ताजमहल बांधणाऱ्या कामगारांसाठी आग्र्याच्या ‘पेठ्याचा’ शोध लागला.

भावा ताजमहल म्हणजे सगळ्या जगासाठी प्रेमाच प्रतिक ! आपल्या बायकोच्या प्रेमात पडून शहेनशहा शाहजहानने ताजमहल बांधून घेतला आणि आजही तो जगात सात आश्चर्यापैकी एक मानला जातो.

पण या भारतात लई जण असे पण आहेत जे ताजमहलवर टीका देखील करतात. त्यांचं म्हणण अस की शहाजहानने ताजमहल बांधायला गड्यांना वीस वर्ष राबवल. राबवल ते राबवल पण ताजमहल बांधून झाल्यावर तो बांधणाऱ्या कारागिरांचे हात तोडले होते.खर खोट काय माहित पण अशी देखील कथा सांगितली जाते.

हिंदुत्ववादी म्हणतात की ताजमहाल नाही तर तेजोमहालय आहे. तर कॉम्रेड लोक म्हणतात की हा तर बुर्झ्वा प्रेमाच प्रतिक.

शायर साहीर लुधियानवी यांनी तर एके ठिकाणी लिहिलेलं आहे की,

इक शहंशाह ने दौलत का सहारा ले कर,

हम ग़रीबों की मोहब्बत का उड़ाया है मज़ाक,

मेरी महबूब कहीं और मिला कर मुझ से….

आता ताजमहल बांधणाऱ्या कारागिरांच पुढे काय झाल हे आम्हाला पण माहित नाही. पण तो बांधत असताना त्यांची चांगली खातरदारी केली जात होती यांचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रात आढळतात.

ताजमहल बांधण्यासाठी आग्र्यात एक दोन नाही तर जवळपास २२ हजार मजूर, कारागीर काम करत होते.

यामध्ये बुखारा सिरिया पासून ते दक्षिण भारतापर्यंत अनेक कारागीर आले होते. काही जण फक्त दगडी कोरीव काम करत होते तर काहीना फक्त संगमरवरावर पुष्प कोरण्याच काम होत. त्यांच्यावर लक्ष ठेवायला तितकेच सैनिक पहाऱ्यावर नेमलेले होते. राजस्थानमधून हजारो बैलगाड्यांवर लादून संगमरवर आणला जात होता. शेकडो हत्ती कामावर होते.

नुसता पाण्यासारखा पैसा वहात होता. ताजमहल म्हणजे खुद्द मुघल सल्तनतीच्या बादशहाने बघितलेलं स्वप्न होतं. ते पूर्ण करण्यासाठी कोणतीही किंमत चुकवायला तो तयार होता.

एक दिवस बादशाह बांधकाम सुरु असताना राउंड मारायला आला.

(अख्ख्या देशाच सम्राट असला तरी बांधकाम बघायला जायची हौस त्याला पण चुकली नव्हती ). या राउंडवेळी त्याला जाणवल की सगळे कारागीर, मजूर एकदम मरगळलेले आहेत. काम करण्यासाठी जो उत्साह हवा तो त्यांच्यात दिसत नव्हता.

बादशाहच डोकं सटकल. त्याने लगेच कॉन्ट्रक्टरला बोलावण धाडल. कॉन्ट्रक्टर धावत पळत आला. बादशहाला कुर्निसात करून ततपप करू लागला. त्याला नेमक मॅटर काय आहे हेच कळेना. शहेनशहा शहाजहान त्याला म्हणाला,

“या कारागिरांना काय खायला घालता? “

कॉन्ट्रक्टरनी सांगितल, नेहमीच जेवण. दाल सब्जी रोटी.

बादशाह रागाने लालबुंद झाला.

“ये लोग दुनिया का अजूबा बना रहे है.ऐसी चीज जो पहेले कभी बनी नही, इनको खाना भी शाही मिलना चाहिये.”

अखेर ही गोष्ट ताजमहलचा मेन आर्किटेक्ट ईसा मुहम्मद एफेंडी याच्यापर्यंत पोहचली. बादशहाच्या इच्छेनुसार कारागिरांना एनर्जी मिळावी असं काही तरी शोधून काढायला लागणार होतं.

त्याने पीर नक्शबंदी नावाच्या संताचे पाय धरले. 

रात्रभर पीरसाहेबांनी विचार केला. दुसऱ्या दिवशी इसाला सांगितल की रात्री देवाने मला स्वप्नात एक रेसिपी सांगितली आहे. इसा खुश झाला. लगेच ही रेसिपी त्याने बादशहाच्या खानसाम्यापर्यंत पोहचवली.

दुधी भोपळा किंवा कोहळा यापासून बनवली जाणारी ही एक मिठाई होती. बादशाहने ऑर्डर दिलेली की कोणतीही कंजुषी करायची नाही. त्यामुळे आग्र्याच्या शाही किचनमध्ये पाचशे कुक रोज ही मिठाई बनवू लागले. रोज हजारो कामगारांना खायला ही मिठाई दिली जाऊ लागली.

याला नाव दिलं पेठा. आग्रे का मशहूर पेठा.

गोष्टीला साडे तीनशे वर्ष होऊन गेले.

पण ही मिठाई ताजमहालच्या खालोखाल आग्र्याची ओळख आहे. आग्रा येथे जाणारा प्रत्येक टुरिस्ट आपल्या घरच्यांसाठी ताजमहलचे फोटो आणि पेठा घेऊन जातो. आग्र्याला थांबणाऱ्या प्रत्येक रेल्वेच्या प्रत्येक डब्ब्यात हजारो किलो पेठा खपतो. उत्तर भारतात म्हणतात की,

आगरा का पेठा सिर्फ मिठाई नहीं है. चाशनी में लिपटा पेठा जुबां पर रखते ही प्यार और अपनेपन का अलग अहसास होता है

जवळपास सत्तर वर्षापूर्वी म्हणजे स्वातंत्र्य मिळालं त्याकाळी आग्रा येथे एक सेठ पंचमलाल गोयल नावाचा हलवाई होऊन गेला. त्याने बनवलेला पेठा विशेष फेमस झाला. याला पंछी पेठा म्हणून ओळखल जात. आज शंभरच्या वर दुकाने या नावाने आग्र्याच्या नुरी गेटवर पेठा विकतात.

फक्त संगमरवरा सारखा शुभ्रच नाही तर अंगुरी पेठा, केसर पेठा, मँगो पेठा,संत्रा पेठा असे अनेक प्रकार आता मिळतात. एकेकाळी कामगारांचं एनर्जी टॉनिक असलेला पेठा गोडाचं खाणाऱ्यासाठी भारतातली सर्वात लाडकी मिठाई बनला आहे हे नक्की.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.