवू लागली. गावोगावी फिरून भांडवल गोळा केल्यानंतरचा प्रश्न होता तो फॅक्टरीचा.

त्या काळात साखर कारखान्याची संख्या नगण्य होती. बेलापूर येथे खाजगी क्षेत्रातला साखर कारखाना होता. रेल्वेने साखर कारखान्याची यंत्रसामग्री बेलापूर येथे पोहचली. त्या काळात झेकोस्लोव्हाकियामधल्या स्कोज कंपनीची फॅक्टरी विखे पाटलांनी २२ लाख रुपयांना खरेदी केली होती. वैंकुठभाई मेहता व धनंजयराव गाडगीळ यांच्या सहकार्यामुळे काम पुर्णत्वाकडे चाललं होतं. दिनांक ६ एप्रिल १९५० ला फॅक्टरी पोहच झाली.

दिनांक २३ डिसेंबर १९५०. ही तारिख होती साखर कारखाना सुरू होवून मिळालेल्या पहिल्या हंगामाच्या हिशोबाची. पहिल्याच हंगामात ३३ हजार टन गाळप करण्यात आले. त्यातून ३७,५०१ पोती साखरेचं उत्पादन झालं आणि कारखाना कित्येक वर्ष सुरू राहणार यावर शिकामोर्तब करण्यात आलं.

कारखान्याचे उत्पादन सुरू झाल्यानंतर १ जून १९५२ साली म्हणजे दोन वर्षानंतर कारखान्याचे नाव दि प्रवरा सहकारी साखर कारखाना लि. असे करण्यात आले.

आत्ता या कारखान्याची गंम्मत म्हणजे कारखान्याचे उद्घाटन. कारखान्याचे उद्घाटन कारखाना सुरू झाल्यानंतर सुमारे नऊ वर्षानंतर करण्यात आले. १५ मे १९६१ साली पंडिल जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थिती या कारखान्याचे उद्घाटन करण्यात आले. कारखान्याच्या स्थापनेपासून ते १९६० पर्यन्त अकरा वर्ष धनंजयराव गाडगीळांनी कारखान्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पाहिली व त्यानंतर १९६० ते १९६४ पर्यन्त विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष राहिले.

कारखान्याच्या यशस्वी जाणिवेसोबतच शिक्षणासाठी विठ्ठलराव विखेंनी महात्मा गांधी विद्यालयाची स्थापना केली. याच शाळेत शरद पवारांच प्राथमिक शिक्षण झालं. मुलींच्या शिक्षणासाठी प्रवरा कन्या विद्या मंदीर, इंग्रजी शिक्षणासाठी प्रवरा पब्लिक स्कूल १९६४ साली सुरू करण्यात आले.

इंग्रजी हे वाघिणीचं दूध आहे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. याच तत्वाने १९६४ साली प्रवरानगर येथे इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणारी शाळा सुरू करण्यात आली.  प्रवरा मेडिकल ट्रस्टची स्थापना करण्यात आली. कर्मवी भाऊराव पाटलांशी ते सल्लामसत करत असत. त्यांच्या विचारांवर पाईक राहून त्यांनी शिक्षणक्षेत्राची गंगोत्री उभारण्याच महत्वाच काम केलं. त्यांच्या पश्चात पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच नाव कारखान्यास देण्यात आले.

स्पष्टवक्तेपणा हा जसा त्यांचा गुण होता तसा दूसऱ्यांना मोठ्ठेपणा देण्याचा समंजसपणा देखील त्यांच्याकडे होता. म्हणूनच धनंजय गाडगीळ यांच्यासारख्या व्यक्तीला त्यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदाची सुत्रे दिली होती. 

हे ही वाच भिडू. 

1 Comment
  1. Dr Bhujbal says

    गाडगीळ यांचा नामोल्लेख लेखात एकेरी केला आहे ,असे योग्य नाही
    धनंजय राव गाडगीळ असा करावा

    He was vice president of planning commission of India then .🙏

Leave A Reply

Your email address will not be published.