ताजमहालचा वापर मराठ्यांनी घोड्यांची पागा म्हणून केला होता…

काहीजण ताजमहलला जगातील सातवे आश्चर्य म्हणतात तर काही जण शहाजहानला पडलेली कविकल्पना. असंख्य शायर कवींनी चंद्रप्रकाशात चमकणाऱ्या शुभ्र संगमरवरी इमारतीचे रोमँटिक वर्णन केलेलं आहे. संबंध देशावर राज्य करणारे मुघल ताजमहालला आपल्या ऐश्वर्याचं प्रतीक मानत होते.

अकबरापासून औरंगजेबापर्यंत सगळे मुघल बादशाह आग्र्यातच बसून देशाचा कारभार हाकत होते.

पण औरंगजेबाच्या नंतर हे शक्तिशाली मुघल साम्राज्य मोडकळीस आलं. औरंगजेबाची कट्टर आक्रमक धोरणं, इतर धर्मीयांवर केलेले अत्याचार, काशी विश्वेश्वराचे मंदिर तोडण्यापर्यंत केलेलं धर्मांध कृत्य यामुळे देशातली जनता कंटाळली होती. याचा परिणाम त्याच्या पुढच्या पिढयांना भोगावा लागला.

अठरावं शतक संपता संपता अशी वेळ आली कि मुघल बादशाहला रोहिला गुलाम कादिर दिल्लीच्या दरबारात चाबकाने फटके देत होता, त्याचा उपमर्द करत होता आणि कोणी काही करू शकत नव्हते.

गुलाम कादिर हा मराठयांचा देखील शत्रू होता. त्याच्या घराण्याशी मराठ्यांचे पानिपतच्या काळापासून वैर चालत आले होते. याचा बदला घेण्यासाठी खुद्द महादजी शिंदे दिल्लीवर चालून आले. त्यांनी गुलाम कादिरचा कायमचा बंदोबस्त केला.

बादशहाकडून पेशव्यांस ‘वकील-इ-मुतालिक’ (मुख्य कारभारी) ही पदवी मिळविली. स्वतःस नायबगिरी मिळवून बादशहास ६५,००० नेमणूक करून सर्व अधिकार आपल्या हाती घेतले. शिवाय बादशहाकडून गोवधबंदीचे फर्मान काढविले.

लाल किल्ल्यात बसून पाटील बावा संपूर्ण हिंदुस्थानचा कारभार पाहू लागले.

सतलजापासून तुंगभद्रेपर्यंत मराठी साम्राज्याच्या सीमा भिडविल्या आणि उत्तर हिंदुस्थानात मराठी सत्तेचा दरारा निर्माण केला. हे सगळं शक्य झालं होत महादजींचा पराक्रम आणि त्यांची दूरदृष्टी यामुळे.

महादजी शिंदेंचा मूळ पिंड लढवय्या वीराचा असला, तरी ते राजकारणातही वाकबगार होते. युद्धप्रसंगी केव्हा लढावे व केव्हा माघार घ्यावी, याचे उत्तम ज्ञान त्यांना होते. महादजींनी भारतात पहिल्यांदा आपली कवायती सेना उभारली होती. यासाठी फ्रेंच सेनानी डीबॉईन या सेनापतीची नेमणूक केली होती.

यापूर्वी डीबॉईन हा गोहादच्या राणाच्या पदरी होता. मूळचा फ्रान्स मध्ये जन्मलेला हा सेनानी रशिया अफगाणिस्तानमध्ये तलवार गाजवून भारतात आला होता. इथे असलेली सुबत्ता, पराक्रमाचा उचित सन्मान आणि प्रचंड संपत्ती पाहून तो भारतातच थांबला. या काळात इंग्रज, पोर्तुगीज, डच या सत्ता भारतात आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत होत्या.

डीबॉईन शिंदेशाही फौजेत दाखल झाला. त्याने कवायती सेना उभारली. उत्तरेत आपला डंका वाजवण्यासाठी महादजी शिंदेनी डिग आणि आग्रा हे दोन महत्वाचे किल्ले घेण्याचं ठरवलं होतं.

आग्र्याचा किल्ला घेण्यासाठी त्यांनी रायाजी पाटील याना मोहिमेवर पाठवलं.

एकेकाळची मुघलांची राजधानी असलेल्या आग्र्याच्या किल्ल्याला रायाजी पाटलांनी वेढा घातला. या किल्ल्याचा किल्लेदार सुजाउद्दीनखान हा मोठा चिवट होता. त्याने किल्ल्यात रसद गोळा केली होती. अनेक महिने तो रायाजी पाटलांना दाद देईना. अखेर दिल्लीहून महादजी शिंदे स्वतः आग्र्याला आले. त्यांनी  देखील मोर्चे लावले. त्याला यश येत नाही हे पाहिल्यावर पाटील बावांनी किल्ल्याच्या कोतवालास वश करून घेतलं.

जानेवारी १७८५ पासून आग्रा शहरावर मराठ्यांचा अमंल सुरु झाला.

मध्यंतरीच्या काळात एका गैरसमजामुळे डीबॉईनने शिंदेची सेना सोडली होती. पण काही वर्षांनी महादजींनी त्याला परत बोलावून घेतलं. नव्या कवायती तुकड्या उभारायला सांगितल्या. त्याला आपला मुख्य सेनापती बनवलं आणि आग्रा शहराची सुभेदारी दिली.

१७८८ साली इस्माईल बेग याने गुलाम कादरसोबत आग्र्यावर हल्ला केला तेव्हा त्याचा सामना करण्यासाठी डीबॉईनच्या कवायती तुकड्या सामोऱ्या आल्या. यमुनेच्या किनाऱ्यावर तळ देऊन इस्माईल बेग तोफेच्या साहायाने आग्र्यावर मारा करू लागला.

त्याच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी घोडयाना आसरा शोधणे आवश्यक होते. तेव्हा मराठा सैनिकांनी आपले घोडदळ आग्र्याच्या ताजमहाल मध्ये लपवले. ताजमहालाच्या परिसरात अनेक छोट्या छोट्या बराकी आहेत त्यात हे घोडे बांधण्यात आले होते.

१८ जून १७८८ रोजी मराठे व इस्माईल बेग यांच्यात निकराची लढाई झाली. गुलाम कादिर पळाल्यामुळे ताकद कमी झालेल्या बेगच्या सैन्याला डीबॉईनने कापून काढले. बेग वर मिळालेल्या मोठ्या विजयामुळे मथुरा वृन्दावन आग्रा हा प्रदेश कायमचा मराठा साम्राज्याच्या अधिपत्याखाली आला.

डीबॉईन जेव्हा आग्र्यात परतला तेव्हा त्याला ताजमहालाची अवस्था दिसली. तो फ्रान्सचा असल्यामुळे तो कलासक्त होता. सौंदर्याचे भोक्तेपण त्याच्या रक्तातच होते. त्याकाळी ताजमहालाची अवस्था अत्यंत दयनीय बनली होती. काही ठिकाणचा भाग कोसळण्याच्या मार्गावर होता. फक्त सैनिकांची ये जा सुरु असायची.

डीबॉईनने या बद्दल खंत व्यक्त केली. आपल्या परीने ताजमहालची देखभाल करण्याचा त्याने प्रयत्न सुरु केला.

तो पर्यंत महादजी शिंदे हे दिल्लीहून दक्षिणेकडे पुण्याला रवाना झाले होते. डीबॉईनने त्यांच्याकडे ताजमहालच्या दुरुस्तीसाठी काही रकमेची मागणी केली. महादजींनी त्याला होकारदेखील दिला. मात्र जी वास्तू रयतेच्या उपयोगाची नाही तिच्या देखभालीसाठी पैसे खर्च करायचे नाहीत या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवणीचे पालन करणारे महादजी शिंदे यांनी डीबॉईनला पैसे काही दिले नाहीत.

तेव्हाचा ब्रिटिश इंस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी मेजर मॅकग्रागर डीबॉईनच्या भेटीला कलकत्त्याहुन आग्र्याला आला होता. त्याला देखील ताजची अवस्था पाहून धक्का बसला. त्याने परतल्यावर डीबॉईनला याविषयी सविस्तर पत्र लिहिले. खरं तर दोघे एकमेकांचे शत्रू मात्र ताजमहाल हा ऐतिहासिक वारसा जपला गेला पाहिजे यावर दोघांचं एकमत होतं.

२६ फेब्रुवारी १७९४ रोजी डीबॉईनने त्याला पाठवलेल्या पत्रात त्याने ताजसाठी घेतलेल्या खबरदारीचे वर्णन केलेले आहे. महादजींकडून निधी मिळणार आहे याचा देखील तो या पत्रात उल्लेख करतो. या दोघांच्या चर्चेत दिल्लीच्या बादशाहकडून मदत घेता येईल का याचा देखील उहापोह होतो. बादशाहला ताजसाठी मदत करून ब्रिटिशांचे त्याच्या दरबारात वजन वाढवणे असा मेजर मरे मॅकग्रेगरचा हेतू होता असं म्हणतात.

कारण काहीही असो ताजमहाल जतन व्हावा म्हणून पहिले प्रयत्न करणाऱ्यांमध्ये या दोन अधिकाऱ्यांचा नेहमी उल्लेख येतो. 

जवळपास वीस वर्षे आग्रा मराठ्यांच्या ताब्यात होता. पुढे दौलतराव शिंदेंच्या काळात शिंदेच्या सेनेचा इंग्रजांनी पराभव केला आणि त्यात झालेल्या तहात आग्रा हे शहर इंग्रजांना मिळाले. मराठेशाहीच्या घोड्यांच्या टापा उत्तरेत निनादायचे बंद झाले.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.