खांद्यावर तीन स्टार आणि डोक्यावर मिसेस इंडियाचा क्राऊन असणाऱ्या, “प्रेमा पाटील.”

प्रेमा पाटील नाव ऐकायला साधं वाटतं. सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रेमा पाटील. आत्ता प्रेमा पाटील यां नावात असलेला अधिकारीपणा जाणवतो. मिसेस इंडिया प्रेमा पाटील. आत्ता कसं वाटतं. त्यांच्याबद्दल माहिती झाल्यानंतर आम्हाला देखील तसच वाटलेलं. मनात आणलं तर माणसं काहीही करु शकतात. पण संसार, घर, नवरा, मुल संभाळत एक महिला पोलिस अधिकारी मिसेस इंडियासारख्या स्पर्धेत उतरते.

सगळं काही शिकून नवखी असणारी हि महिला मिसेस इंडिया होवून दाखवते हे अविश्वसनीय आहेच पण आपल्या पोरींला कशाला शिकवायचं म्हणणाऱ्यांच्या डोळ्यात देखील झणझणीत अंजन घालणारी आहे. 

प्रेमा पाटील या सांगली जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यातील पुणदी गावच्या. त्यांचे वडिल MSCB मध्ये होते. हे कुटूंब कराडला स्थायिक झालेलं. आई घरातच असायची. प्रेमा पाटील यांना दोन भाऊ. महाराष्ट्रातली निम्याच्यावर जशी कुटूंब आहेत तसच त्यांच कुटूंब. मध्यमवर्गीय. घरात कमावणारी एकच व्यक्ती. पण अशा वेळी पाठीमागे उभा राहणार कोणतरी ठाम माणूस लागतं. 

प्रेमा पाटील यांच्या आयुष्यात दोन व्यक्ती अशा ठाम आहेत. एक म्हणजे त्यांचे वडिल आणि दूसरे म्हणजे त्यांचे पती. 

प्रेमा पाटील यांच शिक्षण कराडच्या वेणूताई चव्हाण महाविद्यालयात झालं. कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून त्यांनी लहान मुलांच्या शिकवण्या घेण्यास सुरवात केली. कमवा व शिका हा मुलमंत्र. पोरीनं शिकायची काय गरज अशी धारणा असताना प्रेमा पाटील यांच्या वडिलांनी तिला चौकटीबाहेरचं करियर करण्यासाठी बळ दिलं. कराडमध्ये जीवन पवार सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सुरू केला. 

M.com आणि पोलीस उपनिरिक्षक अशा दोन्ही परिक्षेचा निकाल एकदम लागला. २०११ सालापासून त्या पोलीस खात्यात आहेत. अंगावर खादी आली आणि कालपर्यन्त असणाऱ्या फक्त प्रेमा पाटील आज PSI प्रेमा पाटील झाल्या. 

पोलीसांची नोकरी त्यात महिला म्हणजे २४ तासांच काम. ठाण्यापासून ते स्पेशल प्रोटेक्शन युनिटमध्ये त्या कार्यरत राहिल्या. अलीकडेच त्या पुण्यामध्ये स्पेशल ब्रॅन्चला API म्हणून पदोन्नतीवर नियुक्त झाल्या. दरम्यानच्या काळात त्यांच विघ्नेश पाटील यांच्यासोबत लग्न झालं. मुलगा झाला. पोलीस सेवेची शिस्त आणि संसार अशा दुहेरी भूमिका त्या निभावत होत्या. 

सर्व काही ठरवलेल्या चौकटीप्रमाणे चालू होतं तोच त्यांना फेसबुकवर मिसेस इंडिया स्पर्धेविषयी समजलं.

पतीला सांगितलं आणि पतीचा आग्रह म्हणून त्यांनी नाव रजिस्टर केलं. एका पोलीस अधिकारी असणाऱ्या महिलेने सौदर्य स्पर्धेत सहभागी होणं हे काहीजणांसाठी “वेगळं” वाटणारी गोष्ट होती पण नेहमीच वेगळं करणाऱ्या प्रेमा पाटील यांना ते सवयीच झालं होतं. त्यांच्या पतीने पाठिंबा दिला. घरचे नेहमीप्रमाणे मागे उभा राहिले आणि नाव रजिस्टर करुन प्रेमा पाटील यांनी स्पर्धेची तयारी करण्यास सुरवात केली. 

रजिस्टर केल्यानंतर फोनवरुन मुलाखती झाल्या. आणि तीन दिवसांच प्रत्यक्ष ग्रुमिंग सेशन पार पडलं. यामध्ये कसं चालावं, स्पर्धेचे नियम सर्वकाही समजून सांगण्यात आलं. त्यानंतर खरी सुरवात झाली. दिवसभर पोलीसाचा जाड शूज आणि ऑफड्युटीत सरावासाठी हायहिल्स सॅण्डल. दिवसभर खादी वर्दी आणि सराव करताना वेगवेगळ्या कपड्यांचा अंदाज घेणं. कॅटवॉक करण्याची प्रॅक्टिस करणं. हे रोजचं झालं. कधीकाळी नाशिकच्या पोलीस ट्रेनिंगमध्ये त्यांनी कराटे पासून सगळं शिकलच होतं. स्पर्धेच्या निमित्ताने कोरिओग्राफरकडून नृत्य देखील शिकून घेतलं. एकामागून एक फेऱ्या सुरू झाल्या. आणि एक एक करत प्रेमा पाटील अंतीम फेरीत पोहचल्या. 

इथे त्यांना विचारण्यात आलं होतं तुमचा आयडॉल कोण? 

तेव्हा त्यांनी उत्तर दिलं किरण बेदी.

किरण बेदी यांच्याप्रमाणेच स्वप्न घेवून त्या पोलीस सेवेत आल्या. पोलीस अधिकारी असताना, एका मुलाची आई असताना घरदार संसार संभाळत त्या रनिंग मिसेस इंडिया झाल्या. कसलेल्या व्यावसायिक मॉडेल्सना पाठीमागे टाकत त्यांनी हा किताब पटकावला. आजही आपल्या आजूबाजूला अशा कित्येक मुली आहेत. तुम्ही माणूस असाल तर प्रेमा पाटील यांच्या वडिल आणि पती प्रमाणे त्यांच्या पाठीमागे उभा राहण्याची गरज असते. कारण प्रत्यक्ष यशस्वी महिलेच्या मागे देखील पुरूष असू शकतो हे दाखवायला हवं. 

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.