मुंबईत बेस्ट बसमधून हाकलल्या नंतर अक्षय कुमार मराठी बोलायला शिकला

काही कलाकार असे असतात जे इंडस्ट्रीच्या बाहेरून येतात, स्ट्रगल करून स्वतःची संधी स्वतः तयार करतात आणि बॉलिवूडवर राज्य देखील करतात. यात प्रमुख नाव येतं,

सबसे बडा खिलाडी अक्षय कुमार याचं.

अक्षयचं खरं नाव राजीव हरिओम भाटिया. त्याचा जन्म अमृतसरला झाला. वडील आर्मीमध्ये सोल्जर होते. अक्षयची आई सुद्धा पंजाबी. वडिलांच्या नोकरीमुळे त्याच बालपण दिल्लीच्या चांदणी चौकमध्ये गेलं.

ते जेव्हा आर्मीमधून रिटायर झाले तेव्हा अक्षयचं कुटुंब मुंबईला आलं. इथल्या सायन कोळीवाडामधल्या १०० रुपये भाडे असलेल्या छोट्या घरात राहू लागले. अक्षयच्या वडिलांनी त्यांची परिस्थिती नसतानाही त्याला डॉन बोस्को या इंग्रजी माध्यमाच्या महागड्या शाळेत घातले.

एकदा अक्षय बसने शाळेला चालला होता.

नेहमी प्रमाणे मुंबईच्या बेस्टमध्ये गर्दी होती. शाळेची बॅग सावरत अक्षय गर्दीत उभा होता. मागून कंडक्टर अक्षय पाशी आला. त्याने त्याच तिकीट फाडल.

तिकीट दिल्यावर तो अक्षयला मराठीत पुढे सरक अस म्हणाला.

नव्यानेच मुंबईत राहायला आलेल्या अक्षयला तो काय म्हणतोय समजलं नाही. तो खाली मान घालून तिथेच उभा राहिला.

कंडक्टरने त्याला दोन तीन वेळा सांगितलं पण अक्षय ढिम्म उभा होता.

शेवटी त्याने त्याला ढकललं आणि म्हणाला,

“तुला एकदा पुढे सरक म्हटलं तर कळत नाही?”

अक्षय म्हणाला आप क्या बोल रहे हो मुझे समझ में नहीं आ रहा.

तेव्हा त्याला कोणीतरी सांगितलं की,

पिछे भिड हो रही है इसिलिए वो तुम्हे आगे जाने के लिए केह रहे है.

अक्षय चिडून म्हणाला फिर ऐसा सिधे सिधे हिंदी मै बोलो ना.

यावर तो कंडक्टरने एक सणसणीत शिवी दिली आणि म्हणाला,

महाराष्ट्रा मे तुम को मराठी सिखनी पडेगी.

आजूबाजूला उभे असलेले सगळे लोक हसले. दोघांची वादावादी झाली. त्याला त्या बस मधून उतरवण्यात आलं.

अक्षय कुमारला अपमान झाल्यासारखं वाटलं.

पुढे दिवसभर त्याच्या डोक्यात चक्र सुरू झालं. तो कंडक्टर म्हणाला ते बरोबर होतं, आपण ज्या भूमीत राहतो तिथली भाषा आपल्याला आलीच पाहिजे.

त्या दिवसापासून त्याने मराठी शिकायला सुरवात केली. योगायोगाने त्याला शाळेत मराठी शिकवायला ज्या मॅडम होत्या त्या त्याच्या आवडीच्या होत्या. हा पठ्ठ्या त्यांच्या प्रेमातच पडला होता. त्यांच्या लेक्चरला जास्त लक्ष देऊन तो अभ्यास करू लागला.

हळूहळू त्याची मराठी सुधारली.

कॉलेजमध्ये असताना त्याची आयुष्यातली पहिली गर्लफ्रेंड सुद्धा एक मराठी मुलगीच होती.

तिच्यामुळे तर अक्षयची मराठी एकदम पक्की झाली.

आजही तो मोठा सुपरस्टार बनल्यावरही मराठी बोलायचं विसरला नाही. सिनेमाच्या निमित्ताने प्रमोशनवेळी आल्यावर, मराठी पत्रकारांना मुलाखत देताना आवर्जून मराठीत बोलतो. अगदी न-ण ळ-ल च्या चुकाही तो करत नाही.

याच मराठी प्रेमातून त्याने चुंबक हा मराठी सिनेमा देखील बनवला. त्याला याच कारण विचारलं असता तो सांगतो की,

“पंजाब माझी जन्मभूमी असली तर मुंबई माझी कर्मभूमी आहे. या मातीची भाषा मी कशी विसरेन?”

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.