सगळं जग अचंबित होऊन पाहात होतं. भारताच्या जलपरीने इंग्लिश खाडीवर तिरंगा फडकवला.

भारतातला पहिला पद्मश्री सन्मान कोणत्या महिलेला मिळाला असेल माहितीय का भिडू ? आशियातील पहिली महिला जलतरणपटू आरती साहा यांनी केलेल्या विक्रमाच्या जोरावर पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं आणि हा पुरस्कार पटकवणाऱ्या आरती साहा या पहिल्याच महिला होत्या. लहानपणापासूनच पाण्याबद्दल असणारं आकर्षण आरती साहा यांना विश्व विक्रम करण्यापर्यंत घेऊन गेलं. तर आरती साहा यांचा हा विश्व विक्रमाचा हा प्रवास आपण सविस्तर जाणून घेऊया. 

24 सप्टेंबर 1940 रोजी आरती साहा यांचा जन्म कोलकातामध्ये झाला. अगदी लहान असल्यापासून आरती यांचे काका त्यांना स्विमिंग शिकवण्यासाठी चंपातला घाटावर घेऊन जायचे. 

पोहणे शिकून झाल्यावर काकांच्या लक्षात आलं की आरती साहा यांची विशेष आवड ही पोहणे आहे आणि यात त्यांनी करियर करायला हरकत नाही. तेव्हा काकांनी आरती साहा यांना हातखोला स्विमिंग क्लबमध्ये भरती केलं. 

वयाच्या 5 व्या वर्षी आरती साहा शैलेंद्र मेमोरियल जलतरण स्पर्धेत सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या. इथूनच त्यांचं ध्येय सुरू झालं आणि ही चांगली सुरवात मानली गेली. आरती साहा यांनी इंटरमिडियटचं शिक्षण सिटी कॉलेजमधून पूर्ण केलं. 

आरती साहा यांचं पोहण्याचं कौशल्य बघून सचिन नाग यांनी त्यांचं टॅलेंट ओळखलं आणि त्यांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. 1949 साली आरती साहा यांनी अखिल भारतीय रेकॉर्डसाहित राज्यस्तरीय स्विमिंग स्पर्धेत भाग घेतला आणि विजेतेपद पटकावलं. 1952 साली त्यांनी हेलसिंकी ऑलम्पिक स्पर्धेत सहभागी नोंदवला.

फक्त अकरा वर्षांची आरती तेव्हा भारतातली सर्वात लहान ऑलिम्पिकपटू म्हणून ओळखली गेली.

भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांच्यापासून प्रेरित होऊन आरती साहा यांनी इंग्लिश खाडी पोहून जाण्याचा निर्धार केला. फक्त निश्चयच नाही केला तर प्रत्यक्ष सहभाग सुद्धा नोंदवला आणि 29 सप्टेंबर 1959 या दिवशी इंग्लिश खाडी पोहून पार करणारी पहिली आशियाई महिला म्हणून आरती साहा यांचं नाव इतिहासात अजरामर झालं. 16 तास आणि 20 मिनिटे एवढ्या कालावधीत आरती साहा यांनी या विश्व विक्रमाला गवसणी घातली होती.

इंग्लंडच्या तिरावर पोहचल्यानंतर भारतीय झेंडा घेऊन त्यांनी तो आसमंतात फिरवून आपल्या विक्रमाची दखल साऱ्या जगाला घ्यायला लावली.

त्यावेळी आरती साहा यांचं स्वागत करण्यासाठी विजयालक्ष्मी पंडित जातीने हजर होत्या. जवाहरलाल नेहरू आणि बऱ्याच नामांकित लोकांनी व्यक्तिगत शुभेच्छा आरती साहा यांना दिल्या होत्या. 30 सप्टेंबर रोजी ऑल इंडिया रेडिओवरून आरती साहा यांच्या यशाची घोषणा करण्यात आली.

साडी नेसणाऱ्या भारतीय महिला म्हणजे फक्त अबला नारी नाहीत हे त्यांनी जगाला दाखवून दिल.

या पराक्रमाबद्दल भारत सरकारने 1960 साली आरती साहा यांना पद्मश्री देऊन सन्मानित केलं. 1998 मध्ये अशी उत्तुंग कामगिरी केल्याबद्दल भारतीय डाक विभागाने आरती साहा यांच्या नावाने टपाल जारी केलं होतं. 23 ऑगस्ट 1994 रोजी कावीळ या रोगाने आरती साहा यांचं निधन झालं. 

आरती साहा यांचा भीमपराक्रम लोकांच्या चांगलाच लक्षात राहीला होता आणि भारताची पहिली जलपरी म्हणून त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली होती.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.