आणिबाणी होती, समोर इंदिरा होत्या, वांरट होतं तरिही स्वामींच्या केसालाही धक्का लागला नाही

२५ जून १९७५ चा दिवस. दिल्लीच्या रामलीला मैदानावर जयप्रकाश नारायण यांच्या ऐतिहासिक सभा पार पडली. सभेवरुन परतल्यानंतर सुब्रमण्यम स्वामी गाढ झोपेत होते. इतक्यात पहाटे चारच्या दरम्यान ग्रेटर कैलास पोलिस स्टेशनच्या एका सब इन्सपॅक्टरचा फोन आला.

“तुम्ही घरात आहात का ? मी तुम्हाला भेटायला येवू शकतो का?”

स्वामींनी होकार देताच तो इन्सपॅक्टर भेटायला घरी येतो.

स्वामी मुळातच चाणाक्ष माणूस, हाडाचे गणिततज्ञ. त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं तर वयाच्या २२-२३ व्या वर्षी इंडियन स्टॅटिस्टिकल इंस्टिट्युटमध्ये शिकवायला जाणारे, नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ पॉल सॅम्युल्सन यांच्यासमवेत संशोधन पेपरवर काम केलेले, २४ व्या वर्षी हार्वर्ड विद्यापीठाची पीएचडी मिळवणारे, २७ व्या वर्षी हार्वर्ड विद्यापीठामध्येच आणि नंतर अवघ्या २९ वर्षी आयआयटीमध्ये प्राध्यापक म्हणून ते प्रसिद्ध होते.

म्हणजे नुसतं पुस्तकी नाही तर व्यवहारज्ञानानं सुद्धा स्वामी अमाप हुशार. त्यामुळे लगेचच ट्युब पेटली. पोलिस येण्यापुर्वी कधीच कोणाला सांगुन येत नाहीत, त्यामुळे हे वेगळच प्रकरण असल्याची शंका त्यांना आली.

पोलिसांनी येताच टीप दिली की, काहीतरी मोठं होणार असून तुमच्या नावाचं वॉरंट निघालं आहे. त्यामुळे लगेच गायब व्हा. स्वामींनी बॅग भरली न् साडे चार वाजता गोल मार्केटमधील आनंदचे घर गाठले. इकडे पोलिस मात्र शोधत राहिले.

काही दिवसांनंतर जनसंघाचे नेते नानाजी देशमुख यांच्या सांगण्यावरुन त्यांनी वेषांतर केले. पगडी आणि कडा घालून स्वामींनी शिख धर्माचा वेश धारण केला आणि भूमिगत झाले. त्यांनी बहुतांश वेळ कॉंग्रेसचे सरकार नसलेल्या गुजरात आणि तामिळनाडू राज्यामध्ये घालवला.

गुजरातमध्ये स्वामी तत्कालिन मंत्री मकरंद देसाई यांच्या घरी रहायचे. त्या दिवसांमध्ये नरेंद्र मोदी हे स्वामींना देसाई यांच्या घरी स्कुटरवरुन सोडण्यासाठी जात असतं.

दरम्यान, आणिबाणीच्या निषेधार्थ प्रचार करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं स्वामींना परदेशात पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मद्रासहून कोलंबोसाठी विमान पकडलं आणि तेथून दुसऱ्या जहाजेनं लंडनला रवाना झाले. लंडनमध्ये ब्रिटनमधील तत्कालीन उच्चायुक्त बी.के. नेहरू यांनी त्यांना परत भारतात परत जाऊन आत्मसमर्पण करण्याचा सल्ला दिला.

दोन दिवसांनंतर स्वामींना फोन आला की त्यांचा पासपोर्ट रद्द झाला आहे. स्वामी अमेरिकेत पोचले तेव्हा भारतीय अधिकाऱ्यांनी अमेरिकेवर दबाव आणून स्वामींना त्यांच्या स्वाधीन करण्यास सांगितलं. पण अमेरिकेनं भारतीय अधिकाऱ्यांना सांगितलं की स्वामींचा पोसपोर्ट रद्द केला असल्याचा भारत दावा करत असला तरी त्यांच्या पासपोर्टवर तसा शिक्का नाही आणि अमेरिका सरकार भारतासाठी पोलिसांची भूमिका बजावू शकत नाही.

त्यामुळं पुढे स्वामी अनेक महिने अमेरिकेत राहिले आणि २४ राज्यात जाऊन आणीबाणीच्या विरोधात प्रचार केला. इकडे पोलिसांनी त्यांच्या घरातल्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. घरातील सगळ्या वस्तु जप्त केल्या गेल्या. जे कोण भेटायला येतील त्यांच्या घरावर छापे पडायची.

इंदिरा गांधींना समोरासमोर आव्हान देणारे स्वामी :

दरम्यान स्वामींच्या मनात असे विचार येत होते की असे काहीतरी करावे ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ निर्माण होईल. आणि त्यांनी त्यासाठी भारतीय संसद निवडली. स्वामी त्यावेळी राज्यसभेचे सदस्य होते. नुकतेच राज्यसभेवर गेले असले तरी तुम्हाला सांगितल्या प्रमाणे स्वामी भल्या-भल्यांना पाणी पाजणारा माणूस आहे.

संसदेचा कायदा असा आहे की जर एखादा खासदार परवानगीशिवाय सलग ६० दिवस गैरहजर राहिला तर त्याचे सदस्यत्व आपोआप रद्द होते.

स्वामींनी निर्णय घेतला की ते भारतात परत येतील आणि राज्यसभेत उपस्थितीच्या रजिस्टरवर सही करतील. त्यांनी पॅन-एएम विमानाचे लंडन – बँकॉक हॉपिंग तिकीट विकत घेतले. बँकॉकचे तिकीट असल्यानं दिल्लीत उतरणाऱ्या लोकांच्या यादीत त्याचं नावच नव्हतं.

सकाळी तीन वाजता हे विमान दिल्लीला पोहोचलं. स्वामींकडे बॅगशिवाय दुसरं काहीच सामान नव्हतं. त्यावेळी विमानतळांवर इतकी कडक सुरक्षा नसायची. त्यांनी आपले राज्यसभेचे ओळखपत्र सुरक्षारक्षकाला दाखवले न् भारतात दाखल झाले. आणि थेट राजदुत हॉटेल गाठले.

तिथून त्यांनी आपल्या बायकोला इंग्रजांच्या आवाजात फोन करुन

“आपल्या मावशीने आपल्यासाठी इंग्लंडमधून भेट पाठविली असल्याचे सांगितले. त्यामुळे ते नेण्यासाठी मोठी बॅग घेऊन या”

असा निरोप दिला. या कोडचा अर्थ असा होता की आपल्यासाठी पगडी, बनावट दाढी आणि शर्ट पॅन्ट पोहोचवावे.

स्वामी पाच दिवस स्वतःच्या घरात आणि बाहेर पोलिस :

स्वामींनी आपल्या बायकोला सांगितलं की ते संध्याकाळी टिव्ही मेकॅनिकचा वेषात घरी येईल. संध्याकाळी त्यांनी स्वत: च्याच घराचा दरवाजा ठोठावला आणि मी तुमचा दूरदर्शन दुरुस्त करण्यासाठी आलो असल्याचं सांगितले. ते घरात शिरले आणि त्यानंतर पाच दिवस बाहेर निघालेच नाहीत. बाहेर पोलिस डोळ्यात तेल घालून खडा पहारा देत होते.

‘पॉईंट ऑफ ऑर्डर’

१० ऑगस्ट १९७६ रोजी रौक्शना यांनी स्वत: ची फियाट कार घेऊन त्यांना संसदेच्या गेट नंबर चार येथे सोडले आणि त्यांची गाडी चर्च ऑफ रेडेंप्शनजवळ पार्क केली. स्वामींनी कोणत्याही निर्बंधाशिवाय संसदेत प्रवेश केला. आणि हजेरी रजिस्टरवर सही केली. तोपर्यंत कम्युनिस्ट खासदार इंद्रजित गुप्तांना ते अनवधानने धडकले. त्यांनी विचारले “तुम यहाँ क्या कर रहे हो?” स्वामी जोरात हसले आणि त्यांचा हात धरून थेट राज्यसभेत शिरले.

Screenshot 2020 09 01 at 9.51.28 AM
शिख वेशभुषेतील सुब्रह्मण्यम स्वामी व इंदिरा गांधी

तुम्हाला सांगुन पटत नाहीये. पण स्वामी खरचं खूप चाणाक्ष माणूस. त्यांनी दिवस आणि वेळ अशी निवडली की ज्यादिवशी राज्यसभेत मृत झालेल्या खासदारांचे शोक प्रस्ताव वाचले जात होते. अध्यक्ष बी. डी. जत्ती यांनी शेवटचा शोक प्रस्ताव वाचताच स्वामी ताडकन् उठून उभे राहिले न् ओरडले,

“पॉईंट ऑफ ऑर्डर सर ….

तुम्ही भारतीय लोकशाहीला दिवंगत लोकांच्या यादीमध्ये समाविष्ट केले नाही झालं

संपूर्ण सभागृहात जोरदार शांतता पसरली.

स्वामींच्या हातात बॉम्ब असल्याच्या भीतीने गृहराज्यमंत्र्यांनी घाबरून बाकाखाली लपण्याचा प्रयत्न केला. अशातच सभापतींनी स्वामींना अटक करण्याचे आदेश देण्याऐवजी दिवंगत खासदारांच्या सन्मानार्थ उभे राहून दोन मिनिटे मौन बाळगण्यास सांगितले.

या गोंधळाचा फायदा घेत स्वामी ‘वॉक आऊट’ असे जोरात ओरडले. आणि गडबडीने संसद भवनातून बाहेर आले. इंदिरा गांधी समोर असून, वॉरंट असून देखील त्या काही ही करु शकल्या नाहीत.

तिथून रेल्वेने ते मथुरा – नागपुर करत मुंबईला दाखल झाले. काही दिवस भूमिगत राहिल्यानंतर स्वामी गोरखपूरमार्गे काठमांडूला पोहोचले, तिथून नेपाळच्या महाराजांच्या मदतीने रॉयल नेपाळ एअरलाइन्सच्या विमानाने त्यांना बँकॉकला पाठविण्याची व्यवस्था केली. बँकॉकहून स्वामींनी अमेरिकेसाठी दुसरे विमान पकडले.

दोन महिन्यांनंतर इंदिरा गांधींनी निवडणूक जाहीर केली. एक डझन खटल्यांमध्ये नाव आणि अटकेची वॉरंट त्यांच्याविरूद्ध असूनही स्वामींनी भारतात परत येण्याचे ठरविले.

जेव्हा ते मुंबईतील सांताक्रूझ विमानतळावर आले तेव्हा पोलिसांनी त्याला विमानतळाबाहेर येऊ दिले नाही. अर्ध्या तासानंतर दिल्लीहून स्वामींना अटक करू नये असा फोन आला. दोन दिवसांनंतर स्वामी राजधानी एक्स्प्रेसने दिल्लीला परतले.

प्लॅटफॉर्मवर त्याचे स्वागत करण्यासाठी हजारो लोक उपस्थित होते. घोषणाबाजी करणाऱ्या लोकांच्या खांद्यावर बसून ते स्टेशनबाहेर आले. पुढे १९७७ मध्ये मुंबईतून लोकसभा निवडणूक लढविली आणि प्रचंड मताधिक्याने विजय मिळवत स्वामींनी सभागृहात प्रवेश केला.

संदर्भ : कैच मी इफ़ यू कैन: सुब्रमण्यम स्वामी

हे ही वाच भिडू 

1 Comment
  1. PSTD says

    If anyone have the link of source book plz share with me.

Leave A Reply

Your email address will not be published.