डिनो मोरियाला गोत्यात आणणारा नितीन संदेसरा कोण आहे??

काल सक्तवसुली संचलनालयाने अभिनेता डिनो मोरिया, कॉंग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचा जावई इरफान अहमद सिद्दिकी या दोघांसह अनेक दिग्गज लोकांवर कारवाई केली. मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. यात जवळपास ८ कोटी ७९ लाखांची संपत्ती जप्त केली आहे. त्यात ८ मालमत्ता आणि ९ गाड्यांचा समावेश आहे. यामध्येच डिनो मोरियाच्या संपत्तीचा समावेश आहे.

ED म्हटलं आहे की,

जप्त केलेल्या संपत्तीपैकी ३ कोटी रुपयांची मालमत्ता संजय खान यांची आहे. तर अभिनेता डिनो मोरियाची संपत्ती १.४ कोटी रुपये आहे, डिजे अकील नावाने लोकप्रिय असलेल्या अकील अब्दुलखलील बचूअलीची संपत्ती १.९८ कोटी रुपये आहे. तर इरफान अहमद सिद्दिकी यांची संपत्ती २.४१ कोटी रुपयांची आहे.

महत्वाचे म्हणजे ज्या प्रकरणात या सगळ्यांची संपत्ती जप्त झाली आहे त्याच प्रकरणात अहमद पटेल यांची देखील ED ने चौकशी केली होती. अहमद पटेल यांचे नोहेंबर २०२० मध्ये निधन झाले.

हे प्रकरण म्हणजे नितीन संदेसरा घोटाळा…

गुजरातमधील सुप्रसिद्ध उद्योजक पण सध्या फरार असलेल्या संदेसरा बंधूंनी तब्बल १४ हजार ५०० कोटी रुपयांचं कर्ज घेऊनं बँकांना चुना लावला होता. याच संदेसरा घोटाळा प्रकरणाच्या तपासादरम्यान इरफान सिद्दीकी आणि डिनो मोरिया यांचेही आर्थिक लागेबांधे पुढे आले होते. त्यामुळे हि करावाई झाली आहे.

आता हे लागेबांधे कसे? तर, 

स्टर्लिंग बायोटेक मधून डिनो मोरियासह इतर कारवाई झालेल्यांच्या खात्यात अनधिकृतरित्या पैसे ट्रान्स्फर करण्यात आले असा ED चा दावा आहे. त्यावर आक्षेप घेत ED ने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.

स्टर्लिंग बायोटेक नेमक आहे तरी काय?

स्टर्लिंग बायोटेक ही वडोदरा मधील औषधे बनविणारी कंपनी आहे. १९८५ मध्ये तिची स्थापना झाली होती. कॅप्सूलच्या वरचे जिलेटीन बनवण्याचे काम ही कंपनी करायची. हिच स्टर्लिंग बायोटेक संदेसरा ग्रुपची एक कंपनी आहे. याशिवाय तेल, रियल इस्टेट, इंजिनीयरिंगचे काम सुद्धा संदेसरा ग्रुपच्या माध्यामतून करण्यात येते.

नितीन संदेसरा कोण आहे

संदेसरा ग्रुप ऑफ कंपनीजच्या अंतर्गत नितीन आणि त्याचा भाऊ चेतन संदेसरा यांच्या अनेक कंपन्या आहेत. भारताबरोबरच नायजेरिया, संयुक्त अरब अमिरात, अमेरिका आदी देशात संदेसरा यांच्या खूप साऱ्या कंपन्या आहेत. रियल इस्टेट बरोबरचं इतर व्यवसायांचा समावेश आहे.

संदेसरा बंधूनी निरव मोदी पेक्षा मोठा घोटाळा केला?

संदेसरा बंधूंनी २००४ ते २०१२ युको बँक, अलाहाबाद बँक, आंध्र बँक, भारतीय स्टेट बँक (स्टेट बँक ऑफ इंडिया – एसबीआय), बँक ऑफ इंडिया यांच्या परदेशात असलेल्या शाखांमधून व्यावसायिक कारण देत स्टर्लिंग बायोटेक कंपनीने कर्ज घेतले होते. हे कर्ज घेताना काही रक्कम भारतीय चलनात आणि काही रक्कम विदेशी चलनात घेण्यात आली.

या घेतलेल्या कर्जाचा संदेसरा भावांनी खासगी खर्चासाठी तसेच परदेशातील स्वतःच्या कंपन्यांसाठी वापर केला. पण जे कारण देत कर्ज घेतले त्या व्यवसायासाठी कर्जाचा विनियोग झाला नाही. नंतर स्टर्लिंग बायोटेक कंपनीने हे कर्ज बुडवले.

बँकांच्या तक्रारीनंतर सीबीआयने गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. तेव्हा बरीच धक्कादायक माहिती समोर आली. ती म्हणजे संदेसरा ग्रुपच्या परदेशातील कंपन्यांनी भारतीय बँकांच्या परदेशातील शाखांमधून देखील कर्ज घेतलं. जे की जवळपास ९ हजार कोटी होतं. यावर सीबीआयने पुढे चार्जशीट देखील दाखल केली. सीबीआयच्या याच चार्जशीटच्या आधारे ED ने गुन्हा दाखल केला आणि तपास सुरु झाला.

सीबीआय आणि ED च्या मते,

स्टर्लिंग बायोटेकचे संचालक नितीन संदेसरा, चेतन संदेसरा, दीप्ती संदेसरा, राजाभूषण दीक्षित, विलास जोशी यांच्यासह कंपनीच्या संचालकांनी भारतीय बँकांची १४ हजार ५०० कोटींची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. तर निरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेची ११ हजार ४०० कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

ED च्या दाव्यानुसार, संदेसरा बंधूंनी फरार होण्याआधी त्यांनी कर्ज घोटाळ्यातून उभ्या केलेल्या संपत्तीपैकी काही संपत्ती ही निवडक व्यक्तींकडे सोपवली होती. त्यातील डिनो मोरिया हे एक आहे. तर या सगळ्या घोटाळ्यादरम्यान काही बनावट कंपन्या तयार केल्या गेल्या, ज्यात अहमद पटेल यांच्या जावयाच्या घरचा पत्ता हेडक्वार्टर म्हणून वापरला आहे.

बँकेकडून कर्ज घेऊन फरार होणाऱ्यांची भारतात कमी नाही. यात आघाडीच्या नावामध्ये नितीन संदेसरा याचे नाव घेण्यात येते. २०१९ मध्ये नितीन संदेसरा आणि त्याच्या भावाला फरार घोषित केले आहे. मध्यंतरी एकदा नितीन संदेसरा याला दुबईत अटक करण्यात आली अशी बातमी सांगण्यात आली होती. मात्र नंतर ती खोटी निघाली. संदेसरा बंधू नायजेरियात लपून बसल्याचे सांगण्यात येते.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.