शिंदेशाहीसाठी जीव देणाऱ्या गोऱ्या सरदाराच्या स्मरणार्थ “लाल ताजमहल” उभारला होता

आग्र्याचा पांढऱ्याशुभ्र संगमरवरात उभारलेला ताजमहल म्हणजे एक कवी कल्पना. जगातील सर्वात सुरेख वास्तू म्हणून ताजमहाल ओळखला जातो. पण ज्या आग्रा शहरात ही वास्तू आहे तिथेच मराठा इतिहासाची जुळलेली अजून एक वास्तू आहे. रंगरूपाने वेगळी असली तर ताजमहालाच्या अंगभूत सौंदर्याचं कोंदण याही वास्तूला लाभलेलं आहे.

हि वास्तू म्हणजे ‘लाल ताजमहाल’!

आग्रा शहरात रोमन कॅथलिक ख्रिश्चनांची मोठी दफनभूमी आहे. भारतात आलेले मोठमोठे परदेशी अधिकारी, सैनिक आणि त्या काळातील धुरंधर व्यक्तींना इथे मूठमाती देण्यात आली. त्यांची अनेक स्मारके इथे सापडतात.

इथेच इतर साध्या कबरींच्या मध्ये एक वेगळीच आकृती आपले लक्ष वेधून घेते. हुबेहूब ताजमहालासारख्या उठावदार वळणांनी आणि कमानींनी परिपूर्ण झालेली एक कबर दिसते. पण भाजलेल्या लाल दगडांनी बनवल्याने या स्मारकाचा रंग लाल किल्ल्यासारखा लालसर आहे. म्हणूनच याला स्थानिक लोक ‘लाल ताजमहाल’ म्हणून ओळखतात.

मूळ ताजमहालाची ही प्रतिकृती कधीकाळी मराठा सैन्यासाठी काम केलेल्या डच अधिकाऱ्याच्या स्मरणार्थ उभारली गेली आहे. हेसिंग स्मारक किंवा हेसिंगचा टॉम्ब म्हणूनही याला ओळखलं जातं.

हा माणूस जॉन हॅसिंग हे एक वेगळंच व्यक्तिमत्त्व होतं. हा माणूस  मूळचा नेदरलँडचा. त्याचा जन्म तेथील अल्ट्रेच शहरात १७३९ साली झाला.

जग फिरायचं म्हणून त्यानं लवकरच देश सोडला. वयाच्या तेराव्या वर्षीच त्याने श्रीलंका गाठली होती. मजल दरमजल करत तो तेव्हा भारतात येऊन पोचला. १७६३ सालचा हा काळ. भारतात डच ईस्ट इंडिया कंपनी आपले हातपाय पसरू पाहत होती. पण त्यात त्यांना यश येत नव्हते.

शेवटी वैतागून त्याने सैन्यात करियर करायचे ठरवले. तो निजामाच्या पदरी सेनाधिकारी म्हणून रुजू झाला. पण तिकडे त्याचे मन रमले नाही.

तेव्हा भारतात पेशव्यांची सत्ता प्रबळ होत होती. अटकेपार झेंडे लावण्याची मराठ्यांची खुमखुमी त्याने स्वतः बघितली.

भारताच्या एका प्रदेशातून येऊन दिल्लीचा कारभार हाकणारे मराठे बघून हॅसिंगला स्फुरण चढले. त्यानेही मराठ्यांच्या फौजेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

त्यावेळी आग्र्यावर मराठी सेनेने ताबा मिळवला होता. लाल किल्ल्यावर जरीपटका फडकण्याचा काळ. महादजी शिंदे हे मराठा फौजेचं नेतृत्व करत होते. मराठा सैन्यला जगातल्या उत्तम सैन्याइतकं कुशल करण्यासाठी त्यांनी अनेक विदेशी माणसांची नेमणूक केली होती. जग पाहिलेल्या हॅसिंगला सैन्याचा चांगला अनुभव होता. त्यानेही मराठा सैन्यात समर्पण देऊन स्वामीभक्तीने चाकरी करायला सुरुवात केली.

महादजी शिंदे यामुळे त्याच्यावर खुश झाले. त्याचे अंगभूत गुण ओळखून महादजी शिंदे यांनी त्याला मोठी जबाबादारी देण्याचे ठरवले.

१७९९ साली एक पत्रक काढून आग्र्याच्या किल्ल्याचा कमांडर म्हणून त्याची नेमणूक महादजींनी केली.

जॉन हॅसिंगने हा विश्वास सार्थ ठरवला. मराठ्यांचा किल्लेदार असण्याच्या काळात त्याने अनेक लढायांमध्ये सहभाग घेतला. सातासमुद्रापार एका देशातून आलेल्या या माणसाने मराठी दौलतीची इमानेइतबारे सेवा केली.

मराठा इतिहासातील रोमहर्षक पर्व म्हणजे खर्ड्याच्या लढाईत त्यांनी निजाम सत्तेवर मिळवलेला विजय. १२ मार्च १७९५ रोजी झालेल्या या लढाईत जॉन हॅसिंग याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

तो स्वतः ३००० फौजेनिशी यात उतरला होता. या सर्व तुकडीचे पूर्ण नेतृत्व त्याने स्वतः केले. यात त्याने मोठा पराक्रम गाजवला.

जून १८०१ मध्ये पेशवा आणि इंदोरच्या मराठी दौलतीचे धनी मल्हारराव होळकर यांच्यांत वाद निर्माण झाला होता. तेव्हा उज्जैन येथेत्यांचा आणि पेशव्यांच्या फौजांचा आमनासामना झाला होता. या लढाईत जॉन हॅसिंग याने ४ बटालियन घेऊन त्यांचे नेतृत्व केले होते. तेव्हा उत्तरेत होळकरांचा दबदबा होता. तरीही त्याने शर्थीचे प्रयत्न केले. अर्थात शक्तिशाली इंदोर सैन्यापुढे त्यांचा टिकाव लागला नाही.

महादजी यांच्यानंतर त्याने तेवढ्याच निष्ठेने दौलतराव शिंदे यांचीही सेवा केली.

यानंतरही हॅसिंग याने अनेक लढायांत मराठ्यांना साथ दिली. १८०२ साली मराठे आणि इंग्रज यांच्यात ठिणगी पडली. तिचे पर्यावसान दुसऱ्या मराठा-इंग्रज युद्धात झाले. या युद्धातही हॅसिंगने मराठा तुकडीचे नेतृत्व केले. 

मधल्या काळात त्याचा विवाह ऍन या परदेशी युवतीशी झाला. त्यांना जॉर्ज नावाचा एक मुलगाही होता.

नंतरच्या काळात तो आजारी पडला होता. त्यामुळे त्याच्या या ४ फौजांचे नेतृत्व त्याचा मुलगा जॉर्ज हॅसिंग यांच्याकडे सोपवण्यात आले. दुसऱ्या मराठा-इंग्रज युद्धात त्यानेही वडिलांच्या बरोबरीने पराक्रम गाजवला.

तरीही त्याने आग्र्याचा किल्लेदार म्हणून काम सुरूच ठेवले. पण इंग्रजांनी अचानक १८०३ साली या किल्ल्यावर आक्रमण केले. जूनच्या महिन्यात त्यांनी किल्ल्याला वेढा घातला. यावेळी हॅसिंग याने शर्थीने ब्रिटिशांचा सामना केला. २१ जुलैला त्याचा या लढाईत दुर्दैवी अंत झाला.

मराठ्यांसाठी किल्ल्याचे राखण करताना हा हिरा दौलतराव शिंदे यांनी गमावला होता. म्हणूनच त्याच्या बायकोने ऍन हिने त्याच्या स्मरणार्थ एक स्मारक उभारण्याची इच्छा व्यक्त केली.

या स्मारकावर महादजी आणि दौलतराव या दोघांचा आदरपूर्वक उल्लेख करण्यात आला आहे.

१८०३ साली लाल दगडांमध्ये मुघल शैलीत त्याच्या कबरीवर हे स्मारक उभारण्यात आले. याची वैशिष्टये थेट मूळ ताजमहालासारखी होती. दुहेरी घुमट आणि नक्षीदार कमानी त्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

त्यावर इंग्रजी भाषेत मजकूर कोरलेला आहे. पण ताजमहालाप्रमाणे त्याला मिनार किंवा इतर आभूषणे नाहीत. हे स्मारक स्थानिक लोकांच्या स्मृतीत नसले तरी मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासात त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

हे हि वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.