मिरजेच्या त्या दंगलीनंतर अफजलखान वधाचं चित्र दोन समाजात दरी वाढवणारं ठरत गेलं…

चौथीच्या इतिहासाचं पुस्तक म्हटलं कि डोळ्यासमोर समोर येतात ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवरायांच्या गौरवशाली लढाया. त्यातही अफजलखान वधाचं चित्र अंगावर शहारा आणणारं ठरतं,  

मात्र आत्ता सुरक्षेच्या कारणामुळे अफजलखान वधाच्या देखाव्याला परवानगी नाकारण्यात आलेली आहे. साहजिक प्रश्न निर्माण होतो की काही वर्षांपूर्वी सहजमान्य असणारे अफजलखान वधाचे चित्र आत्ता मात्र दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारे कसे ठरतेय..

त्यापूर्वी नेमकी घटना काय आहे ते पाहू..

पुणे शहरातील कोथरुडमधील संगम तरुण मंडळाने गणेशोत्सवादरम्यान अफजलखान वधाचा जिवंत देखावा सादर करण्यासाठी पुणे पोलीसांकडे परवानगी मागितली होती. मात्र पुणे पोलीसांनी ही परवानगी नाकारली. ही परवानगी नाकारताना पोलीसांनी कायदा व सुव्यवस्थेच कारण दिलं.

मात्र अफजलखान वधाच्या देखाव्याला परवानगी नाकरल्यामुळे आरोप प्रत्यारोप होवू लागले. या मंडळाचे अध्यक्ष हे मनसेचे नेते किशोर शिंदे आहेत. त्यामुळे या घटनेला राजकीय रंग आला. त्यांनी तात्काळ आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पत्रव्यवहार करणार असल्याचं माध्यमांसोबत बोलताना सांगितलं.

मात्र मुळात मुद्दा हा आहे की, अफजल खान वधाच्या देखाव्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कसा निर्माण होतो.. 

तर याची पाळेमुळे आहेत सांगली-मिरजेच्या दंगली.. 

पुणे, मुंबई या शहरांप्रमाणेच मिरज या शहरात देखील गणेशोत्सव प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवा दरम्यान या शहरात प्रत्येक मंडळ आपल्या देखाव्या अगोदर कमानी उभा करतं. या कमानींवर वेगवेगळे देखावे निर्माण केले जातात.

सप्टेंबर 2009 सालात मिरजेतील एका मंडळामार्फत अशीच एक कमान उभारण्यात आली होती. या कमानीवर अफजल खान वधाचे चित्र होते. पोलीसांनी देखील या कमानीला परवानगी दिली होती अस सांगण्यात येतं.

मात्र अफजलखान वधाची ही कमान मुस्लीम धर्मींयांच्या भावना दुखावणारी आहे असा प्रचार झाला. मुस्लीम समाजातील काही तरुणांचा जमाव कमानीसमोर उभा ठाकला आणि दंगलीस सुरवात झाली..

पुढील आठवडाभर मिरजेची ही दंगल सांगली, इचलकरंजी आणि कोल्हापूरपर्यन्त पसरली. तत्कालीन सांगली जिल्हा पोलीस प्रमुख कृष्णप्रकाश यांना दंगल आटोक्यात आणण्याचं श्रेय दिलं जातं. मात्र या दंगलीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं.

दोन धर्मांमधील तेढ निर्माण करणारी दंगल म्हणून आजही या दंगलीची आठवण काढली जाते. त्यावेळी मिरज शहरात झालेल्या दंगलप्रकरणात ३८ गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या दोन्ही गटांच्या तब्बल ६०० जणांना अटक करण्यात आली होती. 

परंतु त्यातील ५१ जणांवरील खटला २०१७ मध्ये मागे घेण्यात आला होता.

दंगल प्रकरणात चालत असलेल्या खटल्यांपैकी एक खटला २०१७ मध्ये शासनाने मागे घेतला होता. मागे घेतलेल्या खटल्यामध्ये तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेश खाडे, भाजपचे प्रदेश सचिव मकरंद देशपांडे तसेच शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष बजरंग पाटील यांचा समावेश होता.

त्यांनतर २०२१ मध्ये मिरज दंगल प्रकरणातील १०६ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. 

२०२१ मध्ये न्यायालायने प्रबळ पुरावे नसल्याचे कारण देऊन दंगल प्रकरणातील १०६ जणांची निर्दोष मुक्तता केली होती. त्यात शहराचे तत्कालीन महापौर मैनुद्दीन बागवान, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख बजरंग पाटील आणि शिवसेनेचे शहर प्रमुख विकास सूर्यवंशी यांचा समावेश होता.

अफजल खान वधाच्या चित्रामुळे दंगल घडण्याचं हे पहिलं उदाहरणं होतं, पण या फोटोमुळे 2016 साली देखील वाद निर्माण झाला होता.. 

यावेळी निमित्त ठरलं बालभारतीचं पुस्तक..

२०१६ मध्ये बालभारतीच्या पुस्तकात अफजलखानाच्या वधाचा जुना फोटो वगळून नवीन फोटो टाकण्यात आला होता. ज्या ४ थी च्या पुस्तकातून आपल्याला शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवण्यात येतो. ते पुस्तक गेल्या ४० वर्षात कधीही बदलण्यात आलेलं नाही परंतु पुस्तकाच्या मूळ स्वरूपात बदल न करता, कालानुरूप लहान मोठे बदल करण्यात आलेले आहेत.

२०१६ मध्ये असाच एक बदल या पाठ्यपुस्तकात करण्यात आला होता.

पुस्तकाच्या जुन्या आवृत्तीत शिवाजी महाराज अफजलखानाचा वध करत आहेत असं चित्र होतं. त्यात शिवाजी महाराज वाघनख्यांच्या आधारे अफजलखानाला मारत आहेत आणि अफजलखान मोठे डोळे काढून ओरडत आहे असं त्या चित्रात दाखवलं होतं. 

परंतु नवीन चित्रात शिवाजी महाराज आणि अफजलखान एकमेकांची गळाभेट घेण्यासाठी समोरासमोर आले आहेत असं दाखवलंय.

पुस्तकातील चित्रात बदल केल्यामुळे हिंदू जनजागरण समितीने त्याला विरोध केला होता. नवीन चित्र काढून टाकून परत जुने चित्र समाविष्ठ करावे अशी मागणी समितीने केली होती.

हिंदू जनजागरण समितीच्या मागणीवरून चित्र बदलण्यात आले होते कि नाही, हे तपासण्यासाठी बोल भिडूने सध्या शिकवण्यात येणाऱ्या ‘४ थी परिसर अभ्यास २’ या पुस्तकाची पाहणी केली. 

पुस्तकात २०१६ मध्ये बदलण्यात आलेले शिवाजी महाराज आणि अफजल खानाच्या भेटीचे चित्र कायम आहे. तसेच ‘प्रतापगडावरील पराक्रम’ या धड्यात ‘अफजलखानाचा वध’ हा शब्दप्रचार काढून त्याजागी ‘अफजलखानाशी झटापट’ असा मथळा वापरला आहे. 

पुस्तकातील चित्र बदलण्याचा मुद्दा शांत झाला तोचस

२०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने चक्क शिवाजी महाराजांचा इतिहासच गाळून टाकण्याची गोष्ट समोर आली.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना स्थानिक शिक्षणाबरोबर आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी २०१७ आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन करण्यात आले होते. मंडळाने तयार केलेला आंतरराष्ट्रीय  अभ्यासक्रम शिकवण्यासाठी काही शाळांची निवड सुद्धा करण्यात आली होती.

परंतु जेव्हा आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने तयार केलेला अभ्यासक्रम प्रकाशित झाला तेव्हा वादाचे मोहोळ उठले. कारण नवीन पुस्तकात शिवाजी महाराजांच्या लढाया आणि अनेक प्रसंग गाळून टाकण्यात आले होते.

गाळून टाकण्यात आलेल्या प्रसंगांमध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखान आणि शिवाजी महाराजांच्या भेटीचा प्रसंग सुद्धा समाविष्ट होता. 

त्यांनतर अनेक जणांनी आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या पुस्तकावर आक्षेप घेतला. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यावर टीका केली. त्यामुळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाला बर्खास्तच करून टाकण्यात आलं होतं.

अर्थात अफजलखान वधाचे चित्र हे मिरजेच्या दंगलीस कारणीभूत ठरल्यानंतर ते कायमचं वादग्रस्त ठरताना दिसून येतं. म्हणूनच मध्यममार्ग म्हणून पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हे चित्रचं नको अशी भूमिका घेताना दिसतात..

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.