विमानात दारू प्यायचे नवीन नियम आलेत; वाचून घ्या नाहीतर घोळ होईल…

काही दिवसांपुर्वी एक बातमी आलेली, एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये हवेतच एका माणसाने दारूच्या नशेत महिला सहप्रवाशावर लघवी केली. मग, हे मॅटर कोर्टात गेलं, निकाल लागला, माणसाला तुरूंगात पाठवलं गेलं वगैरे वगैरे…

या सगळ्यात आणखी एक गोष्ट घडली ती म्हणजे, एअर इंडियाला फाईन भरावा लागला.

त्यात आता लंडन ते मुंबई फ्लाईट दरम्यानही एका प्रवाशानं दारु पिऊन क्रू मेम्बर्सला त्रास दिला. या सगळ्या प्रकरणानंतर एक मागणी अशीही केली गेली की, फ्लाईटमध्ये दारू प्यायला देणं हे बंद करण्यात यावं. अर्थात तसा काही नियम लागू करण्यात आलेला नाहीये, पण आता एअर इंडियाकडून फ्लाईटमध्ये दारू पिण्यासाठी नवे नियम लागू करण्यात आलेत.

हे नियम काय सांगतात ते बघुया.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे, कोणत्याही प्रवाशाला विमानातल्या कर्मचाऱ्यांच्या म्हणजे केबिन क्रूने दिल्याशिवाय दारू पिता येणार नाही. या सगळ्यामध्ये केबिन क्रूला प्रवाशांकडे लक्ष द्यायलाही सांगितलं आहे.

प्रवासी केबिन क्रू कडून दिल्या जाणाऱ्या दारू शिवाय स्वत:कडची दारू तर पित नाही आहेत ना हे पाहण्याची जबाबदारी सुद्धा विमानातल्या केबिन क्रूकडेच दिली गेली आहे.

बरं दारू पिताना एखाद्या प्रवाशाला किती चढली आहे किंवा तो किती प्रमाणात नशेत आहे? तो व्यवस्थित चालू शकतोय का नाही, त्याला नीट बोलता येतंय का नाही हे बघण्याची जबाबदारीसुद्धा केबिन क्रूडेच सोपावण्यात आली आहे. प्रवाशांना किती नशा झालीये यावरून केबिन क्रू प्रत्येक प्रवाशाला ३ गटात विभागू शकतात.  हिरवा, पिवळा आणि लाल अशा तीन गटात विभागलं जाणार. या रंगांची सिस्टीम ट्राफिक सिग्नलच्या लाईट्सपासून प्रेरणा घेऊन बनवण्यात आली आहे. असं एअर इंडियाकडून सांगण्यात आलंय.

केबिन क्रूला विनम्र राहण्यास सांगण्यात आलंय.

प्रवाशांना दारूपासून दूर ठेवण्यासाठी युक्ती वापरण्यास सांगितलं आहे. शिवाय, एखाद्या केबिन क्रूचा स्वभाव हा मोठ्याने बोलणं किंवा मोठ्याने हसणं हा असेल तर, त्याने ते वर्तन बदललं पाहिजे आणि प्रवाशाला प्रेमाने एका मर्यादेनंतर दारू पिण्यास मनाई केली पाहिजे.

दारू पिण्यापासून मनाई करताना कोणत्याही प्रवाशाला ‘You are Drunk’ म्हणजेच तुम्हाला चढली आहे असं म्हणण्याचा अधिकार नाही. त्याऐवजी, तुमचं वर्तन अयोग्य आहे असं म्हणून प्रवाशांना दारू पिण्यापासून मनाई करावी असंही एअर इंडियाने नव्या नियमात म्हटलंय.

‘मी आणखी पिऊ शकतो आणि मला एक लास्ट ड्रिंक द्या असं प्रवाशाने सांगितलं तरी तुम्ही त्यांच्या विनंतीला बळी पडू नका आणि शेवटचं ड्रिंक देऊ नका.’ असंही केबिन क्रूला सांगण्यात आलंय.

प्रवाशांनी आवाज चढवला तरी, तुम्ही आवाज चढवू नका. तुम्ही तुमचा आवाज आणखी कमी करा आणि प्रेमाने त्यांना आणखी दारू देता येणार नाही हे पटवून द्या. असा सल्लाही केबिन क्रूला देण्यात आलाय.

या सगळ्या जबाबदाऱ्या आणि सल्ल्यांसोबतच या नव्या नियमांमध्ये केबिन क्रूकडे अधिकारही देण्यात आलेत.

अगदी एखादा प्रवासी हा किती नशेत आहे हे पाहून त्या प्रवाशाला विमानात चढण्यापासून नाकारण्याचाही अधिकार हा केबिन क्रूला देण्यात आलाय.

जर, एखादा प्रवासी हा स्वत:कडची दारू पित असेल किंवा पित नसेल, पण आधीपासूनच प्यायला असेल तर, त्या प्रवाशाकडची दारू काढून घेण्याचा अधिकारही देण्यात आला असल्याचं एअर इंडियाने म्हटलंय.

जर, एखाद्या प्रवाशामुळे विमानातल्या कोणत्याही प्रवाशाला, केबिन क्रूला किंवा त्या प्रवाशाला स्वत:ला त्रास हो असेल किंवा होईल असं वाटत असेल तर या प्रवाशाला विमानात चढण्यापासून रोखू शकतात.

एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार

“इतर फ्लाईट सर्विस प्रोवाइडर्स सराव आणि यूएस नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशनच्या गाईडलाईन्सचा संदर्भ घेऊन आमच्या आताच्या इन-फ्लाइट अल्कोहोल सेवा धोरणामध्ये बदल केले आहेत.”

आता, कंपनीला फाईन लागल्यामुळे असेल किंवा मग हे प्रकरण माध्यमांमध्ये चर्चेत राहिल्यामुळे असेल पण एअर इंडियाने इन-फ्लाईट दारू पिण्याच्या आणि पिऊ देण्याच्या नियमांमध्ये बदल केला आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.