स्वच्छता करण्याच्या आळशीपणातुन बुरशी लागली व जगाला वाचवणारं औषध सापडलं

काही योगायोग असे असतात की आपलं आयुष्य बदलवून टाकतात. पण एक योगायोग असा झाला सगळ्या जगाचं नशीब बदलवून गेला.

गोष्ट आहे १०० वर्षांपूर्वीची. पहिले महायुद्ध संपले होते. एक ब्रिटिश जीवाणुशास्त्रज्ञ या युद्धात सैनिक म्हणून लढला होता. महायुद्धाची दाहकता त्याने जवळून अनुभवली होती. लाखो लोक यात मेले होते. या युद्धात त्याला जाणवलं की

बंदुकीच्या गोळ्यांनी जेवढे लोक मेले त्याहूनही अधिक जखमी सैनिकांवर झालेल्या औषधोपचारामुळे मेले.

त्याकाळची काही औषधे अशी होती की जी व्यक्तीची पांढऱ्या पेशी नष्ट करते ज्याचा परिणाम कोणत्याही रोगाची साथ आली तर सर्वप्रथम त्या व्यक्तीचा मृत्यू होत होता.

जंतुसंसर्गामुळे होणारे मृत्यू थांबवणे ही त्याकाळची सर्वात मोठी प्राथमिक गरज होती.

अलेक्झांडर फ्लेमिंग मूळचा स्कॉटलंडचा. त्याचं स्वप्न सर्जन व्हायचं होतं. एमबीबीएस पूर्ण केल्यावर अचानक युद्धावर जावं लागलं आणि त्याचं स्वप्न बारगळल. परत आल्यावर लंडनच्या सेंट मेरी रुग्णालयाच्या लसीकरण विभागात हंगामी तत्त्वावर प्रोफेसर म्हणून तो नोकरीला लागला.

तिथे गेल्यावर पांढऱ्या  पेशींसारख्या नैसर्गिक घटकांवर दुष्परिणाम न करता जीवाणू नष्ट करतील अशा घटकांचा शोध त्यानी सुरू केला. सर्दी झालेल्या व्यक्तीच्या नाकातील स्रावामधून मायाक्रोकॉकस ल्युटस हा जीवाणू प्रयोगशाळेत वाढवला.

त्यानंतर काही काळाने पेट्री प्लेटमधील जीवाणूंच्या वाढीचे निरीक्षण करत असताना फ्लेमिंग यांच्या नाकातील शेंबूड प्लेटवर पडला.

फ्लेमिंगच्या शेम्बडामुळे प्लेटवरील जीवाणूंच्या वसाहती नष्ट झाल्या.

या नंतर त्यांनी सिरम, लाळ, अश्रू यांच्यावर देखील अशा प्रकारचे प्रयोग केले. पेट्री प्लेटवर ज्या ठिकाणी या स्रावांचा थेंब पडत असे तिथे मायाक्रोकॉकस ल्युटसमुळे ती वाढ रोखली जात असल्याचे आढळून आले.

या सर्व प्रकारच्या स्रावांमधे एक समाईक घटक आढळला. तो घटक म्हणजे लायसोझाइम हे एंझाईम.

या लायझोझाईमच्या रुपात शरीराला रोगप्रतिकारक शक्ती देणारा नैसर्गिक घटक सापडला होता परंतु इतर अनेक प्रकारच्या रोगजीवाणूंना लायसोझाइम नष्ट करू शकत नसल्यामुळे औषध म्हणून लायसोझाइमचा उपयोग मर्यादित आहे असे फ्लेमिंग यांच्या लक्षात आले.

एकदा फ्लेमिंग मोठी सुट्टी काढून आपल्या गावी गेले होते. ऑगस्ट महिन्यातली तीन आठवडय़ांची सुट्टी संपवून फ्लेमिंग आपल्या प्रयोगशाळेत परत आले तेव्हा दिसलं की

सुट्टीवर जाण्यापूर्वी स्टॅफिलोकोकस जीवाणूंची पदास झालेल्या अनेक पेट्री डिश जशा होत्या तशाच पडलेल्या होत्या.

खरं म्हणजे, अलेक्झांडर फ्लेमिंग हा मुलखाचा आळशी होता.

त्याने तरी आपल्या असिस्टंटला साफसफाई करायला सांगितलं होतं पण त्याने देखील दुर्लक्ष केलं. लॅबमध्ये सगळी घाण जशीच्या तशी पडली होती.

वैतागून फ्लेमिंग पेट्री डिश साफ करू लागला. यातली एक दिसग नळाखाली धरताना त्याला एक विलक्षण गोष्ट दिसली. पेट्री प्लेटवर बुरशीची वाढ झालेली होती पण या बुरशीच्या भोवती स्टॅफिलोकॉकस ऑरासची वाढ झालेली नव्हती. दूरवरच्या पेशी मात्र वाढल्या होत्या.

यावरून बुरशीतल्या काही घटकांमुळे स्टॅफिलोकॉकस ऑरासच्या पेशी नष्ट झाल्या होत्या असे अनुमान फ्लेमिंग यांनी काढले.

तो घटक म्हणजे पेनिसिलिन!!

एका आळशीपणामुळे जगाचं तारणहार करणारे औषध सापडले होते. तो दिवस होता २८ सप्टेंबर १९२८.

पेनिसिलीन शुद्ध स्वरूपात मिळवण्यासाठी तसेच त्याचे गुणधर्म टिकून रहावेत यासाठी फ्लेमिंग यांच्या प्रयोगशाळेत प्रयोग केले गेले, परंतु त्यात यश आले नाही. पुढे हे सगळं मागे पडले.

मात्र काही वर्षांनी पुन्हा एक योगायोग झाला. ऑक्सफर्ड विद्यापीठातील हॉवर्ड फ्लोरी आणि एर्न्स्ट बोरिस चेन यांच्या एकदा वाचनात फ्लेमिंगने केलेले पेनिसिलनचे प्रयोग आले. त्यांनी त्यावर आणखी संशोधन केले.

त्यांच्याच नेतृत्वाखालील चमूने पेनिसिलीन शुद्ध स्वरूपात मिळवले.

त्यानंतर पेनिसिलिनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू झाले आणि दुसऱ्या महायुद्धात सैनिकांना होणाऱ्या  जंतुसंसर्गावर  पेनिसिलिनचे यशस्वी  उपचार करण्यात आले.

अमेरिकन उद्योगांनी फ्लेमिंगना आमंत्रित करून १ लाख डॉलरची गौरव रक्कम दिली. त्यांनी ती रक्कम त्यांच्या सेंट मेरीज मेडिकल स्कूलला दिली. तीस यूरोपीय आणि अमेरिकन विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट दिली.

टाईम साप्ताहिकानं त्यांची गणना विसाव्या शतकातल्या शंभर थोर वैज्ञानिकांत केली.

त्यांची १९४३ मध्ये रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली व १९४४ मध्ये त्यांना सर हा किताब प्रदान करण्यात आला.

त्याच्या पुढच्याच वर्षी त्याला नोबेल हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.

जर अलेक्झांडर फ्लेमिंगने त्यादिवशी आळशीपणा न करता आपले डिश धुवून ठेवले असते किंवा त्याच्या सुट्टीवर जाण्यानंतर त्याच्या असिस्टंटने साफसफाई केली असती तर लाखो करोडो लोकांना वाचवणार्या अँटी बायोटिकचा कधी शोधच लागला नसता.

एका बुरशीच्या अपघाती शोधामुळे आधुनिक वैद्यकशास्त्राचे आणि एकूणच समस्त मानवजातीचे भविष्य पालटून गेले.

हे ही वाच भिडू.

 

1 Comment
  1. vighnesh says

    kahich kalal nahi

Leave A Reply

Your email address will not be published.