लक्षात येतंय का? आता मुंबईला पुण्यापेक्षा अहमदाबाद जवळ होणारे!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईला येऊन वंदे भारत एक्सप्रेसच्या दोन मार्गांचं उद्घाटन करणार आहेत. मुंबई- शिर्डी आणि मुंबई-सोलोपूर असे हे दोन मार्ग असणार आहेत. वंदे भारत एक्सप्रेसच्या या दोन मार्गांचं उद्दिष्ट्य म्हणजे, आधीपासूनच सुरू असलेल्या रेल्वे ट्रॅक्सवरून जलद आणि आरामदायी प्रवास करू शकतील.

मोदी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दोन वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखवतील. त्यानंतर त्या दोन्ही गाड्या रवाना होतील. सध्या उपलब्ध असलेल्या रेल्वे लाईनवरच वेगवान आणि आरामदायक प्रवास यासाठी या ट्रेन बनवण्यात आल्यात. पूर्ण भारतीय बनावटीची ही पहिली सेमीस्पीड ट्रेन आहे. एसी, वायफाय, अद्ययावत सस्पेंशन, पूश बॅक सीट्स अशी या रेल्वेची खासियत असणार आहे.

आता सुरू असलेल्या नॉर्मल ट्रेनने मुंबई ते पुणे हा प्रवास करण्यासाठी कमीत कमी साडे तीन तास लागतात.

आज पासून सुरू होणाऱ्या मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसने पुण्याला पोहोचण्यासाठी आपल्याला ३ तास लागणारेत.

याचा अर्थ आता अस्तित्वात असलेल्या किंवा भविष्यासाठी आता डोक्यात असलेल्या टेक्नोलॉजीनुसार तरी मुंबई ते पुणे हे अंतर पार करण्यासाठी ३ तास लागतात.

आता येऊया मुंबई ते अहमदाबाद या विषयावर. तर सध्या सुरू असलेल्या नॉर्मल ट्रेनने मुंबईतून निघून अमदाबादला पोहोचायला साधारण ८:३० तास लागतात. पण हा झाला आताच्या घडीचा मुद्दा. हे चित्र बुलेट ट्रेन उभी राहिली की पालटणार आहे.

मुंबई ते अहमदाबाद हे अंतर बुलेट ट्रेनने पार करायला २ वेगवेगळ्या वेळा लागणारेत. त्यामागचं कारण म्हणजे, स्लो ट्रेन्स आणि फास्ट ट्रेन्स. अगदी आपल्या मुंबई लोकलमध्ये जसं स्लो आणि फास्ट अशा दोन वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेन्स असतात तसंच या बुलेट ट्रेनचं सुद्धा असणार आहे.

बीकेसी वरून निघालेल्या बुलेट ट्रेनला साबरमतीला पोहोचण्यासाठी मध्ये १२ स्टेशन्स लागतात.

या १२ पैकी बीकेसी हे पहिलं स्टेशन, त्यानंतर ठाणे, विरार आणि बोईसर ही चार स्टेशन्स महाराष्ट्रात आहेत. तर, उरलेली आठ स्टेशन्स म्हणजे, वापी, बिलीमोरा, सुरत, भरुच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती ही स्टेशन्स गुजरातमध्ये आहेत.

स्लो ट्रेन म्हणाल तर, या सगळ्या स्टेशन्सवर थांबत थांबत ही ट्रेन अहमदाबाद आणि पुढे साबरमतीला पोहोचणार. या स्लो ट्रेनला बीकेसी पासून ते साबरमतीला पोहोचायला २ तास ५७ मिनीटं लागणारेत. आता अहमदाबाद हे साबरमतीच्या अलीकडचं स्टेशन. त्यामुळे अहमदाबादला पोहोचायला स्लो बुलेट ट्रेनने तासांपेक्षा कमी वेळ लागणार आहे.

फास्ट बुलेट ट्रेन जी सर्व १२ स्टेशन्सवर थांबणार नाही त्या बुलेट ट्रेनला साबरमतीला पोहोचायला फक्त २ तास ७ मिनीटं वेळ लागणार आहे. तिथं उतरून एक स्टेशन माघारी यायचं म्हणलं तरी गणित ३ तासांच्या आत उरकतंय.

एकंदरीत काय तर, फास्ट बुलेट ट्रेन असो किंवा स्लो, महाराष्ट्राला दिलेल्या वंदे भारत या सेमी हाय स्पीड ट्रेन पेक्षा ही ट्रेन प्रचंड जलद आहे. शिवाय, महाराष्ट्रात ४ स्टेशन्स आणि गुजरातेत ८ स्टेशन्स असलेल्या या बुलेट ट्रेनमुळे कनेक्टिव्हिटीचा जास्त फायदा हा गुजरातलाच होईल.

आता एकदा मुंबई ते पुणे आणि मुंबई ते अहमदाबाद यातलं अंतर किती आहे ते बघु.

मुंबई ते पुणे हे अंतर आहे, १४८ किलोमीटरचं. मुंबई ते अहमदाबाद हे अंतर आहे ५२६ किलोमीटरचं. म्हणजे मुंबई- पुणे पेक्षा मुंबई अहमदाबाद हे अंतर जवळपास ३.५ – ४ पट जास्त आहे. बरं, मुंबई आणि पुणे ही दोन्ही शहरं एकाच राज्यातली आहेत. अहमदाबादचं मात्र तसं नाही… अहमदाबाद गुजरातेत येतं. आणि तसं पाहायला गेलं तर मुंबई, पुणे आणि अहमदाबाद ही तिन्ही शहरं व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचीच आहेत.

म्हणजे मुंबई- अहमदाबाद ही कनेक्टिव्हिटी सोपी झाल्यानंं फायदा होणार असेल तर, तसा फायदा मुंबई-पुणे या कनेक्टिव्हिटीनेही होऊ शकतो. आता सरकारी निर्णय म्हणल्यावर काहीतरी विचार करून, फायदे-तोटे बघुनच घेतलेला निर्णय असेल असं म्हणून बुलेट ट्रेन सुरू होऊन त्यातून काय निष्पण्ण होतंय हे बघावं लागणार आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.