आता नवीन पक्षाची घोषणा केल्यानं फिक्स कळालंय अमरिंदर सिंग कोलांटी उडी मास्टर आहेत

सध्या देशाच्या राजकारणात कुठं खळबळ सुरू असेल, तर पंजाबमध्ये. त्यात आता नवी बातमी आली आणि पंजाबमध्ये नवा चॅप्टर सुरू होणार हे फिक्स झालं. किस्सा काय झालाय तर पंजाबचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवा पक्ष काढत असल्याची घोषणा केलीये.

आधीच टेन्शनमध्ये असणाऱ्या काँग्रेसला आता आणखी एक कठीण पेपर सोडवावा लागणाराय. पण अमरिंदर सिंग जसं म्हणलेत तसं करणार का इतिहासाप्रमाणं पुन्हा कोणती उडी मारणार काय सांगता येत नाही.

अमरिंदर सिंगांना काँग्रेसनं मुख्यमंत्री पदावरून डच्चू दिला, मग त्यांनी पक्ष सोडला. अमरिंदर सिंगांचं भांडण असणाऱ्या सिद्धूला काँग्रेसनं परत जवळ केलं. अशा सगळ्या पिक्चरमध्ये अमरिंदर सिंग यांनी आपली नवी स्टोरी सुरू केलीये. आता राजकारणात नव्या स्टोऱ्या सुरू व्हायच्याच, पण नवी स्टोरी सुरू करण्याची ही अमरिंदर सिंगांची पहिली वेळ नाही.

या आधी पण सिंग यांनी नवे पक्ष सुरू केले, विलीन केले आणि काही बदललेही. दम धरा सगळा इतिहास सांगतो.

कॅप्टन अमरिंदर सिंग हे राजघराण्यातले. आजोबा आणि वडिलांप्रमाणं त्यांनीही भारताच्या लष्करात सेवा दिली. ते १९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धातही सहभागी होते. आपले शालेय जीवनापासूनचे मित्र राजीव गांधी यांचा आग्रहामुळे ते राजकारणात आले आणि १९८० मध्ये काँग्रेसकडून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर, चार वर्षांनी ऑपरेशन ब्लू-स्टारचा निषेध म्हणून त्यांनी खासदारकीचा आणि काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला.

त्यांनी शिरोमणी अकाली दलात प्रवेश केला आणि राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवलं. हा सिंग यांचा पहिला पक्षबदल.

पुढची आठ वर्षं ते शिरोमणी अकाली दलात होते. सिंग यांनी १९९२ मध्ये शिरोमणी अकाली दलातून बाहेर पडत शिरोमणी अकाली दल (पंथिक) या नव्या पक्षाची स्थापना केली.

हा त्यांचा दुसरा पक्ष बदल ठरला. या पक्षाचा विधानसभा निवडणुकांमध्ये दारूण पराभव झाला. स्वतः सिंग यांना फक्त ८५६ मतं पडली आणि पराभवाला सामोरं जावं लागलं.

त्यांनी १९९८ मध्ये हा पक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वातल्या काँग्रेसमध्ये विलिन केला.

साहजिकच हा त्यांचा तिसरा पक्षबदल. त्याही वर्षी अमरिंदर सिंग यांना निवडणूक जिंकण्यात अपयश आलं. मात्र त्यांनी प्रदीर्घ काळासाठी काँग्रेसच्या प्रदेश कमिटीत मोलाचची भूमिका बजावली. सोबतच २००२ ते २००७ या कालावधीसाठी ते पंजाबचे मुख्यमंत्रीही होते. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी दिवंगत अरुण जेटली यांचा जवळपास लाखभर मतांनी पराभव केला. काँग्रेसनं २०१५ मध्ये त्यांच्यावर २०१७ च्या पंजाब निवडणुकांची जबाबदारी सोपवली.

या निवडणुकीत सिंग यांच्या नेतृत्वात पंजाबमध्ये काँग्रेस सरकार आलं. कॅप्टन अमरिंदर सिंग पंजाबचे मुख्यमंत्री झाले. सगळं काही आलबेल सुरू असताना, नवज्योत सिंग सिद्धू आणि सिग यांच्यातला वाद शिगेला गेला आणि सिंग यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

काँग्रेसनं त्यांच्याजागी चरणजीत सिंग चन्नी यांची मुख्यमंत्रीपदी निवड केल्यानं हा वाद मिटत नसल्याचं स्पष्ट झालं. त्यात काँग्रेसनं नाराज नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासोबत दिलजमाई केली आणि ठिणगी पेटली.

आता कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवा पक्ष काढणार असल्याची घोषणा केली. आता हा त्यांचा चौथा बदल ठरणार आहे.

विशेष म्हणजे काँग्रेसमध्ये असताना ज्या भाजपविरोधात त्यांनी राजकारण केलं, त्या भाजपनं कृषी आंदोलनावर तोडगा काढला तर आम्ही त्यांच्याशी युती करू असंही त्यांनी घोषित केलंय.

आता अमरिंदर सिंग खरंच भाजपसोबत युती करणार का? का कोलांटी उडी मारून परत काँग्रेसमध्ये जाणार? का स्वतंत्रपणे आगामी निवडणुकीत आपलं आव्हान उभं करणार? आपल्याला प्रश्न लय पडलेत उत्तरं फक्त अमरिंदर सिंगच देऊ शकतात!

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.