इचलकरंजी संस्थान वैभवाच्या शिखरास जाऊन पोचले ते अनूबाईच्या कर्तृत्वामुळेच !

पेशवाईच्या काळातीलअनेक रोमांचकारी कथा आपण ऐकत असतो. एकूणच या सगळ्या स्त्रिया कर्तृत्ववान आणि वलयांकित. त्यातील राधा बाई , काशी बाई किँवा रमा बाई बद्दल अजुनही भरभरून लिहिले किंव्हा बोलले जाते ….पण या सगळ्यात एक स्त्री दुर्लक्षित राहिली ती म्हणजे अनुबाई घोरपडे !

बाळाजी विश्वनाथ आणि राधा बाईच्या पोटी अनुबाईचा जन्म झाला. थोरले बाजीराव आणि चिमाजी आप्पाची ही लाडकी लहान बहीण. 

त्या वेळच्या पद्धती प्रमाणे वयाच्या सहाव्या – सातव्या वर्षी विवाह इचलकरंजी संस्थानातील सरदार घराण्यात अनुबाईचा विवाह झाला. त्यांचे सासरे नारायणराव घोरपडे प्रतिष्ठित आणि पेशव्यांचे विश्वासु सरदार होते.

अनुबाई कर्तृत्ववान होत्या , त्यांना राजकारणाची नुसती समज नव्हती तर त्या राजकारण आणि कारभार त्या समर्थपणे हाताळत होत्या.

कारभारात लक्ष घालताना त्यांनी फक्त सदरेवर लक्ष ठेवले नाही तर मोहिमेवर जायला सुरुवात केली. श्रीमंत नानासाहेब पेशव्या बरोबर कर्नाटकची, सावनुर आणि इतर मोहीमा केल्या.कालांतराने बऱ्याच स्वतंत्र मोहिमा केल्या. मोहिमा करण्यामागे एकच उद्देश होता तो म्हणजे इचलकरंजी संस्थान वाढवणे आणि त्यात त्या यशस्वी झाल्या. त्यांच्या कारभाराने संस्थान भरभराटीला येत होते.

अनुबाईचे पुत्र नारायणराव लाडात वाढलेले होते, कारभार अनुबाईच पाहात असल्यामुळे मुलाच्या कर्तुत्वाला वाव मिळाला नाही, त्यात अनुबाईनी ते कायम आज्ञेत राहतील याची काळजी घेतली.

त्यामुळे पुर्ण हयातीत अनुबाईचा कारभारावर एकछत्री अंमल होता.

श्रीमंत माधवराव पेशव्याच्या काळात अनुबाईच्या मुलाने राघोबा दादाशी हात मिळवणी करुन आई विरुद्ध बंड पुकारले. पेशव्यांची मध्यस्थी आणि अनुबाईंच्या कर्तृत्वापुढे हे बंड फार काळ टिकू शकले नाही.

अनुबाईंचा पुत्र कर्तृत्वहीन म्हणावा कि, आईने स्वतःच्या महत्वकांक्षेपायी आपल्या मुलाच्या कर्तृत्वाची वाढ होऊ दिली नाही, त्याचं कारण काहीही असो अनुबाई संस्थान २५-३० वर्षे एक हाती आणि जेंव्हा गरज पडेल तेंव्हा पेशव्यांच्या मदतीने चालवत होत्या. 

पेशवाईच्या अनेक पिढ्या पाहिलेली ही स्त्री, ज्यांचा नानासाहेब, सदाशिव भाऊ आणि राघोबा दादा वर वचक होता, थोरले माधवराव किंवा नारायणराव तर त्यांच्या समोर कोवळे होते.

पण ही पेशवाईतील आदरयुक्त दरारा असलेली स्त्री एका चुकी मुळे पेशवाईतुन दुरावली गेली आणि राजकारणातून देखील बाहेर पडले.

काय होती ती चुक ?

ती चुक होती सदाशिवभाऊ तोतया प्रकरणातली त्यांची भूमिका. कदाचित सदाशिवरावाच्या प्रेमा पोटी तोतयाला त्या भाऊ समजुन त्यांनी पाठिंबा दिला. त्यांच्या भुमिकेमुळे श्रीमंत माधवराव आणि नाना फडणवीस विचित्र कात्रीत अडकले. पण नाना फडणवीस बोलूनचालून मुत्सद्दी. त्यांनी मग खऱ्या खोट्याची शहा निशा करण्या करता तोतयाला १५ दिवस अनुबाईच्या घरात ठेवले. त्या नंतरही तोतयाच्या बाबतीत त्या गोंधळलेल्याच होत्या. पण तोतयाचे काय झाले हा इतिहास आहे.

पण अनुबाईंची भुमिका त्यांच्या आणि पेशव्यांच्या नात्यात वितुष्ट देऊन गेली. यानंतर त्यांनी राजकारणातुन अंग काढुन घेतले. तीर्थयात्रा आणि घरगुती कामात गुंतवुन घेतले …

अशी ही थोर मुत्सद्दी , राजकारणी आणि पेशव्यांची माहेरवाशीण १७८३ ला तुळापुरला मृत्यु पावली.  इचलकरंजी संस्थान वैभवाच्या शिखरास जाऊन पोंचलें तें अनूबाईच्या कर्तृत्वामुळेंच ! त्यामुळे  इतिहासात इचलकरंजी संस्थानात त्यांचा गौरवाने उल्लेख केला जातो.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.