एकटं जोशीमठ नाही, नैनिताल आणि उत्तराखंडमधली आणखीही ठिकाणं संपायच्या वाटेवर…

उत्तराखंडमधल्या जोशीमठ या गावात सध्या काय परिस्थिती आहे हे मागच्या काही दिवसांपासून मीडियामध्ये दिसतंच आहे. सध्या जोशीमठ हे गाव उध्वस्त व्हायच्या वाटेवर आहे. लवकरात लवकर जोशीमठ रिकामं केलं जावं अशा हालचालीही सुरू आहेत.

जोशीमठ हे खरंतर ऐतिहासिक वारसा लाभलेलं आणि अतिशय सुंदर असं गाव आहे.

मग, जोशीमठ अचानक संपायच्या वाटेवर का आहे? त्यामागे काही नैसर्गिक तर, काही मानवनिर्मित अशी कारणं आहेत… जोशीमठ हे गाव मुळात हिमालयाच्या पर्वतरांगांमधल्या एका डोंगरावर वसलंय.

एखादं गाव हे वसवताना ते गाव ज्या जमिनीवर वसवलं जातंय त्या जमिनीची कणखरता तपासणं गरजेचं असतं. जोशीमठच्या बाबतीतला कार्यक्रम इथंच गंडला. पण, इतक्या वर्षांनी आता हे असं का होतंय तर, याममागे वेगवेगळी कारणं आहेत जी सर्वच कारणं थोड्या थोड्या अंशी जबाबदार आहेत.

अतिवृष्टी हे नैसर्गिक कारण तर, वाढतं पर्यटन, वाढती लोकसंख्या आणि महत्त्वाचं म्हणजे वाढतं शहरीकरण ही मानवनिर्मित कारणं जबाबदार आहेत.

हे झालं जोशीमठचं, पण जोशीमठ सोडून आणखीही काही ठिकाणं अशी आहेत जी संपायच्या मार्गावर आहेत. उत्तराखंडमध्येच आणखी अशी ठिकाणं आहेत.

जोशीमठ हे गाव संपायच्या वाटेवर आल्यानंतर मग या इतर ठिकाणांचं प्रकरण समोर आलंय का ? तर, तसं नाही आहे… याची कल्पना आधीच देण्यात आली होती.

२०१६ मध्ये जियोलॉजीकल सर्व्हे झाला होता.

नैनिताल आणि त्या सभोवतालच्या जियोलॉजीकल सर्व्हेमध्ये असं आढळून आलं होतं की या ठिकाणी असलेल्या जमिनीत शेल आणि स्लेटसह चुनखडीचा समावेश आहे जे नैनिताल लेक फॉल्टच्या उपस्थितीमुळे अत्यंत चिरडले गेले आहेत आणि खराब झाले आहेत. वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ जिऑलॉजी अँड ग्राफिक एरा हिल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात या खडकांची आणि जमिनीची ताकद खूपच कमी आहे.

आता जमिनीची ताकद कमी असेल तर, त्यावर उभं राहिलेलं गाव, शहर किंवा कोणत्याही प्रकारची लोकवस्ती टिकू शकणं कठीणच असतं. त्यामुळे ही ठिकाणं लवकरच संपतील असा इशारा २०१६ सालीच जियोलॉजीकल सर्व्हेनंतर टीमकडून देण्यात आला होता. जोशीमठचा मुद्दा समोर आल्यानंतर आता पुन्हा एकदा नैनिताल आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर चर्चेत आलाय तो याच कारणांमुळे.

आता जोशीमठ पाठोपाठ या ठिकाणांचा नंबर लागतोय का असं एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय.

याबाबत बोलताना कुमाऊ विद्यापीठातील जियोलॉजीचे प्राध्यापक असलेले डॉ बहादूर सिंग कोटलिया यांनीही नैनिताल आणि परिसरातील जमीन ही लोकवस्तीचा भार आणखी फार काळ पेलवू शकणार नाही असं म्हटलंय.

हे सगळं आताच आणि उत्तराखंडमध्येच का होतंय?

आताच का होतंय? याचं उत्तर द्यायचं झालं तर, मुळात जेव्हा ही ठिकाणं लोकवस्तीची म्हणून अस्तित्वात आली त्यावेळी, या जमिनींवर आजच्या इतका भार नव्हता. शिवाय, दुसरं कारण म्हणजे वर्षानुवर्षे उन्हाळा, पावसाळा या ऋतुंचा मारा सहन करून  करून जमिनीची ताकदही कमी झालीये.

उत्तराखंडमध्येच का होतंय तर, उत्तराखंड हे पर्यटन स्थळ तसंच देवभुमी म्हणून प्रसिद्ध आहे. आता या कारणामुळे उत्तराखंड या राज्यात पर्यटकांची रेलचेल काळानुसार वाढत गेली.

आता एखाद्या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढते तेव्हा तिथे व्यवसायाच्या संधीही वाढतात. आता व्यवसाय चालवायचा किंवा वाढवायचा तर, त्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना सोयी-सुविधा पुरवाव्या लागणार. त्यासाठी मग सुरू झालेल्या बांधकाम आणि शहरीकरणाच्या प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

अगदी आकडेवारीनुसार बोलायचं झालं तर, दरवर्षी तब्बल १० कोटी पर्यटक उत्तराखंडला भेट देतात. इतक्या मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतील तर, त्या ठिकाणच्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताण येणं हे स्वाभाविकच आहे. बरं त्याशिवाय, नैनिताल आणि जोशीमठ या ठिकाणची जमीन ही मुळातच फार भार पेलवू शकेल अश्या प्रकारची नाही.

या सगळ्यात एक आणखी प्रश्न समोर येतोय तो म्हणजे, २०१६ सालीच जर नैनिताल आणि परिसरातील ठिकाणं ही संपण्याच्या वाटेवर आहेत. तर, मग तेव्हापासुनच ही ठिकाणं वाचवण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत? पर्यटनावर मर्यादा का आणल्या नाहीत? असे सवाल आता लोकांकडून विचारले जातायत.

जोशीमठ असो किंवा मग नैनिताल आणि त्याच्या भोवतीचा परिसर… आपण बदलत्या काळासोबत शहरीकरण करण्याच्या नादात आणि सोयी सुविधा वाढवण्याच्या प्रयत्नात भारतातल्या सर्वात सुंदर पर्यटनस्थळं आता संपण्याच्या मार्गावर आहेत असं बोललं जातंय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.