फॉरेनरनां सुद्धा वेड लावणारं गाणं आनंद शिंदेनी फक्त ५ हजारात गायलं होतं.

जगभरातील देशोदेशीच्या वेगवेगळ्या भाषेतील गाण्यांवर आपल्या नाचण्याने धुमाकूळ घालणाऱ्या रिकी पॉन्ड या डान्सर ,कंटेंट क्रीयेटरने सोशल मिडीयावर कोंबडी पळाली या गाण्यावर रील बनवून या एव्हरग्रीन गाण्याची पुन्हा एकदा आठवण करून दिली. नेटकर्यांनी या त्याच्या व्हिडिओला चांगलचं उचलून धरलं. या गाण्याचे गीतकार सुप्रसिद्ध अभिनेते जितेंद्र जोशी ह्यांनी त्यांच्या स्वतच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून हा त्याचा व्हिडिओ शेअर केला.

सुपरस्टार भरत जाधव ,संगीतकार अजय अतुल ह्यांनीही या अवलियाचं कौतुक केलं. मराठी रसिकांनी तर हा व्हिडिओ भरपूर मोठ्या प्रमाणात व्हायरल केला. या गाण्यामागचा एक किस्सा मात्र खूप मज्जेदार आहे.

२००६ सालचा जत्रा चित्रपट त्यातील हे गाणं. केदार शिंदे दिग्दर्शित हा चित्रपट या गाण्यामुळे तुफान चालला. गाण्याची माउथ पब्लिसिटी हे या चित्रपटाचं मोठं यश ठरलं. आजही मराठी प्रेक्षक हा चित्रपट आवडीने बघतात. भरत जाधव ,क्रांती रेडकर ह्यांवर हे गाण चित्रित झाल. संगीतकार अजय अतुल या जोडगोळीने हे गाणं बनवलं, जितेंद्र जोशी ह्यांनी या गाण्याचे शब्द लिहिले.

या गाण्याची जी हुक लाईन आहे ‘कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली’ ती अजय अतुल यांनी लिहिली. जस की त्यांच्या बऱ्याच गाण्याच्या हुक लाईन तेच लिहितात. वैशाली सामंत यात मुख्य गायिका होत्या आणि अजय अतुल या गाण्यात भरत जाधव साठी पार्श्वगायक शोधत होते.

गाणं कंपोज करतेवेळी त्यांना माहिती होतं की उडत्या चालीची गाणी आनंद शिंदे चांगली गातात. त्यांच्या आवाजात त्यांना ते गाणं ऐकू येत होतं.

त्या काळात आनंद शिंदेंची लोकगीते ऐन जोमात होती पण ती मुख्य प्रवाहात नव्हती. पण त्यांच्या आवाजाची जादू ग्रामीण भागात जास्तचं होती. त्यांच्या गाण्यांच्या कॅसेट बाजारात मोठ्या प्रमाणावर विकल्या जात होत्या.

त्यांचं सगळ्यात जास्त हिट झालेलं गाणं पुढे महाराष्ट्राच लोकगीत ठरलं ते म्हणजे नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला पण ते गाणं येऊन बराच काळ लोटला होता. नवीन पोपट या गाण्याला येऊन दहा बारा वर्ष उलटली असतील.

संगीतकार अजय अतुलने त्यांना रेकॉर्डिंग साठी बोलावलं. त्याकाळी आनंद शिंदे हे प्रत्येक गाण्याचे पाच हजार रुपये मानधन घ्यायचे.

रेकॉर्डिंगला ते आले तेव्हा अजय अतुल त्यांना ह्या गाण्याचं मानधन पंधरा हजार रुपये देतो असं सांगितलं.  पण आनंद शिंदे लोकगीताच्या मानधनात इतके अडकले होते की ते अजय अतुलला म्हणाले की

पाच हजार रुपये घेईन.

अजय अतुल त्यांना समजावत राहिले की अहो आम्ही तुम्हाला पाच हजार नाही तर पंधरा हजार रुपये देतोय पण आनंद शिंदेनी हट्ट सोडला नाही. आनंद शिंदेना त्यावेळी पाच हजार रुपये जास्त वाटत होते म्हणून ते अडून राहिले त्यांनी हेका सोडला नाही, अजय अतुल यांनी सुद्धा त्यांना समजावण्याचा नाद सोडला. शेवटी पाच हजार रुपयात गाणं केलं.

गाण्याबद्दलची त्यांची आत्मीयता खरच वाखाणण्याजोगी आहे. नंतर ते गाणं इतकं हिट झालं की महाराष्ट्रातील सगळ्यांच्याच तोंडपाठ झालं. लग्नसमारंभ ,सणउत्सव सगळ्याच ठिकाणी ह्या गाण्याची धूम होती. या गाण्यामुळे आनंद शिंदेंच्या कारकिर्दीला परत एकदा उभारी मिळाली.

पुढे अजय अतुलसोबत त्यांनी बरीच हिट गाणी केली . पुढे कोंबडी पळालीच्या धर्तीवर बॉलीवूडमध्ये २०१२ साली अग्निपथ चित्रपटात चिकणी चमेली हे गाण आलं पण जेव्हा लोकाना कळल की ओरीजनल गाण मराठीत आहे तेव्हा सुद्धा लोकांनी सांगितलं की कोंबडी पळालीची सर हिंदी गाण्याला नाही.

रिकी पॉन्ड मुळे हे गाण पुन्हा एकदा ट्रेण्ड मध्ये आलं. आजही आनंद शिंदे या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा किस्सा सांगताना अजय अतुलचे आभारही मानतात.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.