शोलेच्या सेटवर भडकलेल्या धरमपाजीच्या हातून बच्चनचा जीव गेला असता.

१५ ऑगस्ट १९७५ साली प्रदर्शित झालेला ‘शोले’ पाहिला नाही असा एकही माणुस भारतात आढळणं हि दुर्मिळ गोष्ट. आज या सिनेमाला ४५ वर्ष पूर्ण आहेत. अशा काही मोजक्या कलाकृती असतात, ज्या अनेक पिढ्यांच्या साक्षीदार असतात. ‘शोले’ हा त्यापैकीच एक सिनेमा. सुरमा भोपाली पासुन जय-वीरु-गब्बर पर्यंत ‘शोले’ मधली प्रत्येक छोटी-मोठी व्यक्तिरेखा लोकप्रिय आहे.

‘शोले’ जेव्हा बनवला जात होता, तेव्हा इतकं अमाप यश या सिनेमाला मिळेल, याची कोणालाच कल्पना नव्हती. ‘शोले’ मध्ये जय-वीरु या दोघांची जीवलग मैत्री म्हणजे सर्व मित्र-मैत्रिणींसाठी आजही वस्तुपाठच. पण शुटींग दरम्यान वीरु मुळे जयचा जीव गेला असता.

म्हणजेच धरम पाजींनी रागाच्या भरात एक अशी कृती केली की त्यामुळे अमिताभ बच्चन यांचा जीव गेला असता.

धर्मेंद्र हिंदी सिनेसृष्टीत ‘गरम-धरम’ म्हणुन ओळखले जातात. याला कारण असं की, धरमजींचं त्यांच्या रागावर नियंत्रण राहायचं नाही. आणि जेव्हा त्यांना राग येतो, तेव्हा ते काय करतील याचा कोणालाच नेम नसायचा. धर्मेंद्र यांचा ‘शोले’ च्या सेटवर एका सीनदरम्यान रागाचा पारा चढला. रागाच्या भरात ‘शोले’ च्या सेटवर धर्मेंद्र यांनी जे केलं, ते कोणीच विसरु शकणार नाही. विशेषतः अमिताभ बच्चन यांच्या मनात हा प्रसंग कायम असावा.

नेमकं काय झालं, हे तुम्हाला सांगतोच. पण ते सांगण्याआधी ज्या सीनदरम्यान हि गोष्ट घडली तो सीन तुम्हाला सांगतो.

बसंतीला गब्बर नाचवत असतो. वीरुचे हात गब्बरने बांधलेले असतात. हेमा मालिनी बसंतीच्या भुमिकेत काचेच्या विखुरलेल्या तुकड्यावर नाचत असते. गब्बर तिच्याकडे आणि वीरुकडे बघुन चित्रविचित्र हसत असतो. वीरुचे हात बांधलेले आणि तो गब्बरकडे बघत, रागाने लालबुंद झालेला. आपल्या जीवलग मित्राला आणि बसंतीला सोडवायला जय मोठ्या दगडाआडून येतो.

तो वरुनच बंदुकीचा धाक दाखवुन गब्बरच्या तावडीतुन वीरु आणि बसंतीची सुटका करतो. वीरु तिथुन जाताना खाली पडलेली बंदुक उचलतो. बंदुकीच्या गोळ्यांनी भरलेल्या एका बाॅक्सवर लाथ मारुन त्यातील गोळ्या स्वतःच्या खिशात भरतो. बसंतीला घेऊन वीरु जयला जाऊन भेटतो. आठवला सीन? चला, आता पुढची गोष्ट सांगतो.

हा सीन शुट करण्यासाठी ‘शोले’ चे दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि सर्व टीमने तयारी केली.

जेरी क्राॅम्प्टन आणि मुहम्मद आली हे ‘शोले’ चे अॅक्शन डायरेक्टर. हा सीन अधिक वास्तववादी दिसावा म्हणुन दोघांनी वीरु जो बाॅक्स लाथेने उघडुन गोळ्या घेतो, त्या बाॅक्समध्ये बंदुकीच्या ख-या गोळ्या भरल्या. पण या दोन अॅक्शन दिग्दर्शकांना कुठे माहित होतं की, सीन जीवंत करण्याच्या नादात एका जीवंत माणसाच्या जीवावर बेतलं असतं.

अॅक्शन म्हणताच , धर्मेंद्र बाॅक्सजवळ आले. त्यांनी बाॅक्सला लाथ मारली. परंतु बाॅक्स उघडलाच नाही.

कट! टेक २ …

धर्मेंद्र पुन्हा बाॅक्सजवळ आला, पुन्हा लाथ मारली परंतु पुन्हा बाॅक्स उघडलाच नाही. पुन्हा पुन्हा करण्यामध्ये बरेच रिटेक झाले. धर्मेंद्र यांना लाथेने बाॅक्स उघडताच येत नव्हता. आता मात्र धर्मेंद्र यांच्या रागाचा पारा वाढत होता. या सीनदरम्यान अमिताभ वरच्या दगडाआड उभा होता.

पुन्हा कॅमेरा सेटअप लावला गेला. अॅक्शन म्हणताच धर्मेंद्रने इतक्या जोरात लाथ मारली, की बाॅक्स पटकन उघडला गेला. धर्मेंद्रने बाॅक्समधल्या गोळ्या खिशात न भरता बंदुकीत भरल्या आणि बंदुकीतुन धडाधड गोळ्या झाडुन त्याने रागाच्या भरात हवेत गोळीबार केला…

‘शोले’ ची सर्व टीम धर्मेंद्रचं हे रुप बघुन सुन्न झाली. सर्वांना काय बोलावं कळत नव्हतं.

सर्वजण काही क्षणातच धावत, दगडाआड अमिताभ उभा होता तिथे गेले. सर्वांना धाकधुक होती की, अमिताभ जखमी तर झाला नसेल ना?

घाबरत घाबरतच सर्व दगडाच्या पाठी गेले. अमिताभ एका कोप-यात बसुन होता. अमिताभ थोडा पुढे आला असता तर, एकतर बंदुकीतली गोळी त्याच्या आरपार जाऊन त्याचा जीव गेला असता किंवा तो गंभीर जखमी झाला असता. पण सुदैवाने अमिताभला काही झालं नव्हतं. आपण काय करुन बसलोय, हे धर्मेंद्रच्या लक्षात आलं.

त्याने हातातली बंदुक तिथेच टाकली. धावतच तो अमिताभजवळ जाऊन त्याने अमिताभची मनापासुन माफी मागितली.

हा किस्सा आजही धर्मेंद्र विसरले नाहीत. गोळीचा नेम चुकुन उलटासुलटा झाला असता तर, गब्बरच्या गुंडांकडून मरण पत्करण्याआधीच वीरुकडुन जय मारला गेला असता. असो! असं काही झालं नाही. पुढच्या टेकला डोकं शांत ठेऊन धर्मेंद्रने लाथेने बाॅक्स उघडला. गोळ्या खिशात भरुन जयपाशी गेला आणि टेक ओके झाला.

  • देवेंद्र जाधव

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.