म्हणून अजय देवगण ने गेली २५ वर्ष राकेश रोशन सोबत काम केले नाही. 

अजय देवगणचे वडील विरू देवगण बॉलिवुड मधले प्रख्यात स्टंट मॅन. अनेक सिनेमांसाठी स्टंट मॅन म्हणून काम केल्याने विरू सरांची अनेक कलाकार आणि दिग्दर्शकांसोबत चांगली ओळख होती.

विरू सरांचा असाच एक इंडस्ट्रीतला मित्र म्हणजे राकेश रोशन.

राकेश रोशन यांनी १९९५ साली करण अर्जुन बनवायचा घाट घातला. राकेश रोशन यांनी मित्राला म्हणजेच विरू देवगण यांना सिनेमासाठी स्टंट बसवण्याची जबाबदारी दिली. तसेच त्यांनी मित्राचाच म्हणजेच विरू यांचा मुलगा अजयला सिनेमासाठी कास्ट केले. दुसरीकडे शाहरुख खान अजय सोबत काम करणार होता.

तात्पर्य असं..

शाहरुख-सलमान आधी शाहरुख-अजय ही जोडी करन अर्जुन मध्ये झळकणार होती. नेमकं काय झालं की अजयने सिनेमातून माघार घेतली ?

सिनेमाच्या शूटिंगला थोड्याच दिवसात सुरुवात होणार होती. मुलाला राकेश रोशन सोबत काम करायला मिळत आहे म्हणून विरू देवगण सुद्धा खुश होते. परंतु स्क्रिप्ट वाचताना अजय काहीसा गोंधळलेला होता. त्याला स्वतःची भूमिका नीट समजली नव्हती. तसेच त्याला शाहरुख जी भूमिका करत होता ती साकारण्यात अधिक रस होता. म्हणून अजयने प्रांजळपणे राकेश रोशन यांच्याकडे कबुली दिली.

राकेश रोशन यांनी भूमिकांची अदलाबदली करायला अजयला स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यानंतर अजयने करण अर्जुन सिनेमातून काढता पाय घेतला. 

अजयचा हा निर्णय राकेश रोशन यांना पटला नाही की त्यांना राग आला होता. त्यांचं त्यांनाच माहीत, परंतु राकेश रोशन यांनी सिनेमासाठी स्टंट बसवत असणाऱ्या विरू सरांना सुद्धा करण अर्जुन मधून डच्चू दिला.

या गोष्टीचं विरू सरांना खूप वाईट वाटलं. कारण एव्हाना त्यांनी काम सुरू केलं होतं. तसेच अजयने सिनेमा सोडला यात विरू सरांची काहीही चूक नव्हती. तरीही राकेश रोशन यांनी विरू देवगण यांच्या जागी भिकू वर्मांवर स्टंट बसवण्याची जबाबदारी सोपवली.

राकेश रोशन चांगले मित्र असल्याने विरू सरांनी मनातली खंत त्यांच्यासमोर व्यक्त केली नाही. 

करण-अर्जुन सोडल्यानंतर अजय देवगण ‘विजयपथ’ या नव्या सिनेमाच्या तयारीला लागला. इकडे राकेश रोशन यांनी शाहरुख-सलमान ला घेऊन करण अर्जुन च्या शूटिंगला प्रारंभ केला. कालांतराने अजय देवगण च्या विजयपथ सिनेमाचं पोस्टर बाहेर आलं.

या पोस्टरमध्ये अजयच्या हातात बेचकी असून तो निशाणा साधत असतो. राकेश रोशन यांनी हे पोस्टर बघितलं आणि त्यांना राग आला. कारण करण अर्जुन मध्ये शाहरुख च्या हातात सुद्धा बेचकी असलेला एक सीन होता. 

अजयचा विजयपथ १९९४ ला रिलीज झाला.

यावर्षी राकेश रोशन यांना करण अर्जुन साठी मनासारखी डेट नाही मिळाली म्हणून त्यांनी १९९५ ला आपला सिनेमा रिलीज करायचा ठरवला. दरम्यान विजयपथ सिनेमात करण अर्जुन सिनेमाच्या अनेक आईडिया चोरल्या आहेत असा आरोप त्यांनी विरू देवगण यांच्यावर लावला.

आश्चर्य म्हणजे, विरू सरांचा अजयच्या विजयपथ सिनेमाशी काही संबंध नव्हता.

तरीही राकेश रोशन यांनी मीडियामध्ये विरू सरांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. काहीही चूक नसताना राकेश रोशन यांनी आपल्या वडिलांचा केलेला अपमान अजय देवगण ला सहन झाला नाही. परंतु अजय त्यांना काहीही बोलला नाही. पण ही गोष्ट लक्षात ठेवून गेली २५ वर्ष अजय देवगण ने राकेश रोशन सोबत एकही सिनेमा केला नाही. 

एकवेळ छोटीशी गोष्ट खटकल्यावर बॉलिवुड सेलिब्रिटी लगेच हमरीतुमरी वर येतात. परंतु वडिलांची काहीही चूक नसताना त्यांचा अपमान झाला असूनही राकेश रोशन यांच्या वयाचा आणि कर्तृत्वाचा मान अजयने राखला. आणि अगदी शांतपणे अजयने हा निर्णय घेऊन राकेश रोशन यांना प्रत्युत्तर दिले. 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.