आणि रामराजेंना आपलं पहिलं प्रेम असलेल्या क्रिकेटला सोडून राजकारणात यावं लागलं..

रामराजे नाईक निंबाळकर म्हणजे सध्याचे महाराष्ट्राचे विधानपरिषदेचे सभापती. त्यांचा मतदारसंघ असलेला सातारा जिल्ह्यातील फलटण म्हणजे दुष्काळी रखरखी भाग. मात्र रामराजेंची ओळख पश्चिम महाराष्ट्राचे जलदूत अशी आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळासाठी आपली आमदारकी देखील पणाला लावणारे रामराजे आजही आपला खानदानी सुसंस्कृतपणा आणि अभ्यासपूर्ण विद्ववत्तेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आबा राखून आहेत.

मात्र राजकारण हे त्यांचं काही पहिलं प्रेम नव्हतं. तुम्हाला वाटेल असं कस शक्य आहे ? फलटणच्या निंबाळकर घराण्याचे वारसदार असणाऱ्या रामराजेंच्या खानदानात राजकारणाची मोठी पूर्ण परंपरा आहे. मग तरी त्यांना राजकारणात येण्याची इच्छा का नव्हती.

सुरवातीपासून सांगतो.

शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात ऐतिहासिक जहागिरदार घराण्यांत फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्याचे स्थान महत्त्वाचे होते. या घराण्याची राजकीय सत्ता जवळजवळ सातशे वर्षे अबाधित होती. शिवरायांच्या पत्नी व शंभू महाराजांच्या मातोश्री सईबाई या याच घराण्याच्या होत्या. नाईक निंबाळकर घराण्याची छत्रपती भोसले घराण्याशी सोयरीक त्याच्याही आधी अनेक पिढ्यांपासून चालत आलेली.

त्यामुळेच चौऱ्याऐंशी गावांचे हे संस्थान आकाराने लहान असले, तरी मानाने फार मोठे होते.

याच घराण्यातले शेवटचे अधिपती मालोजीराजे नाईक निंबाळकर हे यांच नाव महाराष्ट्राच्या सर्वोच्च नेत्यांमध्ये घेतलं जायचं. त्यांनी अनेक मोठमोठी मंत्रीपदे भूषवली मात्र पुढे काँग्रेसच्या नेत्यांच्या वादामुळे त्यांचं मुख्यमंत्रीपद हुकलं. रामराजेंचे चुलते शिवाजीराजे नाईक निंबाळकर देखील काही काळ महाराष्ट्राचे मंत्री होते.

अशा ऐतिहासिक राजकीय परंपरा असणाऱ्या कुटुंबात रामराजेंचा जन्म झाला. मात्र अगदी लहान वयापासून रामराजेंना क्रिकेटचं भलतं वेड होतं.

ते आपल्या आठवणी सांगताना म्हणतात,

“इयत्ता ७ वीनंतर साधारण वयाच्या २० वर्षापर्यंत मी क्रिकेटचा वेडा मनुष्य होतो. अतिशय अव्वल दर्जाचे क्रिकेट मी त्यावेळी खेळायचो.”

रामराजे यांचं शिक्षण पुण्यात झालं. पुण्यात असतानाच त्यांना क्रिकेटची आवड लागली. फक्त आवड नव्हती तर ते चांगलं क्रिकेट खेळायचे देखील. पुणे विद्यापीठाच्या संघात रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्थान मिळवलं होतं. फक्त इतकंच नाही तर त्यांचं नाव महाराष्ट्राच्या रणजी टीमसाठी देखील चर्चेत असायचं.

रामराजे नाईक निंबाळकरांचे प्रशिक्षक होते कमल भांडारकर. भांडारकर हे त्याकाळचे दिग्गज प्रशिक्षक. एककाळ गाजवलेल्या भाऊसाहेब निंबाळकरांना देखील त्यांनीच प्रशिक्षण दिलं होतं.  निंबाळकर यांनी एका स्पर्धेत ४०० रन्स मारल्या होत्या. रामराजेंच्या काळात सुपरस्टार क्रिकेटर म्हणजे सुनील गावस्कर. त्याकाळच्या प्रत्येक खेळाडूला गावस्कर व्हायचं होतं. रामराजेंचा देखील तोच आदर्श होता.

एकदा फॉर्ममध्ये नसलेला गावस्कर आपल्या स्टान्स बद्दल सल्ला घेण्यासाठी पुण्याला कमल भांडारकर यांच्याकडे आला. 

रामराजे सांगतात,

क्रिक्रेटमध्ये फार मोठे स्थान असलेल्या रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या टप्प्यापर्यंत मी पोचलो होतो. महाराष्ट्राच्या रणजी संघामध्ये माझे पहिल्या २२ ते २३ खेळाडूंच्या यादीत नाव असायचे.

रामराजे नाईक निंबाळकर देशासाठी खेळायला मिळावं म्हणून प्रचंड मेहनत घेत होते. क्रिकेट खेळताना ते देहभान विसरून जायचे. मात्र एकदा त्यांना मोठा फटका बसला.

विद्यापीठ स्तरावर एक मॅच सुरु होती. रामराजे बॅटिंग करत होते. एकदा रन्ससाठी धावताना त्यांचा अपघात झाला. त्यांच्या गुडघ्याला मोठी इजा झाली. त्यावेळी वैद्यकीय तंत्रज्ञान प्रगत झालेले नव्हते. त्यामुळे गुडघ्यावर चांगले उपचार होऊ शकले नाहीत.

रामराजे सांगतात,

चांगले उपचार न घेताच मी तरूणपणाच्या मस्तीत आणखी क्रिकेट खेळत राहिलो. गुडघ्यावर शस्त्रक्रिया होण्याच्या सुमारास ज्यावेळी मी शेवटचे क्रिकेट खेळलो, तेव्हा 82 रन्स मारल्या होत्या. त्यानंतर गुडघ्याचा त्रास कमालीचा वाढला, अन् माझ्या क्रिकेटला कायमचा पूर्णविराम मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

क्रिकेट बंद झाल्यामुळे निराश झालेल्या रामराजेनी दुसरं करियर निवडलं ते म्हणजे कायद्याचं. 

रामराजेंनी पुण्यातून इंटरनॅशनल लॉचे पदव्युत्तर शिक्षण घेतले होते.  त्यांनी कायद्याचे प्राध्यापक म्हणून काम सुरु केलं. त्यासाठी फलटणला परत आले. रामराजे सांगतात कि,

संस्थान काळात माझ्या आजोबांनी घडविलेले अतिशय प्रगतशिल फलटण मी लहानपणी पाहिले होते. रेल्वे, विमानतळ इतक्या मोठ्या सुविधा त्यावेळी होत्या. पण ज्यावेळी १९८० मध्ये मी फलटणला गेलो, त्यावेळी नेमके उलटे चित्र दिसत होते. 

तालुक्याचं गटबाजीमुळे बरच नुकसान झालं होतं. एके दिवशी रामराजेंच्या चुलत्यांनी त्यांना व त्यांच्या चुलत भावंडाना म्हणजेच रघुनाथराजे आणि संजीवराजे एकत्र बसवले आणि बजावलं,

मी थकलेलो आहोत. आपल्या घराची गौरवशाली परंपरा आहे. त्यामुळे तुम्हाला फलटणच्या विकासासाठी प्रयत्न करावे लागतील. रामराजे तुम्ही सर्वात थोरले आहात, त्यामुळे तुम्हालाच यात पुढाकार घ्यावा लागेल,

चुलत्यांच्या आग्रहामुळे रामराजे राजकारणात आले. १९९१ साली त्यांच्या चुलत भावाने पंचायत समितीची निवडणूक लढवली तर रामराजे फलटणचे नगराध्यक्ष झाले. पुढच्या  पाचच वर्षात त्यांनी फलटणवरून अपक्ष तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवली आणि जिंकले देखील.

एकेकाळी क्रिकेटमध्ये करियर करायचं स्वप्न पाहणाऱ्या फलटण राजघराण्याच्या वारसदाराची राजकारणाची इनिंग सुरु झाली होती.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.