पुण्याचा बॅटमॅन कोरोनापासून जगाला वाचवणार काय ?

जगात आजवर हजारो सुपरहिरो बनले. सुपरमॅन पासून आपल्या शक्तिमान पर्यंत. खतरों में घिरी दुनिया को बचाना या सिंगल अजेंड्यावर त्यांचं काम चाललेलं असतंय. यासाठी कोण आभाळात उडतंय  कोण कोळ्याचं जाळंच फेकतंय, कोण आपल्या डोळ्यातून वीज फेकतंय.

या सुपरहिरोंना देवाने काही ना काही सुपर पॉवर दिलेल्या असतात. पण कोणतीही दैवी शक्ती नसताना आपल्या बाप जाद्यांच्या पैशावर जगाला वाचवायला निघालेला सुपरहिरो म्हणजे बॅटमॅन !

काल्पनिक गॉथम सिटीचा हा रक्षणकर्ता. काळ्या कपड्यातला मास्कधारी बॅटमॅन जोकर, रास-अल -गुल, टू फेस, स्केअर क्रो अशा विचित्र शत्रुंपासून गावाला वाचवण्यासाठी डार्क नाईट बनून धावून येत असतो.

कुठलंही संकट आलं की गॉर्डन नामक पोलीस रात्री बॅट सिग्नल आणि हा काळा केप घालणारा क्रुसेडर वटवाघुळाप्रमाणे येतो, त्याच्या जवळ लेटेस्ट टेक्नॉलॉजीपासून बनवलेली शस्त्रे असतात, त्यांचा आणि आपल्या हुशार डोक्याचा वापर करून तो शत्रूंचा  नायनाट करतो. गॅजेट हे बॅटमॅनचे शक्तीस्थान आहे.

सगळ्यात भारी गॅजेट त्याची बॅटमोबिल आहे. बघायला गेलं तर चार चाकी कार पण अगदी बॉम्ब प्रूफ, एखादा मिनी मिसाईल रणगाडा असलेली हि बॅटमोबिल दिसायला पण एकदम टवका आहे. वटवाघुळाप्रमाणे पंख असलेली बॅट मोबिल बॅटमॅनच्या प्रत्येक बऱ्या वाईट काळात त्याला साथ देते.

पण बॅटमॅन खरा कोण आहे ते त्या गॉथम मधल्या कोणालाही ठाऊक नाही. तो सर्वसामान्या पैकीच एक आहे असच सगळ्यांना वाटत असतं. पण बॅटमॅन हा खरं  तर डॉ. थॉमस वेन आणि मार्था वेन यांचा लेक असतो.

त्याच नाव ब्रूस वेन. जगप्रसिद्ध वेन एन्टरप्राइजेसचा एकुलता एक वारस.

लोकांपासून लपून तो डबल आयुष्य जगत असतो. दिवसभर चैनी करतो पोरी फिरवतो, शॅम्पेन उडवतो, पैशे जाळणे म्हणजे काय प्रकार हे ब्रूस वेनकडे बघून कळेल. त्याच्या वडिलांच्या नावाने बनवलेली थॉमस वेन फाउंडेशन हि संस्था मेडिसिन व मेडिकल हेल्प यासाठी काम करते.

जर गॉथममध्ये एखाद्या व्हिलनने रोगराई पसरवली तर वेन फाउंडेशन तर्फे औषधं बनवून लोकांना पर्यंत पोहचवली जातात. पण ब्रूस वेन हा बॅटमॅन असेल हे कोणाला सांगूनही पटत नाही. अनेकदा बॅटमॅन हाच एक व्हिलन आहे असं लोकांना वाटत राहत. पण तो कधी याची पर्वा करत नाही.

IT’S NOT WHO I AM UNDERNEATH, BUT WHAT I DO THAT DEFINES ME.

तर असा हा बॅटमॅन आणि अशीही त्याची दुनिया. न्यूयॉर्क ते नेपाळ गल्लीबोळातल्या प्रत्येकाला त्याची क्रेझ आहे.

पण मध्यंतरी एक गंमतच झाली, पुण्याच्या लक्ष्मी रोडच्या ट्रॅफिकमध्ये आलेल्या अलका चौकाच्या सिग्नलवर वैतागलेल्या पुणेकरांना आपल्या खटारा पीएमटीच्या धुरात एक दणदणीत बॅट मोबील उभी असलेली दिसली. तीही दिवसाढवळ्या.

पेठेतली लोक चक्रावली, एकेकाळी बाजीरावाच्या घोड्यांच्या टापा पाहिलेल्या या पुण्यनगरीत बॅटमॅन कुठून आला अशी चर्चा झाली.

आता बॅट मोबिल कोणाची हे न कळायला हे काही गॉथम नाही. गल्लीतल्या पोरापोरींची लफडी वासावर ओळखणाऱ्या पेठेतल्या शोध पत्रकारांनी दुसऱ्या दिवशी बातमी लावली. हा बॅटमॅन दुसरा कोणी नाही तर पुनावाला उद्योगसमूहाचा राजपुत्र आदर पुनावाला आहे.

आदर पुनावाला. जगप्रसिद्ध सिरम इन्स्टिट्यूटची स्थापना करणाऱ्या सायरस पुनावाला या पारशी सद्गृहस्थांचा सुपुत्र. जरा कमी ब्रूस वेन इतकाच श्रीमंत. जगातील व्हॅक्सिन बनवण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. पुण्याचे रेसकोर्स त्यांच्या मालकीचे आहे अशी चर्चा असते . ब्रूस वेनच्या वेन मॅन्शन सारख्याच भल्या मोठ्या महालात ते राहतात.

आदर पुनावाला या सगळ्या साम्राज्याचा वारसदार आहे.

आदर पुनावाला यांचं सगळं शिक्षण इंग्लंडमध्ये झालं. वयाच्या २१ व्या वर्षी वडिलांची आपल्या उद्योगात मदत करायची म्हणून आले ते आज भारतातल्या सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहेत. आदर पुनावाला यांनी प्रवेश केल्या पासून सिरम इन्स्टिट्यूटने प्रगतीची शिखरेच पार केली आहेत. त्यांच्या ट्रस्ट तर्फे तर्फे पुण्यात अनेक ठिकाणी समाजोपयोगी कामे सुरु असतात.

एखाद्या हिरोप्रमाणे हँडसम असलेले आदर पुनावाला प्रचंड शौकीन देखील आहेत.

poonawalla batmobile featured

आपल्या सहा वर्षाच्या लेकाची हौस म्हणून त्यांनी ही बॅट मोबिल खास बनवून घेतली. मर्सिडीज s ३५० या कारला मॉडिफाय करून बॅट मोबिल बनवली आहे. असं म्हणतात कि ही कार बनवण्यासाठी त्यांनी जवळपास १० कोटी रुपये खर्च केले आहेत.

कोण फेरारी मध्ये फिरतो, कोण रोल्स रॉयस, लॅम्बोर्गिनीची ऐट दाखवतो. पण पुनावाला जगातल्या मोजक्या लोकांपैकी एक आहेत जे बाकीच्या गाड्या गॅरेज मध्ये उभ्या करून स्वतः बॅट मोबिल मध्ये फिरतात. आपल्या मुलाला, खास फ्रेंड सर्कलला घेऊन ते या बॅट मोबिल मधून फिरत असतात. हि गाडी चालवताना त्यांच्या डोक्यावर बॅटमॅनचा मास्क देखील असतो.  

Untitled

बॅटमॅन प्रमाणेच लाइफस्टाइल असणाऱ्या आदर पुनावाला यांच्याबद्दल पुण्यात कायमच एक गूढ वलय कायम असते.

आता ही सगळी आठवण काढायची गोष्ट म्हणजे सध्या जगावर कोरोनाचं मोठं संकट आलंय. जवळपास वर्षभर या कोव्हीड १९ च्या व्हायरसने जगाला लॉक करून टाकलय. हा रोग कधी कोणी पाहिला नाही ना अनुभवलंय. चीनमध्ये तयार झालेल्या कोरोनावर अजूनही औषध नाही. रशियाने मागे काही तरी घोषणा केली पण त्यांच्यावर कोणाचा विश्वास नाही.  

आता सगळ्या जगाचे डोळे लागले आहेत पुण्याकडे कारण आपले पुनावाला सिरम इन्स्टिट्यूट मध्ये कोरोनावरची लस बनवत आहेत.

असं म्हणतात की हि लस जवळपास तयार झाली आहे. २०२१ सालापर्यंत सिरमची लस कोरोनावर मात करण्यासाठी तयार असेल. आदर पुनावाला यांनी भारतासाठी १० कोटी लस वेगळे काढण्याची घोषणा केलीच आहे. पण तरी उद्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भेटीला येत आहेत. काही दिवसातच १०० देशांचे प्रतिनिधी सिरम इन्स्टिट्यूट ला भेट देती.

या सगळ्या धबडग्यात पुणेकरांचं  म्हणणं आहे कि आपला बॅटमॅन नक्की लस बनवणार आणि जगाच्या आधी पुणेकरांना लस पोहचवणार. बॅटमॅन असो किंवा नसो पण बॅटमॅनचा फॅन असलेला आदर पुनावाला कोरोनाला संपवणार अशीच जगाला खात्री बसत चालली आहेत.

शेवटी डार्क नाईट सांगून गेलाय

THE NIGHT IS DARKEST JUST BEFORE THE DAWN. AND I PROMISE YOU, THE DAWN IS COMING.”

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.